नागेश शेवाळकर
आव्हाड गुरुजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लेखन साध्या-सोप्या भाषेत असते, कथांचे विषय विद्यार्थ्यांच्या अवतीभवती असलेले असतात आणि क्वचित प्रसंगी अनुभवलेले असल्यामुळे ते बालकांना भावतात. अखेर सापडली वाट..! या संग्रहातील कथा वाचून बालकांना आणि पालकांना अनेक आकर्षक, मनमोहक, मार्गदर्शक नि मनोरंजक वाटा सापडतील हे निश्चित!
काही नावे अशी असतात, की त्यांची ओळख करून द्यायची गरज नसते, त्यांचे कार्य हाच त्यांचा परिचय असतो! असेच महाराष्ट्रातील एक सर्वदूर, शाळांमध्ये, घरोघरी पोहोचलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकनाथ आव्हाड गुरुजी! सकाळ प्रकाशन, एकनाथ आव्हाड यांची लेखणी तसेच संतोष घोंगडे यांचा कुंचला या त्रिवेणी संगमातून साकारलेले अखेर सापडली वाट..!
हे अक्षर वाङ्मय जणू समुद्रमंथनातील अमृतासम गोड! अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ, कथानुरूप चित्रे, मांडणी आणि सजावट असलेला हा बालकथासंग्रह हातात घेतला आणि एका बैठकीत वाचून काढला, इतका तो वाचनीय आहे. तीस वर्षांपेक्षा अधिक काळाच्या अध्यापनाच्या अनुभवातून बालकांचे भावविश्व, त्यांची भाषाशैली, त्यांची स्वप्ने, बालकांची कल्पनाशक्ती इत्यादी भावभावनांचा जवळून अभ्यास असल्याने, त्यांच्या भावविश्वात रममाण होत गेल्यामुळे ते सारे कागदावर उतरवताना कथांमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे, हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
अखेर सापडली वाट..! या बालकथासंग्रहात अकरा कथांचा समावेश आहे. प्रा. उषा तांबे यांची भावगर्भ प्रस्तावना लाभली असल्यामुळे संग्रहाची वाचनीयता आणि साहित्यमूल्य अधिकच वृद्धिंगत झाले आहे.