प्राणी आणि मनुष्य यांच्या शरीरविच्छेदनातून चित्रकला साकारणारा अवलिया!

वयाच्या १५-१६व्या वर्षांपर्यंत जॉर्ज आपल्या वडिलांच्याच पादत्राणांच्या कारखान्यात काम करत होता. फावल्या वेळात तो चित्रे काढत असे..
horse painting by  George Stubbs
horse painting by George Stubbsesakal

डॉ. सुहास भास्कर जोशी

जागतिक कलेच्या इतिहासात प्राण्यांची – विशेषतः घोड्यांची अप्रतिम चित्रे काढणारा प्रतिभावान चित्रकार म्हणून ब्रिटिश चित्रकार जॉर्ज स्टब्ज याचा नावलौकिक आहे.

घोड्यांचे चित्रीकरण करण्यातील त्याचे प्रभुत्व लक्षात घेऊन त्याला ‘लिओनार्दो ऑफ हॉर्सेस’ असे म्हटले जायचे. इंग्लंडमधील लिव्हरपूल येथील पादत्राणांच्या कारखानदाराच्या या मुलाने एकलव्यासारखी स्वतंत्रपणे अथक कलासाधना करून युरोपियन कलाविश्वात स्वतःची नाममुद्रा उमटवली.

घोड्यावर हल्ला करणारा सिंह या चित्रमालिकेतील कलाकृतींनी जॉर्ज स्टब्ज याचे नाव महान चित्रकार म्हणून सर्वदूर प्रस्थापित केले. कला आणि विज्ञान या दोन्हींची आवड असणाऱ्या जॉर्जला लहानपणापासूनच चित्रकला आणि शरीर विच्छेदन यात विलक्षण रुची आणि गती होती.

एकीकडं तांत्रिक प्रयोग करण्याची उत्सुकता आणि दुसरीकडे आपल्या मस्तीत –आपल्या इच्छेनुसार चित्रे रंगवण्याची मानसिकता यामुळे त्याला आयुष्याच्या उत्तरार्धात मोठे कर्ज झाले, पण चित्रकलेवरची आपली अव्यभिचारी निष्ठा जॉर्ज स्टब्जने ढळू दिली नाही.

जॉर्ज स्टब्ज (George Stubbs) याचा जन्म २५ ऑगस्ट, १७२४ रोजी लिव्हरपूल येथे झाला. आधी म्हटल्याप्रमाणे त्याचे वडील जॉन हे पादत्राणे व्यावसायिक, तर आई गृहिणी होती. जॉर्जच्या बालपण आणि तारुण्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

मात्र त्याचा चित्रकार मित्र ओझियास हंफ्रीने (Ozias Humphry) जॉर्जच्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत, त्यावरून आपल्याला स्टब्जच्या पूर्वायुष्याची जुजबी ओळख होते.

horse painting by  George Stubbs
Faculty of Arts : कला शाखेकडे वाढता कल! हुशार विद्यार्थ्यांचीही पसंती, नवनव्या व्यावसायिक संधीचा परिणाम

वयाच्या १५-१६व्या वर्षांपर्यंत जॉर्ज आपल्या वडिलांच्याच पादत्राणांच्या कारखान्यात काम करत होता. फावल्या वेळात तो चित्रे काढत असे. पण त्याने चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते. थोर चित्रकारांच्या चित्रांच्या प्रतिकृती रंगवत तो कलेची साधना करत असे.

त्याला निसर्गाविषयी कायमच कुतूहल होते. लवकरच त्याने प्राण्यांचे शवविच्छेदन करायला सुरुवात केली. डॉ. चार्ल्स अटकीन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नंतर यॉर्कशायरमधील कौंटी हॉस्पिटलमध्ये मानवी शरीरविच्छेदनाचेही धडे घेतले.

१७५१मध्ये डॉ. जॉन बर्टन यांनी लिहिलेल्या सूतिकाशास्त्रावरील एसेज् टूवर्डस् ए कंप्लिट न्यू सिस्टिम ऑफ मिडवाइफरी या पुस्तकात जॉर्जनी बाळंतपणात जन्म देताना मरण पावलेल्या स्त्रियांचे स्वतः विच्छेदन करून त्यांच्या पोटातील गर्भांची चित्रे/ रेखाटने केली होती.

त्या काळातील बहुतेक चित्रकार आधी प्रथितयश चित्रकारांच्या हाताखाली अॅप्रेंटिस म्हणून काम करत असत, आणि पुरेसा अनुभव घेतल्यावर मग आवडेल त्या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम सुरू करत. पण जॉर्ज महान चित्रकारांच्या कलाकृतींचा अभ्यास करून आणि प्राणी/ मनुष्य यांच्या शरीरविच्छेदनातून चित्रकला शिकला.

(अर्थात शवविच्छेदनाच्या ध्यासामुळे जॉर्ज त्याच्या राहत्या परिसरात काहीसा कुप्रसिद्धच झाला होता.) १७५४मध्ये जॉर्जने राफाएल आणि मायकेलअॅंजेलो या प्रतिभावंतांच्या कलाकृतींचा अभ्यास करण्यासाठी इटलीचा अभ्यासदौरा केला.

मात्र हंफ्रीने लिहिल्याप्रमाणे स्टब्जने रोममध्ये असताना एकाही जगप्रसिद्ध पेंटिंगची प्रतिकृती करण्याचा अथवा ऐतिहासिक कलाकृतींचे रेखाटन करण्याचा प्रयत्न केला नाही.

त्याने फक्त महान कलाकारांच्या थोर कलाकृतींचे सजगपणे सूक्ष्म निरीक्षण केले. (घोड्यावर हल्ला करणारा सिंह या स्टब्जच्या गाजलेल्या चित्रमालिकेचे स्फूर्तिस्थान असलेले प्राचीन शिल्प मात्र रोममध्ये स्टब्जने बारकाईने न्याहाळले असावे.) परत आल्यावर त्याने पोर्ट्रेट पेंटिंग आणि अॅनिमल पेंटिंग यांच्यावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले.

horse painting by  George Stubbs
World Mysterious Paintings : या चित्रांमध्ये दडलंय रहस्य, जे कोणालाच माहित नाही

अर्थार्जनासाठी स्टब्जने काही पोर्ट्रेट पेंटिंगची कामे या काळात स्वीकारली असली, तरी १७५६ पासून पुढील अठरा महिने त्याने शवविच्छेदनाद्वारे घोड्यांच्या शरीरशास्त्राचा अत्यंत पद्धतशीररित्या आणि न थकता अभ्यास केला.

घोड्याच्या त्वचेखालील एकेक थर बाजूला करून अस्थी, मज्जा आणि शिरा यांचा त्याने बारकाईने अभ्यास केला.

वेगवेगळ्या कोनातून रेखाटने काढून त्याने या सगळ्याची विस्तृत टिपणे काढली. घोड्यांच्या शवविच्छेदनाच्या ‘गलिच्छ’ कामाविरुद्ध होणारा जनक्षोभ टाळण्यासाठी तो हॉर्कस्टॉ या लिंकनशायर प्रांतातील निर्जन भागात जाऊन राहिला.

या अतिशय मुश्कील कामात त्याला मदत मिळाली ती फक्त त्याच्या पत्नीकडून -मेरी स्पेन्सरकडून. इथेच त्याच्या मुलाचा, जॉर्ज टाउनलेचा जन्म झाला.

१७६६ साली घोड्यांच्या शरीरशास्त्राचा भरपूर रेखाटनांसह सांगोपांग ऊहापोह करणारे द अॅनाटॉमी ऑफ हॉर्स (The Anatomy of Horse) हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि समाजाचे लक्ष या वैज्ञानिक चित्रकाराकडे वेधले गेले.

अर्थात स्टब्जची घोड्यांची अचूक रेखाटने पाहून अनेक उच्चभ्रू श्रीमंत ब्रिटिश उमराव आधीच प्रभावित झाले होते. यापैकी थर्ड ड्यूक ऑफ रिचमंड याने स्टब्जकडे घोड्यांच्या तीन मोठ्या पेंटिंगची मागणी नोंदवली. यानेतर अनेक श्रीमंत उमरावांनी स्टब्जकडे घोड्यांच्या पेंटिंगची मागणी नोंदवली.

घोड्यांची चित्रे रंगवताना तो आपण घोड्याचे पोर्ट्रेट रंगवतोय असं समजून पूर्ण ‘फोकस’ घोड्यावर ठेवून आधी घोड्याचेच चित्र रंगवून नंतर पार्श्वभूमी, आभाळ वगैरे रंगवायचा.

घोड्यांशिवाय स्टब्ज कुत्री, वाघ, सिंह, हरिण, कांगारू, गेंडा, माकड असे अनेक प्राणी कौशल्याने रंगवायचा.

मग श्रीमंत उमरावांची पोर्ट्रेट – विशेषतः ग्रुप पोर्ट्रेट रंगविण्याचे काम सुरू झाले. स्टब्जकडे पैशाचा ओघ सुरू झाला. त्याने लेडनच्या उच्चभ्रू वस्तीत टोलेजंग घर विकत घेतले.

या काळातील १७६२ साली रंगवलेले व्हिसलजॅकेट (Whistlejacket) हे शर्यतीतल्या घोड्याचे पोर्ट्रेट प्रचंड गाजले.

११५” X ९७” इतक्या मोठ्या आकाराच्या पेंटिंगमध्ये यलो ऑकर रंगाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत नाट्यमयरितीने मागील दोन पायांवर उभ्या असलेल्या घोड्याचे सौंदर्य आणि सामर्थ्य दर्शवणारे पेंटिंग स्टब्जने सेकंड मार्कस् ऑफ रॉकिंगहॅम या उमरावासाठी साकारले होते.

घोड्याच्या डोळ्यातील जिवंत भाव, त्याची तुकतुकीत त्वचा, पुष्ट स्नायू व त्याखालील शिरा, जबरदस्त ‘पोझ’ आणि पाठीमागे फक्त काळपट पिवळ्या रंगाची पार्श्वभूमी या सगळ्यांमुळे हे पेंटिंग अतिशय लक्षवेधी बनले आहे. सध्या हे पेंटिंग लंडनच्या नॅशनल गॅलरीमध्ये पाहायला मिळू शकते.

horse painting by  George Stubbs
Vastu Tips for Painting: घरामध्ये ही पेंटिंग लावणं मानलं जातं शुभ, सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा राहिल आशिर्वाद

गवताची गंजी रचणारे (Haymakers) आणि कापणी करणारे (Reapers) ही त्याकाळी लोकप्रिय असणाऱ्या ग्रामीण विषयावरची स्टब्जने १७८५ साली केलेली तैलचित्रे उत्तम जमली आहेत.

प्रिन्स ऑफ वेल्स यांचा आश्रय मिळाल्यानंतर स्टब्जने १७९१ साली त्यांचे अश्वारूढ पोर्ट्रेट केले. १७९५ साली त्याने शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून माणूस, वाघ आणि पक्षी यांच्या अंतर्गत रचनेचा सूक्ष्म अभ्यास मांडणारे भव्य प्रदर्शन साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला.

परेतु अनेक वर्षे चालू असणारा हा प्रकल्प १८०६ साली झालेल्या त्याच्या मृत्यूमुळे अर्धवट राहिला.

जॉर्ज स्टब्ज याने आयुष्यभर अनेक चित्रे रंगवली असली तरी त्याची कलारसिकांमधील खरी ओळख घोड्यावर हल्ला करणारा सिंह या त्याच्या अतिशय गाजलेल्या चित्रमालिकेमुळेच आहे.

१७६२ साली पहिल्यांदा त्याने सेकंड मार्कस् ऑफ रॉकिंगहॅम या उमरावासाठी या मालिकेतील चित्र रंगवले आणि मग पुढं तीस वर्षं ऑइल ऑन कॅनव्हास, इनॅमल, एन्ग्रेव्हिंग, क्ले अशा वेगवेगळ्या माध्यमात त्याने या विषयावर आपल्या कलाकृती सादर केल्या.

इटलीहून परतताना स्टब्ज आफ्रिकेला गेला होता तेव्हा त्याने जंगली घोड्यावर आक्रमण करणारा सिंह पाहिला होता, असे काहीजण म्हणतात, तर अन्य काहींच्या मते त्याने इटलीत या विषयावरचे शिल्प पाहिले होते.

अर्थात स्फूर्तिस्थान काहीही असो, कलाविश्वात मात्र महान चित्रकृतींची भर पडली यात शंका नाही.

या चित्रमालिकेतील १७६२ साली रंगवलेले तैलचित्र ९६” X १३१” इतक्या भव्य आकाराचे असून ते सध्या येल सेंटर फॉर ब्रिटिश आर्ट येथे आहे. या पेंटिंगमध्ये जंगलात सिंहाने घोड्याच्या पाठीवर झेप घेऊन त्याच्या पाठीत आपले दात रूतवले आहेत.

भयभीत घोड्याचे शरीर मागच्या पायांवर झुकले असून त्याने पुढचा एक पाय वर उचलला आहे. शेपूट उंचावलेला सिंह पूर्णपणे घोड्याच्या पाठीवर आरूढ झाला आहे.

चित्राची संरचना (Composition) नाट्यपूर्ण आहेच, पण यातील सिंह आणि घोडा या दोघांचे चेहरे जबरदस्त भासतात. सिंहाचे क्रूर निष्ठुर डोळे आणि घोड्याच्या त्वचेत त्याने रुतवलेले दात यांच्या पार्श्वभूमीवर घाबरलेल्या घोड्याची बाहेर आलेली जीभ, फुगलेल्या शिरा आणि विस्फारलेले डोळे या सगळ्यांमुळे पाहणाऱ्याला एक जिवंत नाट्यानुभव अनुभवायला मिळतो.

जॉर्ज स्टब्जने या चित्रमालिकेतील कलाकृती तीन भागात सादर केल्या आहेत. एकामध्ये सिंहाच्या आकस्मिक दर्शनाने घाबरलेला घोडा दिसतो.

दुसऱ्या प्रकारच्या चित्रकृतींमध्ये सिंह घोड्याच्या अगदी निकट पोहोचला आहे. आणि तिसऱ्या प्रकारात सिंहाने घोड्यावर हल्ला केला आहे. काही चित्रांमध्ये घोडा पांढऱ्या तर काहींमध्ये तपकिरी रंगामध्ये दाखवला आहे.

अठराव्या शतकातील सुप्रसिद्ध राजनीतिज्ञ आणि लेखक होरॅस वॉलपोल याने जॉर्ज स्टब्ज याच्या पेंटिंगमधील क्रूर सिंह आणि भयभीत घोडा यावर एक दीर्घकाव्य रचले होते.

कलासमीक्षकांच्या मते स्टब्जची ही चित्रमालिका म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बहराला आलेल्या ‘रोमॅंटीसीझम’चा जाहीरनामाच समजायला हवा.

काहीही असले तरी जॉर्ज स्टब्ज याची घोड्यांची चित्रे आणि विशेषतः ही चित्रमालिका कलाविश्वातील अठराव्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना होती यात शंका नाही!

-----------------

horse painting by  George Stubbs
M.F. Husain : कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच अंतिम मूल्य मानणाऱ्या एम.एफ. हुसेन यांनी आपली तत्त्वं मात्र सोडली नाहीत..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com