Electronic Vehicle :इलेक्ट्रिक व्हेईकल्समध्ये आता सुपर बॅटरी

इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर वाढत असला तरी अद्यापही तिची रेंज हा वापरकर्त्यांसाठी मोठा कळीचा मुद्दा ठरत आहे.
Electronic vehicle
Electronic vehiclesakal

सागर गिरमे

इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर वाढत असला तरी अद्यापही तिची रेंज हा वापरकर्त्यांसाठी मोठा कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे इच्छा असूनही ईव्ही घेण्याऐवजी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या गाड्या घेण्याकडे कल आहे.

मात्र येत्या काही वर्षात आता वापरात असलेल्या लिथियम आयन बॅटऱ्यांना बाजूला सारत रेंज, सुरक्षा, कॉस्ट इफेक्टीव्ह असणारे सुपर बॅटरी तंत्रज्ञान ईव्हीमध्ये येऊ घातलेले आहे.

शाश्वत आणि इको-फ्रेंडली वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याच्या दिशेने जागतिक वाहनक्षेत्र सातत्याने विस्तारत असल्याचे चित्र आहे. अशा वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने इलेक्ट्रिक व्हेईकल्स, आजच्या लोकप्रिय भाषेत ‘ईव्ही’, अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

या ईव्हींमुळेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन आपले भविष्य खऱ्या अर्थाने आणखीनच स्वच्छ असणार आहे. मात्र प्रत्यक्षात ईव्ही अधिकाधिक वापरात येण्यात अजूनही काही मर्यादा आहेत. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या.

या मर्यादांवर मात करत ईव्हींची कार्यक्षमता आणि व्यवहार्यता अधिकाधिक वाढविण्यासाठी सुपर बॅटऱ्या आता अगदी दृष्टिक्षेपात आहेत.

सध्या प्रचलीत असलेल्या पारंपरिक लिथियम-आयन बॅटऱ्या कार्यक्षम आहेत. मात्र ऊर्जा साठवणूक, चार्जिंगचा वेळ आणि एकूण आयुर्मान या बाबतीत या बॅटऱ्यांना मोठ्या मर्यादा आहेत.

सुपर बॅटरी तंत्रज्ञान या मर्यादांवर मात करून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवीन बदलांची शक्यता निर्माण करत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात ईव्ही मार्केट महत्त्वाची आणि मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे.

Electronic vehicle
Pune EV : पुणे होणार 'पेट्रोल'मुक्त? इलेक्ट्रिक गाड्यांना पुणेकरांची वाढती पसंती; वर्षात 30 हजारांहून अधिक ईव्हींची नोंद

नवीन तंत्रज्ञान आणि डिझाईन

या सुपर बॅटऱ्यांमध्ये उच्च ऊर्जा साठवणूक, फास्ट चार्जिंग क्षमता आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिझाईन वापरण्यात येत आहे. सुपर बॅटरी तंत्रज्ञानामध्ये सॉलिड-स्टेट बॅटरीचा विकास हे महत्त्वाचे यश मानावे लागेल.

महत्त्वाचा बदल म्हणजे सध्या वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीमध्ये ज्याप्रमाणे पारंपरिक द्रव इलेक्ट्रोलाइट वापरले जात होते, त्याऐवजी आता सॉलिड इलेक्ट्रोलाइट वापरले जात आहेत. त्यामुळे बॅटरी गरम होऊन घडणारे अपघात किंवा आगीच्या घटना टाळता येऊ शकतील आणि परिणामी ईव्ही अधिक सुरक्षित होतील.

वाढलेली सुरक्षितता, कार्यक्षमता यासोबतच सुपर बॅटऱ्या तुलनेने हलक्या आणि लहान आकारात (कॉम्पॅक्ट) असल्याने डिझाईनमध्ये वैविध्यताही आणली जाऊ शकते.

इलेक्ट्रिक वाहनांवर परिणाम

रेंजची चिंता सोडा : सुपर बॅटरी तंत्रज्ञान हे ईव्हींवर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. डिझाईनमध्ये वैविध्यता येण्यासोबतच ऊर्जा साठवणूक करण्याची मर्यादा वाढल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजची चिंता आता करावी लागणार नाही.

रेंज (बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर कापता येणारे अंतर) ही सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत जाणवणारी महत्त्वाची चिंता आहे. सुपर बॅटरी तंत्रज्ञानामुळे पारंपरिक बॅटऱ्यांच्या तुलनेत ही रेंज नक्कीच वाढलेली असेल आणि ती अधिक विश्वासार्हही असेल.

फास्ट चार्जिंग : पारंपरिक बॅटरीच्या तुलनेत सुपर बॅटरी अधिक वेगात चार्ज होऊ शकते. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर चालणारी वाहने आपण जशी खात्रीने चालवू शकतो, तशाच आता ईव्हीही वापरता येणार आहेत. बॅटरी चार्जिंगचा वेळ कमी झाल्याने ईव्हींकडे ग्राहक अधिकाधिक आकर्षित होऊ शकतील.

दीर्घायुष्य : तंत्रज्ञान हे जसे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांची किंमत वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे, तशीच त्यात वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची किंमत हेदेखील आहे. एखाद्या ईव्हीमधील केवळ बॅटरी बदलायची झाल्यास तो खर्च सर्वसामान्यांना परवडू शकत नाही.

त्यामुळे आजही ग्राहक ईव्ही खरेदी करताना बॅटरीच्या आयुर्मर्यादेचा विचार करतात. मात्र सुपर बॅटरी तंत्रज्ञानामुळे बॅटरीचे आयुष्य अनेक पटींने वाढू शकणार आहे. दीर्घायुषी असल्याने वाहनाची बॅटरी वारंवार बादलावी लागणार नाही.

नजीकच्या भविष्यात हे इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या वाहनांच्या लोकप्रियतेचे महत्त्वाचे कारण ठरू शकते.

Electronic vehicle
Nexon EV Facelift : एका कारने दुसरी होईल चार्ज; टाटाच्या नव्या इलेक्ट्रिक नेक्सॉनमध्ये मिळतायत भन्नाट फीचर्स!

ईव्हींची भारतीय बाजारपेठ मोठ्या वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात होणारी गुंतवणूक बघता हे सहजच लक्षात येते. येत्या काही वर्षात इलेक्ट्रिक मोबिलीटीचा वापर भारतात वाढणार आहे, हे निश्चित आहे.

त्यामुळेच केंद्र सरकारच्या पुढाकाराने ईव्ही वापराला चालना देण्यासाठी पर्यावरण जागरूकतेसह देशामध्ये सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे.

भारतीय वाहन उद्योगाची ईव्ही उत्पादन करण्याची क्षमता वाढत असली तरी बॅटऱ्यांच्या बाबतीत भारत अद्यापही इतर देशांवर अवलंबून आहे.

या अधिक प्रगत सुपर बॅटरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि फास्टर अॅडॉप्शन ऑफ हायब्रीड अॅण्ड इलेक्ट्रिक व्हेइकल्स-2 (Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles, एफएएमई-2) योजनेच्या माध्यमातून अनुदान देऊन देशांतर्गत संशोधन आणि विकासाला चालना देण्यात येत आहे.

त्यामुळे लवकरच संपूर्ण भारतीय बनावटीची ईव्हीही बघायला मिळू शकेल. आपल्या वाहन उद्योगावर सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणाम तर होणारच आहे.

मात्र त्यापलीकडे जाऊन देशातील गुंतवणूक विकास आणि रोजगार निर्मितीवरही याचा परिणाम होईल. यासोबतच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या आणि शाश्वत वाहतूक व्यवस्था निर्मितीच्या दिशेने वेगाने पावले टाकली जाणार आहेत.

Electronic vehicle
EV Charging : ‘इव्ही’ चार्जिंगसाठी एकच वीजदर; स्वतंत्र मीटरद्वारे मिळणार योजनेचा लाभ

सहयोग हवा

ईव्हींमध्ये सुपर बॅटरी तंत्रज्ञानाच्या वापराचे आशादायी चित्र असले तरी बॅटरी उत्पादनाचा खर्च, स्केलेबिलिटी आणि पर्यावरणावर पडणारा प्रभाव ही आव्हाने समोर आहेतच. त्यावर मात करण्यासाठी सरकार, वाहन उत्पादक कंपन्या आणि संशोधन संस्था यांच्यात परस्पर सहयोगाची भावना असणेही अपेक्षित आहे.

सुपर बॅटरी तंत्रज्ञानाचा अवलंब हे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणारे आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक बॅटरीमुळे निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शाश्वत अशा इलेक्ट्रिक ऑटोमोटिव्ह भविष्याकडे जाण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होतो.

इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे प्रकार

सॉलिड-स्टेट बॅटरी: या बॅटऱ्यांमध्ये पारंपरिक द्रव इलेक्ट्रोलाइटऐवजी घन इलेक्ट्रोलाइटचा वापर करतात. त्यामुळे त्या अधिक सुरक्षित, स्थिर आणि वेगाने चार्ज होतात.

लिथियम-सल्फर बॅटरी: या प्रकारच्या बॅटऱ्यांमध्ये ऊर्जा साठवण करण्याची क्षमता लक्षणीयरित्या जास्त असते. मात्र आयुर्मानाच्या बाबतीत यावर अद्याप संशोधन सुरू आहे.

मेटल-एअर बॅटरी: या बॅटऱ्यांमध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिअॅक्शनसाठी हवेतील ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यामुळे त्या विविध आकारात, वजनाने हलक्या असू शकतात. मात्र हे तंत्रज्ञान विकासाच्या अगदी पहिल्या टप्प्यावरच आहे.

-------------

Electronic vehicle
EV Charging : सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; थांबण्याचीही गरज नाही! 'वायरलेस चार्जिंग'चा पायलट प्रोजेक्ट सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com