सुधाकर कुलकर्णी
वयाच्या चाळिशीत असलेल्यांनी आर्थिक नियोजनासाठी अजून आपल्या हातात वेळ आहे हे लक्षात घ्यावे आणि आयुर्विमा, मुलांचे शिक्षण, आपली सेवानिवृत्ती व आरोग्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे. गरज आहे ती वेळ न दवडता लगेच सुरुवात करून त्यात सातत्य राखण्याची.
सर्वसाधारणपणे वयाच्या पंचविशीच्या सुमारास नोकरी किंवा व्यवसायाची सुरुवात होते, आणि पुढील एक-दोन वर्षांत लग्न होऊन संसारास प्रारंभ होतो. प्रारंभीच्या काळात असणारे उत्पन्न लग्नानंतर पुरेसे असतेच असे नाही. बऱ्याचदा बेताच्या उत्पन्नाची आणि खर्चाची सांगड घालण्यासाठी आवश्यक ती काटकसर करावी लागते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बचत करणे गरजेचे आहे हे समजूनसुद्धा बचत करता येतेच असे नाही.
विशेषतः घरात जेव्हा एकटीच व्यक्ती कमावती असते, तेव्हा हे प्रकर्षाने दिसून येते. दोघेही जरी कमावते असले, तरी सुरुवातीच्या काळात मौजमजा करण्याकडे कल असल्याने शक्य असूनसुद्धा बचत केली जात नाही.
मात्र वयाची चाळिशी पार करताना विचारांची व आचारांची बऱ्यापैकी परिपक्वता आल्याने आपले आर्थिक नियोजन व त्या अनुषंगाने करावी लागणारी बचत या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. या दरम्यान नोकरी/व्यवसायात स्थैर्य आलेले असते.
तसेच उत्पन्नातही बऱ्यापैकी वाढ झालेली असते. मात्र नेमके आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत अनभिज्ञता दिसून येते. त्यादृष्टीने चाळिशीनंतर आर्थिक नियोजन कसे करावे हे पाहू.