खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने 'विश्वकरंडक' जिंकणारे ते जगातील पहिले फुटबॉलपटू ठरले..

१९५८ ते २००६ या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, सल्लागार या नात्याने त्यांनी ब्राझीलियन फुटबॉलमध्ये अमूल्य कामगिरी केली.
Brazil football legend Mario Zagallo
Brazil football legend Mario Zagalloesakal

किशोर पेटकर

फुटबॉलमधील महासत्ता मानण्यात येणाऱ्या ब्राझीलने सर्वाधिक पाच वेळा विश्वकरंडक जिंकला आहे. दक्षिण अमेरिकेतील हा फुटबॉलवेडा देश २००२ साली शेवटचा जगज्जेता ठरला. त्यानंतर ब्राझीलियन फुटबॉलचा जोश ओसरत गेला, पण जादुई करिष्मा मात्र अजूनही कायम आहे.

१९५० साली घरच्या मैदानावर रिओ-द-जानिरो येथील ऐतिहासिक ‘एस्तादियो दो माराकाना’वर उरुग्वेने २-१ असा धक्कादायक विजय नोंदविल्यामुळे ब्राझीलचा विश्वकरंडक हुकला. सारा देश शोकसागरात बुडाला.

यामध्ये स्टेडियमवर सैनिकी सेवेसाठी तैनात असलेल्या युवकांत मारियो जॉर्ज लोबो झागालो याचाही समावेश होता.

त्या पराभवामुळे तेव्हा युवावस्थेतील झागालो समस्त देशवासीयांसारखाच प्रचंड निराश झाला. आठ वर्षांनंतर स्वीडनमध्ये ब्राझीलने यजमान देशाचा ५-२ फरकाने पाडाव करून प्रथमच विश्वकरंडक जिंकला.

त्यावेळी ब्राझीलमध्ये प्रचंड जल्लोष झाला. सारा देश हर्षोल्हासात न्हाऊन गेला. तेव्हा मारियो झागालो रस्त्यावर आनंदात नाचणाऱ्या देशवासीयांत नव्हता, तर तो जगज्जेत्या ब्राझील संघाचा यशस्वी शिलेदार होता.

सन १९५०मधील त्या पराजित लढतीतील कटू स्मृती उराशी कवटाळलेल्या झागालोने फुटबॉल कौशल्य विकसित करण्यावर भर दिला. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी त्याने विंगर या जागी खेळताना खूपच मेहनत घेतली.

जरा उशिराच, म्हणजे वयाच्या २६व्या वर्षी या होतकरू फुटबॉलपटूने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविले आणि अल्पावधीतच तो संघाचा प्रमुख खेळाडू बनला.

मध्यफळी आणि आघाडीफळीसाठी साह्यभूत ठरणारा झागालो ब्राझीलसाठी मौल्यवान ठरला. सन १९५८मधील विश्वकरंडक १७ वर्षांच्या पेलेने गाजविला.

मात्र या संघात आक्रमण व मध्यफळी यांच्यातला महत्त्वाचा दुवा झागालो होता. स्वीडनविरुद्धच्या अंतिम लढतीत त्याने एक गोलही केला.

Brazil football legend Mario Zagallo
Bengaluru CEO Suchana Seth: एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?

खेळाडू, प्रशिक्षक, समन्वयक (साहाय्यक प्रशिक्षक) या नात्याने एकूण चार वेळा विश्वकरंडक जिंकणाऱ्या दिग्गज झागालो यांचे अलीकडेच वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. खेळाडू व प्रशिक्षक या नात्याने विश्वकरंडक जिंकणारे ते जगातील पहिले ठरले.

त्यानंतर जर्मनीचे फ्रांझ बेकेनबॉर व फ्रान्सच्या दिदियर देशाँ यांनी असा पराक्रम साधला. फुटबॉलचे अफाट तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षक या नात्याने मैदानावर सफलपणे राबवलेली कल्पक व्यूहरचना यामुळे झागालो ‘द प्रोफेसर’ या टोपणनावानेही लोकप्रिय ठरले.

त्यांच्या संपूर्ण नावात ‘लोबो’ आहे. पोर्तुगीज भाषेत लोबो याचा अर्थ लांडगा. मार्गदर्शक झागालोला त्यांच्या धूर्त कूटनीतीमुळे ‘वेल्हो (म्हातारा) लोबो’ म्हणजेच ओल्ड वूल्फ, असेही म्हटले जात असे. खेळताना मैदानावर अथकपणे वावरणाऱ्या झागालोला मुंगीचीही उपमा दिली गेली.

१९५८ ते २००६ या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी खेळाडू, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, सल्लागार या नात्याने ब्राझीलियन फुटबॉलमध्ये अमूल्य कामगिरी केली.

मध्यंतरी कुवेत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.

हौशी खेळाडूंची मजबूत मोट बांधत त्यांनी १९९० साली संयुक्त अरब अमिरातीला विश्वकरंडक पात्रतेच्या दिशेने वाटचाल करण्यास त्यांनी प्रेरणा दिली होती.

जगज्जेता खेळाडू-मार्गदर्शक

मारियो झागालो यांचे फुटबॉल कौशल्य आणि अभ्यास अफलातून होता. १९५८मध्ये ब्राझीलने विश्वकरंडक जिंकला, पेले या विलक्षण फुटबॉलपटूने साऱ्या विश्वावर गारुड केले. त्यानंतर १९६२मध्ये ब्राझीलने विश्वविजेतेपद राखले.

तेव्हा ऐन भरात असलेल्या पेलेला साखळी फेरीतील दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यांना मुकावे लागले. खेळाडू या नात्याने झागालो याच्यावर पेलेच्या अनुपस्थितीत अतिरिक्त भार पडला. या हुकमी खेळाडूने सारा अनुभव पणाला लावत ब्राझीलियन चाहत्यांना निराश केले नाही.

आक्रमणाबरोबर बचावातही महत्त्वपूर्ण योगदान देत ब्राझील दुसऱ्यांदा जगज्जेता होण्यामध्ये प्रमुख वाटा उचलला. अंतिम लढतीत ब्राझीलने चेकोस्लोव्हाकियाला पराजित केले.

Brazil football legend Mario Zagallo
Shooting In Football Match : अमेरिकेत फुटबॉल सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार! पोलीस अधिकारीही सामील, तीन जणांची प्रकृती चिंताजनक

मैदानावर आपला बहर ओसरत चाललाय याची जाणीव झालेल्या झागालो यांनी १९६६मधील विश्वकरंडकापूर्वी एक वर्ष अगोदर निवृत्ती जाहीर केली.

ब्राझीलतर्फे ते ३३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. खेळाडू म्हणून ते निवृत्त झाले, परंतु फुटबॉलशी नाते तुटले नाही. प्रशिक्षक या नात्याने त्यांनी नवी कारकीर्द नेटाने सुरू केली.

वयाच्या ३८व्या वर्षी ते ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनले. मेक्सिकोत १९७० साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झागालो यांनी जुआंव साल्ढाना यांची जागा घेतली. पेले त्यावेळी कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर होता.

ब्राझीलच्या संघात पेलेसह जैरझिन्हो, जेर्सन, तोस्तांव, रिव्हेलिनो असे नावाजलेले फुटबॉलपटू होते. त्यांना झागालो यांच्या मुरब्बी मार्गदर्शनाची साथ लाभली आणि ब्राझीलने १९६६मधील अपयश धुऊन काढताना इटलीचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा विश्वकरंडक जिंकण्याचा विक्रम केला.

१९७४ साली तत्कालीन पश्चिम जर्मनीत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना ब्राझीलच्या संघामध्ये पेले नव्हता. संघाला पूर्वीचा दबदबा राखता आला नाही आणि झागालो यांच्या मार्गदर्शनाखालील चमूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Brazil football legend Mario Zagallo
Football Video : आरा रा रा रा खतरनाक...! गोलकीपरने 101 मीटरवरून केला गोल, संपूर्ण टीमही हँग

पुन्हा एकदा ‘सेलेसांव’च्या मदतीला

ब्राझीलच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाला प्रेमाने ‘सेलेसांव’ म्हटले जाते. १९७४नंतर झागालो सेलेसांवपासून दूर गेले, मात्र प्रशिक्षक या नात्याने ब्राझीलियन क्लब आणि आखाती देशांत सक्रिय राहिले.

१९७८ साली विश्वकरंडकात ब्राझीलला तिसरा क्रमांक मिळाला. परंतु १९९०पर्यंत जगज्जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली.

ब्राझीलमधील फुटबॉल महासंघाला झागालो यांच्या महानतेची आठवण झाली व त्यांनी या प्रोफेसरला मदतीची हाक दिली.

ते हाकेला धावून आले. १९९४ साली अमेरिकेत झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी झागालो यांनी मुख्य प्रशिक्षक कार्लोस आल्बर्टो परेरा यांचे समन्वयक या नात्याने महत्त्वाचे साहाय्यक प्रशिक्षकपद स्वीकारले.

परेरा व झागालो यांची विचारशैली जुळली आणि ब्राझीलने इटलीला पेनल्टींवर हरवून चौथ्यांदा विश्वकरंडक जिंकला. खेळाडू-मार्गदर्शक या नात्याने झागालो चौथ्यांदा जगज्जेते बनले.

१९९८मध्ये ब्राझील व झागालो यांना आणखी एक विश्वकरंडक जिंकण्याची छान संधी होती. हुकमी खेळाडू रोनाल्डो आजारामुळे अंतिम लढत पूर्ण क्षमतेने खेळू शकला नाही.

त्याचा मोठा फटका झागालो यांच्या मार्गदर्शनाखालील ब्राझीलला बसला. यजमान फ्रान्सने झिनेदिन झिदानच्या शानदार खेळाच्या बळावर विश्वकरंडक पटकावला.

स्पर्धेच्या इतिहासात ब्राझीलला दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खेळाडू-प्रशिक्षक या नात्याने पाचव्यांदा झागालो यांना जगज्जेता बनणे शक्य झाले नाही.

२००२ साली दक्षिण कोरिया-जपानमध्ये झालेल्या विश्वकरंडकात लुईझ फिलिप स्कॉलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलने पाचव्यांदा बाजी मारली. यावेळी झागालो संघाचे खास सल्लागार होते, परंतु सपोर्ट स्टाफमध्ये ते नव्हते.

जर्मनीत झालेल्या २००६मधील विश्वकरंडकात झागालो यांनी मुख्य प्रशिक्षक परेरा यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये तांत्रिक साहाय्यकाची जबाबदारी निभावली.

ब्राझीलचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आणि झागालो यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेला पूर्णविराम दिला.

खेळाडू व मार्गदर्शक या नात्याने प्रत्येकी दोन वेळा विश्वकरंडक जिंकणारे, एक वेळा उपविजेते ठरलेले झागालो केवळ ब्राझीलियन नव्हे, तर जागतिक फुटबॉलमध्येही अजरामर ठरले.

१९५८ साली सर्वप्रथम विश्वकरंडक जिंकलेल्या ब्राझील संघातील जीवित खेळाडूंपैकी ते सर्वांत शेवटचे ठरले.

-------------------

Brazil football legend Mario Zagallo
Football News : फुटबॉल विश्‍वकरंडक भारतात खेळवण्याची तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com