सातपुड्यात अनुभवा निसर्ग वैभवासह अहिराणी भाषेचा गोडवा!

सातपुडा पर्वताच्या कुशीत उंचावर असलेले तोरणमाळ हे ठिकाण. उंच पर्वत, नागमोडी रस्ते, घनदाट झाडी असे सुंदर निसर्गचित्र
satpuda moutain
satpuda moutainesakal

धनंजय उपासनी

फारच सुंदर संध्याकाळ होती ती! आकाशात सोनेरी रंगाची उधळण, दरीतून येणारा पक्ष्यांचा आवाज, सातपुड्याच्या डोंगररांगांमधील नीरव शांतता असे निसर्गाचे विविध पैलू अनुभवत आम्ही सगळेजण त्या रमणीय संध्याकाळचा आनंद घेत बाकावर बसलो होतो.

दरवर्षी परिवारासह भटकंती नियोजन सुरू असते. कधी एखाद्या व्याघ्रप्रकल्पाला भेट द्यावी, कधी हिमालयाच्या रांगा बघाव्यात, कधी कास पठारावर असलेली फुले बघावी, कधी एखादा गड बघावा, कधी माळरानावरील पक्षी बघावे;

अशी निसर्गाची विविध रूपे बघत असताना कधी निसर्गातील गंध आठवावे, कधी जंगलातील निसर्ग साखळी आठवावी, कधी आकाशातील बगळ्यांची रांग आठवावी, कधी व्यक्ती तर कधी वस्तू, कधी लोकजीवन आठवावे, पुढील प्रवासात मागील आठवणींचे स्मरण करावे.

कधीतरी आपण घरात असलेली एखादी जुनी पेटी उघडून बघत असताना काही जुन्या वस्तू समोर येतात किंवा फोटोचा अल्बम उघडून बघत असताना एका पाठोपाठ आठवणी समोर यायला लागतात तेव्हा सुरू झालेली ती स्मरणयात्रा फार आनंद देणारी असते.

अशीच आनंद देणारी एक वस्तू मला तोरणमाळच्या प्रवासात दिसली. त्या वस्तूमुळे माझ्या मनातील स्मरणयात्रा सुरू झाली. आठवणीचा प्रवेश भूतकाळाच्या दालनात झाला.

एका सुट्टीत सातपुडा भागातील थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळला जायचे नियोजन झाले. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील मित्रपरिवार तोरणमाळ येथे जात असल्याने तिकडे कसे जायचे? अशी सगळी माहिती मिळाली.

धुळे येथील मित्र मुकेश पाटील याचे या ठिकाणी खूप वेळा जाणे असल्याने त्यानेही कसे जावे, कुठे राहावे, साधारण काय बघता येईल अशी सविस्तर माहिती दिल्याने तयारीचा हुरूप वाढला.

satpuda moutain
Social Media Addiction: ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’मुळे होतोय लहान मुलांच्या मानसिक आरोग्याशी खेळ ; मेटा विरोधात खटला दाखल

शहादा या ठिकाणी पोहोचलो. शहादा येथून एसटीने, जीपने तोरणमाळला जाता येते असे माहिती होते. आम्ही कसे जावे? असा विचार करत एका जीपजवळ उभे होतो.

आजूबाजूला असलेल्या लोकांच्या गप्पा सुरू असताना अहिराणी भाषेचा वापर अधिक असल्याचे जाणवले.

जसे निसर्गाचे आपले सौंदर्य असते, तसे त्या त्या भागातील भाषेचेही सौंदर्य असते. वेगळ्या भाषेतील काही वाक्ये कानावर येत होती. खानदेशात जाणे येणे असल्याने अहिराणी भाषेची थोडी थोडी ओळख आहे.

बरोबर असलेल्या अहिराणी भाषेतील जाणकारांना काही वाक्यांचा अर्थ विचारत होतो. ‘कथा जाई रायनात?’ असे एक वाक्य कानावर पडले, तेव्हा त्याचा अर्थ ‘कुठे चाललात किंवा कुठे जाणार आहात?’ असा समजला.

आम्ही सांगितले, ‘तोरणमाळले जायी रायनू.’ मग त्या जीपवाल्या दादाने विचारले, ‘किती जण शेतस?’ अशा प्रकारे जमेल तसा संवाद प्रयत्नपूर्वक सुरू होता.

त्यांची मेहनत आणि श्रम बघून आम्हीही तो म्हणेल तसे या भावनेने हो म्हणालो, तेव्हा त्या दादाने ‘बठा’ म्हणजे ‘बसा’ असे म्हणून हाताने खुणावले आणि जीपने प्रत्यक्ष प्रवास सुरू झाला.

भाषा दोन वेगवेगळ्या प्रांतातील लोकांना जोडणारा सेतू असतो. आपली भाषा आपले वैभव असते. त्या भागात जाऊन ती बोलीभाषा बोलली तर परिसर आणि त्या परिसरातील लोक अधिक जवळ आल्यासारखे जाणवते.

तोरणमाळ हे सातपुडा पर्वतरांगेतील १,४६१ मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. सकाळ असल्याने वातावरणात छान गारवा होता. राणीपूर नावाच्या गावातून जीपने सातपायरी या भागाकडे वळण घेतले.

सातपुडा पर्वताच्या कुशीत उंचावर असलेले तोरणमाळ हे ठिकाण. उंच पर्वत, नागमोडी रस्ते, घनदाट झाडी असे सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत होतो.

सातपायरी भागातून गाडीने प्रवास सुरू असताना एका गावातून गाडी पुन्हा वळली. काही वळणे फार आनंद देणारी असतात; मग ती आयुष्यातील असो अथवा प्रवासातील वाटेवरची.

satpuda moutain
Andaman Tour Package : मार्चमध्ये अंदमानला फिरायला जाण्याचा करा प्लॅन, IRCTC घेऊन आलय तगडं पॅकेज

प्रवासात एका कौलारू घराच्या अंगणात अचानक बंब दिसला. निसर्ग बघताना मन जरा निवांत क्षण अनुभवत असते. अंगणातील तो बंब बघून मन भूतकाळात गेले. लहान असताना मामाच्या गावाला जायचो, तो प्रवास या वळणावर आठवला.

मामाचे गाव त्याच्या घरातील वस्तूंसह डोळ्यासमोर आले. लहानपण किती निरागस असते ना.. निरागसता आपल्याला निस्वार्थ प्रेम आणि आपलेपणाची भावना शिकवत असते, म्हणून बालपणाचा काळ सुखाचा असतो.

कारण बालपणात संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला, प्रसंगाला बालमन आपुलकीच्या नात्याने घट्ट चिकटून बसते. काही व्यक्ती जशा मनात असतात तशाच काही वस्तूसुद्धा स्मरणात असतात. या वळणावर बंबाचे स्मरण झाले आणि बालपणाच्या आठवणींचा सुगंध दरवळला.

तोरणमाळचा प्रवास वळणदार असल्याने आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला संध्याकाळ झाली होती. राहण्याची सोय झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे जाता येईल? याचे नियोजन केले.

थंडीचे प्रमाण जास्त असल्याने जेवण झाल्यावर तिथे असलेल्या गावकरी मंडळींबरोबर थोड्या गप्पा मारून वेळेतच झोपायला गेलो. सकाळी लवकर जाग आली. चहाची आठवण झाली म्हणून बाहेर बघितले, तर जवळपास चहा मिळेल अशी काही चिन्हे दिसत नव्हती.

चहाचे दुकान शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर हवेत गारवा खूपच जास्त होता. छोटी बाजारपेठ असते तसा एक चौक दिसला. सगळी दुकाने बंद होती. आजूबाजूला असलेल्या घरांतही थंडीमुळे जाग आलेली नव्हती.

आणखी थोडे चालत गेल्यावर चहाचे दुकान दिसले. थोडा वेळ तिथे गप्पा झाल्यावर तिकडून एक वाट पाणवठ्यावर जात असल्याचे समजले. माझ्यातील पक्षीमित्र जागा झाल्याने मी पाणवठ्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

एवढ्या उंचीवर एक प्रचंड जलाशय बघून फार नवल वाटले. पाण्यातील पक्षी बघून तळ्याकाठी थोडा वेळ बसलो असताना एक स्थानिक व्यक्ती मला भेटली.

त्यांच्याशी बोलत असताना, हा तलाव कायम असाच पाण्याने भरलेला असतो आणि या तलावाला यशवंत तलाव म्हणतात, असे त्यांनी सांगितले.

तलावाच्या काठावरून फेरफटका मारून झाल्यावर पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आलो. भूक लागलेली असल्याने थोडे खाऊन पुन्हा जीपने तोरणमाळमधील वेगवेगळे भाग बघण्यासाठी भटकंती सुरू झाली.

काही अंतर गेल्यावर अजून एक तलाव दिसला. गाडी थांबवून तलावाच्या दिशेने गेलो, तर तो तलाव कमळासारख्या दिसणाऱ्या फुलांनी पूर्णपणे भरलेला होता.

फारच सुंदर दृश्य होते ते. हिरव्या पानावर उमललेली ती छोटी कमळे निळ्या पाण्यावर तरंगताना फार छान दिसत होती.

एक छोटा मुलगा तिथे होता. त्याला विचारले, ‘या तलावाचे नाव काय आहे?’ तर त्याने कमळ तलाव असे सांगितले.

satpuda moutain
Beautiful villages: जगातील सर्वात सुंदर गावे आयुष्यात एकदा तरी भेट द्याच...

जीपने पुढे निघालो. मातीतून जाणारा रस्ता, घरांची सुबकता आणि पुढे अंगण अशी रचना होती. उंचावरून लांबवर काही गावे आणि पाडे दिसत होते; पण तिकडे जाण्यासाठी बहुतेक ठिकाणी पक्क्या रस्त्यांऐवजी पाऊलवाटा दिसत होत्या.

गावातील वेगळेपण बघत बघत प्रवास खडकी मचाण नावाच्या ठिकाणाकडे सुरू झाला. संध्याकाळ व्हायला लागल्याने पुन्हा थंडीचे प्रमाण वाढायला लागले होते.

जीपच्या दादाने सांगितले, ‘या जागेवर थोडा वेळ थांबू, या ठिकाणी सनसेट भारी दिसतो.’ एक पत्र्याची शेड बांधलेली होती आणि काही बाक बसायला ठेवलेले होते.

आम्ही सगळा परिवार त्या रमणीय संध्याकाळचा आनंद घेत बाकावर बसलो होतो. फारच सुंदर संध्याकाळ होती ती! आकाशात सोनेरी रंगाची उधळण, दरीतून येणारा पक्ष्यांचा आवाज, सातपुड्याच्या डोंगररांगांमधील नीरव शांतता असे निसर्गाचे विविध पैलू अनुभवत असताना आम्हाला अजून एक चमत्कार तिकडे दिसला.

आमचा सगळा परिवार निसर्गप्रेमी असल्याने निसर्गाच्या कोणत्याही घटकाला आपल्यामुळे नुकसान होणार नाही याबाबतीत आम्ही सदैव दक्ष असतो.

म्हणजे झाले असे, सूर्यास्ताचा तो देखावा बघत असताना आम्हाला जमिनीवर हालचाल दिसली. थोडा अंधार झाला होता म्हणून आहे त्याठिकाणी बसूनच जमिनीकडे नीट बघितले, तर एक मोठा साप डोंगरावरून खाली जाणाऱ्या पायवाटेच्या दिशेने जाताना दिसला.

अंतर आणि थोडा अंधार होता तरी तो साप जेवढा वेळ दिसला तेवढ्या वेळात जयराजने बघितला.

त्याला पक्षी, प्राणी आणि सापांची माहिती असल्याने दिसलेला साप मराठीत ज्याला काळतोंड्या आणि इंग्रजीत Dumeril’s black headed snake म्हणतात तो होता, असे वाटले. लालसर तपकिरी शरीरावर छोट्या काळ्या ठिप3क्यांची रांग असते.

काळे डोके, लांब गोलाकार शरीर, लांब निमुळती शेपूट असल्याचे दिसल्याने हा बहुतेक काळतोंड्या साप असावा असे वाटले. जंगलात जाऊन वाघ दिसल्यावर जसा आनंद मिळतो ना तसाच आनंद आम्हाला हा साप बघून मिळाला.

प्राणी, पक्षी, कीटक, वेली, फुलपाखरू जंगलातील त्यांच्या अधिवासात अधिक प्रसन्न आणि स्वच्छंदी वाटतात, कारण त्यांना त्यांच्या अधिवासात सुरक्षितपणाची भावना जाणवत असते. आपले मानवाचेही जीवनसूत्र असेच तर असते ना!

आपणच निसर्गाचे कवच होऊन निसर्गाचा समतोल साधला तर निसर्ग आपल्याला कायमच आनंद देत राहील, असा विचार करून आम्ही होतो त्याच ठिकाणी शांतपणे सुरक्षित अंतर ठेवून बसलो होतो.

साप दिसेनासा झाल्यावर आम्ही जीपमध्ये बसून आमच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो. थोडे अंतर गेल्यावर अजून एक चमत्कार दिसला.

एक ससाणा झाडावर बसलेला होता. आमची चाहूल लागल्यावर त्याने पंख उघडून खोल दरीच्या दिशेने घेतलेली झेप फारच आनंद देणारी होती. दिवस संपला आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.

satpuda moutain
Ancient Recipes : आजही खाल्ले जातात महाभारताच्या काळातील 'हे' पदार्थ; नावं ऐकून व्हाल चकित

यशवंत तलावावर सुरू झालेला दिवस संध्याकाळपर्यंत फारच आनंद देणारा होता. रुचकर जेवण झाल्यावर मी काही गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करायला गेलो. पुन्हा अहिराणी मिश्रित मराठी भाषेचा संवाद सुरू झाला.

एका काकांनी मला विचारले, ‘जेवण व्हयन का?’ मी आपले मान हलवून हो म्हणालो. त्यांनी तोरणमाळची माहिती सांगताना महाशिवरात्रीच्या सुमारास येथे मोठी यात्रा भरते, होळीचा उत्सव फार धामधुमीत साजरा केला जातो असे सांगितले.

‘भलती जोर मा राहस आमनी होळी.’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच एकदा होळीला सहभागी व्हायलाच पाहिजे असे वाटत होते.

गार वारा वाढत होता आणि झोपही खूपच येत असल्याने त्या प्रेमळ लोकांचा निरोप घेऊन एक सुंदर दिवस मनात साठवून गाढ झोपलो.

वेळेचे बंधन असल्याने परतीचा प्रवास सुरू करावा लागणार होता. जीपने तोरणमाळहून शहाद्याकडे जाताना नाथांचे एक पवित्र स्थान आहे. त्या स्थानाला मच्छिंद्रनाथांची गुंफा असे संबोधले जाते.

नाथांचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करायचे नियोजन झाले. त्याठिकाणी गेल्यावर थोड्या पायऱ्या उतरून गेल्यावर खोल गुहेत हे पवित्र ठिकाण आहे. फार छान आणि शांत वाटत होते त्या परिसरात.

आता पुन्हा सातपायरी घाटातून प्रवास सुरू झाला होता. तोरणमाळच्या निसर्गाने भरभरून आनंद दिला होता... दिवाळीची सुट्टी सातपुडा पर्वताच्या भागात घालवली होती म्हणून आनंदाचे दिवे अधिकच प्रकाशमान झाले होते.

पण मनात बंबाची प्रज्वलित झालेली आठवणीची ज्योत मात्र अजून तेवतच होती. बंब पुन्हा आठवला.

मला वाटते बहुतेक कळत-नकळत बंबाशी सगळ्यांचा संबंध येत असतो. बंब म्हणजे आपल्या ग्रामीण जीवनशैलीची ओळख सांगणारा एक धागा आहे. बंब म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेली संस्कृती आहे.

गावाला राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबा-मामा-मावशी यांचा लाकूड आणि कोळसा यावर चालणारा गिझर म्हणजे बंब.

गावाकडच्या आठवणी पिंपळपानासारख्या असतात. पान वाळले तरी आठवणी कायम असतात. काही आठवणी या पानात ठेवायच्या असतात तर काही मनात ठेवायच्या असतात. दरवळणाऱ्‍या आठवणी आयुष्याला नवा अर्थ देत असतात.

तोरणमाळचा प्रवास संपला होता. जीप आता शहादा एसटी स्थानकावर पोहोचली होती. तोरणमाळ फार छान आणि शांत ठिकाण तर आहेच, पण त्याचबरोबर आपलेपणाची भावना जपणाऱ्या प्रेमळ माणसांचा सहवाससुद्धा तिथे आहे. पर्यटक मात्र फारसे नव्हते. एकदा तरी याठिकाणी जाऊन हा अनुभव घेतलाच पाहिजे.

जीपवाल्या दादाला ‘भेटू परत!’ असे सांगत असताना तो अतिशय प्रेमाने म्हणाला, ‘भाऊ, येत जात रावा आमना तोरणमाळले.’ तोरणमाळने निसर्गाचा आनंद तर दिलाच, पण बंबाच्या आठवणीतील ही स्मरणयात्रा विशेष आनंद देणारी होती.

कधी झाडावर, कधी फुलावर, कधी निसर्गाच्या विविधतेवर प्रेम करावे. पण विस्मरणात गेलेल्या वस्तूंची पण स्मरणयात्रा करावी म्हणजे जीवन सुंदर आहे ते अधिकच सुंदर वाटायला लागते.

-----------------------

satpuda moutain
Ayodhya Ram Mandir Inauguration : विराट पोहचला अयोध्येत; हरभजनही Video शेअर करत म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com