Camera and Editing : जे कट, एल कट, जंप कट, क्रॉस कटिंग; जाणून घ्या चित्रपटाच्या 'शॉट कट' ची भाषा

प्रत्येक चित्रपटाचा एक वेग असतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत तो वेग सांभाळावा लागतो..
Movie cut
Movie cutEsakal

जॉन-लुक गोदार्द या महान फ्रेंच दिग्दर्शकाने १९६० साली ब्रेथलेस चित्रपटामध्ये कॅमेरा आणि एडिटिंगचा वापर धाडसाने वेगळ्या पद्धतीने करत, परंपरा बदलून नवीन ट्रेंड निर्माण केले. त्यांनी केलेले प्रयोग चित्रपटाची भाषा बदलणारे ठरले.

सुहास किर्लोस्कर

चित्रपटाचे शूटिंग सलग एका सिक्वेन्सने होत नसते. एका लोकेशनवरचे सर्व शॉट कलाकारांच्या उपलब्ध तारखा जुळवून शूट केले जातात. शूटिंग झालेले सगळे शॉट एका सिक्वेन्सने जोडून त्याची कथा तयार करण्याचे काम संकलक करतात.

एडिटरकडे म्हणजे संकलकाकडे चित्रपटाचे रशेस म्हणजे शूट केलेले सर्व शॉट येतात त्याचप्रमाणे त्याच्या ऑडिओ क्लिपही येतात.

दोन्हींचा मेळ घालण्याचे काम एडिटरला करावे लागते. शॉट शूट करण्यापूर्वी क्लॅपरबोर्डवर ‘सीन 56 – 150 C - टेक नाईन’ (सीन नंबर, कॅमेरा अँगल, टेक नंबर) असे लिहिलेले असते. त्यातील उत्तम टेकची निवड करून अनेक शॉट एकसंधपणे जुळवण्याचे काम एडिटर करतात.

लॉरेन्स ऑफ अरेबियामध्ये पडद्यावरील व्यक्ती पेटलेल्या काडीवर फुंकर मारते, अंधार होतो, त्याचवेळी शॉट कट होतो आणि सूर्योदय दिसतो. चित्रपटाच्या संकलक अॅने कोट्स सांगतात, की तो दिग्दर्शकाबरोबर चर्चा करत असताना अचानक सुचलेला ‘कट’ आहे.

विशेष म्हणजे हा मॅच कट त्या काळातील लोकप्रिय कट समजला जातो. इनव्हिजिबल कट, मॅच कट हे एडिटिंगमधील ‘कट’ चे प्रकार यापूर्वीच्या लेखात आपण ‘बघितले’. (संकलनाची किमया –प्रसिद्धीः २४ फेब्रुवारी) याव्यतिरिक्त एडिटिंगचे अनेक प्रकार आपण चित्रपटामध्ये बघितले आहेत पण बहुधा त्यांची नावे आपल्याला माहिती नसतात.

जे कट, एल कट

एक हसीना थी चित्रपटामध्ये नायिका तुरुंगामधून पळून जाते आणि तिला फसवणाऱ्या वकिलाचा खातमा करते. करनला (सैफ अली खान) त्याचा मित्र त्या वकिलाच्या मृत्यूबद्दल सांगतो. त्या वकिलाला कोणीतरी मारले असावे, अशी चर्चा सुरू असताना “किसीने उडा दिया उसको”, असे म्हणणाऱ्या मित्राला करन विचारतो, “मगर किसने?” त्याचवेळी आपल्याला रेल्वेचा आवाज येतो.

करन खिडकीबाहेर बघतो. रेल्वे दाखविण्याऐवजी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक टॅक्सी बघून चाणाक्ष प्रेक्षकांच्या लक्षात येते, की नायिका रेल्वेने कोलकत्यामध्ये पोहोचली आहे. एका कटमुळे आपण क्षणार्धात मुंबईमधून कोलकत्याला पोहोचतो. दृक-श्राव्य माध्यमात कथा सांगताना आवाजाचा वापर करून दोन प्रसंगांचे धागे जोडण्याची कल्पना लाजवाब आहे.

पुढच्या सीनचा ऑडिओ आधी ऐकवणे आणि संबंधित शॉट काही सेकंदानंतर दाखवणे याला ‘जे कट’ म्हणतात.

व्हिडिओ आणि ऑडिओ या दोन पट्ट्या एकाखाली एक असल्यास खालच्या पट्टीवर असणाऱ्या ऑडिओची सुरुवात प्रथम होते आणि वरच्या पट्टीवर असणारा व्हिडिओ उशिरा सुरू झाल्यावर एडिटिंग स्क्रीनवर त्याचा आकार ‘J’सारखा दिसतो. सलगता (Continuity) परिणामकारकरित्या दाखवण्यासाठी हा कट वापरला जातो.

जे कटच्या विरुद्ध एल (L) कट. प्रिडेटर चित्रपटामध्ये नायकाच्या टीममधील एका साथीदाराचा जिवाच्या आकांताने ओरडल्याचा आवाज ऐकू येतो.

तो आवाज ऐकू येत असतानाच त्याचे साथीदार जंगलामधून चालताना थबकल्याचे आपल्याला दिसते. इथे आधीच्या शॉटमधला ओरडल्याचा आवाज अजूनही सुरूच आहे. अशाप्रकारे पुढच्या शॉटचा व्हिडिओ पहिल्यांदा दिसताना त्यापूर्वीच्या शॉटचा ऑडिओ अजूनही ऐकू येत राहण्याला एल कट म्हणतात.

जंप कट

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची बराच वेळ वाट बघत आहे, हे दोन मिनिटांत दाखवण्यासाठी ‘जंप कट’चा वापर केला जातो. रन लोला रनमध्ये नायिका पळत गेली आणि तिने बरेच अंतर कापले हे सलगपणे न दाखवता अनेक जंप कटने दाखवले आहे.

सलगपणे शूट केलेल्या शॉटमधले काही भाग जाणीवपूर्वक कट करून पुढील भाग जोडण्याला जंप कट म्हणतात. एखाद्या उत्तम चित्रपटामध्ये गाण्यामुळे रसभंग होत असल्यास आपल्यापैकी बरेचजण फास्ट फॉरवर्ड करून गाणे पुढे ढकलतात, हादेखील एक प्रकारचा जंप कटच. ‘दिल चाहता है’ या टायटल साँगच्या सुरुवातीला कारने रस्त्यावरून अंतर कापल्याचे दोन जंप कटने बेस गिटारच्या तालावर दाखवले आहे.

जंप कटची सुरुवात करण्याचे श्रेय आद्य चित्रपटकर्ता जॉर्ज मिलीएस यांना जाते. एकदा रस्त्यावरून जाणाऱ्या बग्गीचे शूटिंग सुरू असताना कॅमेरा ‘जॅम’ झाला. त्यांनी कॅमेरा पुन्हा सुरू केला, पण तोपर्यंत बग्गी पुढे निघून गेली होती.

ते शूटिंग बघताना जॉर्ज यांच्या लक्षात आले, की तो सलग शॉट मधेच कट झाला आहे आणि बग्गी पुढे गेल्यामुळे कथा पटकन पुढे सरकते आहे. त्यानंतर जॉर्ज यांनी त्या संकल्पनेचा वापर वारंवार करण्यास सुरुवात केली.

जॉन-लुक गोदार्द (Jean-Luc Godard) या महान फ्रेंच दिग्दर्शकाने १९६० साली ब्रेथलेस चित्रपटामध्ये कॅमेरा आणि एडिटिंगचा वापर धाडसाने वेगळ्या पद्धतीने करत, परंपरा बदलून नवीन ट्रेंड निर्माण केले.

तोपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून कथा सांगताना हॉलिवूड स्टाइलने कथा सविस्तर सांगण्याची पद्धत होती. आज प्रेक्षकांना असे ‘जंप कट’ बघणे सवयीचे झाले असले, तरी १९६०मध्ये गोदार्द यांनी केलेले प्रयोग चित्रपटाची भाषा बदलणारे ठरले. इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माईंड या चित्रपटामध्ये नायक आणि नायिका एकमेकांशी गप्पा मारत आहेत.

गप्पांमध्ये बराच वेळ निघून गेला हे दाखवण्यासाठी जंप कट वापरलेले आहेत आणि प्रत्येक जंप कटला वेगवेगळे हिंदी गाणे पार्श्वसंगीत स्वरूपात वाजते. ‘तेरे संग प्यार मै नही तोडना’ हे गाणे ऐकू येते त्यावेळी काही वेगळ्या विषयावर गप्पा सुरू आहेत.

कट. ‘मेरा मन तेरा प्यासा’ हे गाणे ऐकू येते त्यावेळी गप्पांचा विषय बदलला आहे. पुन्हा कट. नायिका नायकाला सांगते की मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे. त्याचवेळी गाणे बदलते आणि ‘तू वादा न तोड’ हे गाणे ऐकू येते.

दोन मिनिटांच्या शॉटमध्ये त्यांनी गप्पा मारण्यात बराच वेळ घालवला हे अशा प्रकारे दृश्य आणि श्राव्य माध्यमातून दाखवले आहे.

शिंडलर्स लिस्ट चित्रपटामध्ये शिंडलर स्वतःची सेक्रेटरी नेमण्यासाठी अनेक स्त्रियांचे इंटरव्ह्यू घेतो हे दृश्य अनेक जंप कट वापरून दाखवले आहे. स्टीव्हन स्पीलबर्गच्या अनेक चित्रपटात जंप कट तंत्र वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले आहे.

देऊळ चित्रपटाचे संकलक अभिजित देशपांडे यांच्याशी एडिटिंग या विषयावर संवाद साधला. ते सांगतात, की एडिटिंग हा एक टीमवर्कचा भाग आहे. ते चित्रपट कलेचे एक साधन आहे.

एडिटरने केलेले संकलन दिग्दर्शकाच्या व्हिजनला मिळतेजुळते असावे लागते. उपलब्ध शॉटपैकी एकेक शॉट निवडून ते एकमेकांशी जोडून एक व्हर्जन तयार करून दिग्दर्शकाला दाखवल्यानंतर दिग्दर्शक काही सूचना करतात आणि त्यानुसार त्यामध्ये बदल केले जातात.

अनेकवेळा केलेल्या चर्चा, त्यामध्ये दिग्दर्शकाला काय अपेक्षित परिणाम साधायचा आहे याविषयी विचार विनिमय करून एकेक व्हर्जन तयार केली जातात. प्रत्येक चित्रपटाचा एक वेग असतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत तो वेग सांभाळावा लागतो.

वळू, देऊळ, न्यूड या चित्रपटांची लय वेगवेगळी आहे. न्यूडसारख्या चित्रपटामध्ये जंप कट करता येत नाहीत. सगळे रशेस बघितल्यावर चित्रपटाची लय एडिटरला लगेच सापडतेच असे नाही.

न्यूड चित्रपटाचे रशेस बघूनही त्याच्या लयीचे कोडे बराच काळ सुटले नव्हते. एकदा एक फ्रेंच संगीत सहज कानावर पडले आणि त्यामधून न्यूड चित्रपटाची लय सापडली. त्या दोन्ही कलाकृतींचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, तरी एखादी आयडिया क्लिक होण्यासाठी दुसऱ्या कलेचा आधार मिळू शकतो, असे अभिजित देशपांडे सांगतात.

मोंटाज

देऊळ चित्रपटामध्ये भाऊंच्या (नाना पाटेकर) अनुपस्थितीत सरपंचांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा डाव आण्णा (श्रीकांत यादव) आखतो. आण्णांचे सर्व सहकारी त्यासाठी अनेक प्रकारे कामाला लागतात, ते शॉट ‘मोंटाज’ स्वरूपात जंप कटने दाखवले आहेत. पहाटेची वेळ. एका लहान मुलाला उचलून खाली ठेवले जाते.

सरपंच (आतिशा नाईक) तिरंगी किनार असलेली साडी नेसतात. सरपंचांची सासू ज्या बाजेवर झोपली आहे, ती उचलून ठेवली जाते. सरपंच तयार होऊन घरामधून निघतात. आण्णा घराला कडी घालतो.

अन्य सहकारी इतर कामे करताना दिसतात त्याचवेळी सुहास शिरसाट यांचा आवाज ऐकू येतो. “मायला, कसं असतं ना राजकारणामध्ये, काय काय करायला लागल काय माहीत.......ए दादा लाव ना जोर’’ त्यानंतर दृश्य दिसते (जे कट) आणि प्रेक्षकांना समजते, की हा डायलॉग संडासला बसलेल्या त्या मुलाला उद्देशून आहे.

मोंटाज म्हणजे अनेक दृश्यांचे छोटे छोटे तुकडे एकत्र करून दाखवणे. अनेक चित्रपटामध्ये आपण मोंटाज बघितले आहेत. डोंबिवली फास्टची टायटल्स हे एक उत्तम मोंटाजचे उदाहरण आहे. एखादी घटना थोडक्यात सांगायची असेल तर मोंटाज तंत्र वापरले जाते.

नायक-नायिका यांची एकमेकांशी ओळख झाल्यानंतर बरेच दिवस ते एकमेकाला भेटत राहिले आणि त्यांचे संबंध दृढ होत गेले असे थोडक्यात दाखवायचे असेल, तर ला ला लँडमध्ये दाखवले आहे तसे ते नायक-नायिका वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला; वेगवेगळ्या कपड्यांमध्ये गेल्याचे अनेक शॉट, अनेक जंप कट एकत्र करून दोन मिनिटात दाखवले जाते.

Movie cut
OTT Horror Movies: ओटीटीवरील 'हे' हॉरर चित्रपट नक्की पाहा!

अॅक्शन कट

ठोसा किंवा लाथ मारल्यावर त्याचक्षणी कट शॉट करून दुसऱ्या कॅमेऱ्यातून शूट केलेला पुढील शॉट दाखवला जातो. म्हणजेच अॅक्शन घडते त्यानुसार शॉट कट केला जातो, त्याला ‘अॅक्शन कट’ म्हणतात.

स्काय फॉल चित्रपटात नायक जेम्स बॉण्डच्या (डॅनिअल क्रेग) समोरच्या बाजूने भरधाव वेगात रेल्वे येते. बॉण्ड दरवाजावर धडक मारतो त्यावेळीच अॅक्शन कट आहे, आणि त्यामुळे आपण तो सीन दाराच्या आतून बघतो. कॅसिनो रॉयल (२००६), ग्लॅडीएटर, रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्कसारख्या चित्रपटातील हाणामारीच्या शॉटमध्ये आपण अॅक्शन कट बघितले आहेत.

कट अवे, क्रॉस कटिंग

सस्पेन्स / थ्रिलर चित्रपटात एखादा सीन सुरू असताना त्याचवेळी बाहेरून कोणी तरी येत आहे असा शॉट दाखविल्यास त्याला कट अवे (Cut Away) म्हणतात. दोन वेगवेगळे प्रसंग वेगवेगळ्या ठिकाणी समांतररित्या दाखवले जातात त्याला ‘क्रॉस कटिंग’ म्हणतात.

द डिपार्टेड चित्रपटामध्ये मॅट डेमन आणि लिओनार्डो डिकॅप्रिओ मोबाईलवर बोलणे ऐकत आहेत त्यावेळी क्रॉस कटिंगमध्ये दोघे जोडलेल्या शॉटमध्ये क्रमाक्रमाने दिसतात. आतल्या खोलीमध्ये एक व्यक्ती बसली आहे त्याचवेळी बाहेरून कोणीतरी हत्यार घेऊन येत आहे, असे शॉट एकामागोमाग एक दाखवले जातात (कौन, शायनिंग) त्यामुळे प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढत राहते.

गॉडफादरमध्ये चर्चमध्ये बाप्तिस्मा सुरू असताना एकामागोमाग एक खून केले जातात, अशी विरोधाभासी दृश्ये आलटून पालटून दाखवली आहेत. गॉडफादर चित्रपटामधील हा प्रसंग क्रॉस कटिंगचा प्रभावीपणे वापर केल्याचे उत्तम उदाहरण आहे.

देऊळ चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये देवळातून गायब झालेली मूर्ती नव्याने बसवण्याचे नियोजन भाऊ (नाना पाटेकर) त्यांच्या सहकाऱ्यांसह करत आहेत, त्याचवेळी केशा (गिरीश कुलकर्णी) ती मूर्ती घेऊन एका निर्जन स्थळी निघाला आहे.

इकडे नव्या मूर्तीची मिरवणूक निघाली आहे, तिकडे केशा नदीकाठी उभा आहे, असे दोन्ही ठिकाणचे प्रसंग एकाचवेळी क्रॉस कट वापरून दाखवले आहेत.

सायको चित्रपटामधील तीन मिनिटांचा शॉवर सीन तब्बल अठ्ठ्याहत्तर विविध तुकड्यांतून तयार झाला आहे.

त्या शॉटमध्ये ४५ सेकंदात ५२ वेगवान कट आहेत. ते कट मोजण्याचा प्रयत्न करून पाहा. चाकू पोटात खुपसल्याचे न दाखवताही योग्य तो परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होतो, त्याचे श्रेय दिग्दर्शक हिचकॉकच्या व्हिजनला, कल्पकतेला आणि एडिटर जॉर्ज तोमासिनीला जाते.

एडिटिंगमुळे प्रेक्षकांच्या मनावर जो परिणाम होतो त्याबद्दल पुढील लेखात.

-------------------

Movie cut
Devgiri Short Film Fest : भारत, भारतीय संस्कृती बळकट करणारे चित्रपट तयार व्हावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com