अभागी प्रतिभावंत शिल्पकर्ती

शिल्पकलेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो, तेव्हा तेव्हा मायकेलअॅंजेलो पाठोपाठ रोदॅंचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं
शिल्पकलेचा इतिहास
शिल्पकलेचा इतिहास esakal

डॉ. सुहास भास्कर जोशी

खरंतर जर-तरच्या भाषेला काहीच अर्थ नसतो. पण पुन्हापुन्हा असं वाटत राहतं, की जर तिला थोडं प्रेम, थोडं कौटुंबिक सुख आणि थोडं निर्भेळ कौतुक मिळालं असतं तर...? रोदॅंबरोबर सुखी वैवाहिक जीवन तिला लाभलं असतं तर...? तिचं मानसिक संतुलन हरपलं नसतं तर...?

शिल्पकलेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जातो, तेव्हा तेव्हा मायकेलअॅंजेलो पाठोपाठ रोदॅंचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं, हे खरंय. ‘थिंकर’, ‘ब्रॉन्झ एज’, ‘द किस’, ‘गेट्स ऑफ हेल’ अशा महान शिल्पकृतींचा निर्माता रोदॅं हा सार्वकालिक थोर प्रतिभावंत होता, हेही कबूल. पण रोदॅंचीच प्रिया, स्फूर्तीदेवता आणि मुख्य म्हणजे त्याकाळची एकमेव प्रतिभावान शिल्पकर्ती असणाऱ्या अभागी फ्रेंच स्त्री कलाकाराचं नाव आज किती जणांना ठाऊक आहे?

नियतीचा खेळपण मोठा विलक्षण असतो. ती एका हातानं काही गोष्टी अनपेक्षितपणे भरभरून देते, तर त्याच वेळी दुसऱ्या हातानं काही मूलभूत, हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी निष्ठुरपणे काढूनही घेते. मोठ्या उमेदीनं सुरू केलेल्या डावाची विजयी सुरुवात होते, पण मग एकाएकी प्रतिकूल दान पडायला लागतं. विपरीत घटनांची मालिकाच चालू होते. मोठ्या विश्वासानं ज्याच्या खांद्यावर मान टाकावी, तीच व्यक्ती पाठीत खंजीर खुपसतेय की काय, या संशयानं सारी मानसिक शांती उद्ध्वस्त होते.

शिल्पकलेचा इतिहास
Sambhaji Nagar : कर वसुलीसाठी आता नवा पॅटर्न, महिनाभरात अंमलबजावणी; पालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

अशा प्रत्येक वेळी माणसं कोलमडून पडतात. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक संतुलन घालवून बसतात. स्वतःला दोष देत दिवाभीतासारखं पराभूत जिणं जगतात, नाहीतर सारासार विवेकबुद्धी गमावून इतरांवर बेछूट आरोप करत राहतात. बऱ्याचदा अशी अभागी माणसं कुढत, खंगत शेवटच्या दिवसाची वाट पाहत बसतात.हे सगळंच तिच्या बाबतीत घडलं. विधात्यानं दिलेलं अप्रतिम सौंदर्य, शिल्पकलेतील प्रातिभ कौशल्य, श्रेष्ठ शिल्पकार रोदॅंची प्रिय शिष्या-प्रेयसी होण्याचं लाभलेलं भाग्य, पॅरिसच्या रसिकांकडून होऊ लागलेलं कौतुक... कोणत्याही उदयोन्मुख कलाकाराला आणखी काय हवं असेल?

पण तिच्या बाबतीत हे सारं चित्र बघताबघता फिसकटून गेलं. काही ढोंगी दुढ्ढाचार्यांनी तिच्या धाडसी, नग्न शिल्पकृतींविरुद्ध कोल्हेकुई सुरू केली. काही हितशत्रू समीक्षकांनी, हिची शिल्पं म्हणजे रोदॅंच्या कलाकृतींच्या निव्वळ नकला आहेत, असा ओरडा चालू केला. झारीतील काही शुक्राचार्यांनी तिला सरकारी कामं आणि आर्थिक अनुदानं मिळू नयेत म्हणून प्रयत्न केले. ‘रोदॅंची रखेल’ म्हणून समाजात छी थू सुरू झाली. लग्नाचं वचन देऊनही नंतर कानावर हात ठेवणाऱ्या रोदॅंशी संबंध तर तिने तोडलेच, पण पोटात वाढणारा त्याचा अंशही खुडून टाकला. आईनं-बहिणीनं तर तिचं नाव आधीच टाकलं होतं.

शिल्पकलेचा इतिहास
Sambhaji Nagar : जि.प.च्या शिक्षण विभागात भरली उर्दू शाळा; शाळेत शिक्षक नसल्याने पालक आक्रमक

एकाकी, निराश, भुकेकंगाल अवस्थेत तिचं मानसिक संतुलन पार बिघडलं. सारं जग-विशेषतः रोदॅं आपल्या जिवावर उठलाय, या भ्रमानं तिला पछाडलं. याचं इतकं टोक गाठलं गेलं, की एके दिवशी भावानं तिला उचललं आणि पॅरिसजवळच्या मनोरुग्णालयात भरती केलं. काहीशी भ्रमिष्ट पण वेडी नसलेली ती सुटकेसाठी अयशस्वी प्रयत्न करत राहिली. आईचा तर हिच्यावर इतका राग, की स्वतः तर कधी भेटायला गेली नाहीच, पण जिवंत असेपर्यंत कोणालाही तिला भेटायला जाऊ दिलं नाही. ७९ वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या तिच्या आयुष्यातील एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीस वर्षं मनोरुग्णालयात खितपत पडून गेली आणि ती तशीच एकाकी मरण पावली. ही महान प्रतिभावान पण अभागी फ्रेंच शिल्पकर्ती म्हणजे –कॅमिली क्लॉडेल (Camille Claudel, १८६४ -१९४३).

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्त्रियांना शिल्पकलेचं शिक्षण घ्यायला परवानगी नव्हती. तथाकथित समीक्षक स्त्री-कलाकारांकडं आणि त्यातही नग्न शिल्प करणाऱ्या स्त्री-कलाकारांकडं कुचेष्टेने पाहत होते. ‘रोदॅंची भ्रष्ट सावली’ म्हणून समाजात कॅमिलीची हेटाळणी होत होती. तेव्हा या सर्व गोष्टींना न जुमानता प्रचंड कष्ट, जबरदस्त जिद्द आणि विलक्षण शिल्पकौशल्य यांच्या जोरावर कॅमिलीने उत्तमोत्तम शिल्पं निर्माण करून स्वतःचं स्वतंत्र आणि लक्षवेधी स्थान निर्माण केलं.

शिल्पकलेचा इतिहास
Sambhaji Nagar : शिक्षकांअभावी शाळा पडल्या ओस; शिक्षकांची तब्बल २२७ पदे रिक्त, जिल्हा परिषदेत कसे मिळणार दर्जेदार शिक्षण ?

८ डिसेंबर,१८६४ रोजी फ्रान्समधील मॉन्तपारसी या गावी कॅमिलीचा जन्म झाला. कॅमिलीच्या चित्र-शिल्पकलेतील कौशल्याबद्दल तिच्या आईला लहानपणापासून कधीच कौतुक वाटलं नाही. पण तिचं चित्रकलेवरचं प्रेम आणि तिनं वयाच्या तेराव्या वर्षी बनवलेलं डेव्हिड आणि गोलियाथचं शिल्प बघून कॅमिलीच्या वडिलांनी आई-बहीण-भावासह तिला उच्च शिक्षणासाठी पॅरिसला पाठवून दिलं.त्याकाळी पॅरिसमधील कलाक्षेत्र समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असलं, तरी ते स्त्री-कलावंतांना विशेष प्रोत्साहन देणारं नव्हतं. कॅमिलीला सुप्रसिद्ध एकोल द ब्यू आर्ट या कलाशाळेत प्रवेश मिळाला नाही. अखेरीस बऱ्याच खटपटीनंतर तिला अॅकॅडमिया कोलारोसी या कलाशाळेत प्रवेश मिळाला; आणि तिचं कलाशिक्षण सुरू झालं.

याच काळात कॅमिलीच्या आयुष्यावर जबरदस्त प्रभाव पाडणाऱ्या आणि तिच्या आयुष्याची वाताहात होण्यासही कारणीभूत ठरलेल्या महान शिल्पकार रोदॅंशी तिची भेट झाली. ते वर्ष होतं १८८२. रोदॅंचं वय होतं ४२, तर कॅमिली अवघ्या १८ वर्षांची उत्साहानं सळसळणारी उदयोन्मुख शिल्पकार होती. रोदॅं बऱ्याचदा तिच्या स्टुडिओमध्ये येऊन शिल्पकलेबाबत मार्गदर्शन करत असे, तर कॅमिली साहाय्यक म्हणून रोदॅंच्या शिल्पातील मानवाकृतींच्या हाता-पायांवर काम करत असे. सतत एकत्र काम करण्याचा परिणाम म्हणजे रोदॅं आणि कॅमिली यांच्या शिल्पकृतींवर, म्हणजे विषय आणि शैली या दोन्हींवर, एकमेकांचा प्रभाव पडत गेला. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोदॅं कॅमिलीच्या प्रेमात पडला. (या काळात रोदॅं रोझ बरेट नावाच्या मॉडेलबरोबर लग्नाशिवाय राहात होताच, शिवाय त्याला एक मुलगापण होता.) सुरुवातीला रोदॅंकडं एक गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहणारी कॅमिलीही हळूहळू त्याच्या प्रेमात पडली. शिल्पकार म्हणून कॅमिलीचे करिअर घडवण्याचे आश्वासन तर रोदॅंने दिलेच, पण सहा महिन्यांच्या आत तिच्याशी लग्न करण्याचे वचनही त्याने कॅमिलीला दिले.

शिल्पकलेचा इतिहास
Sambhaji Nagar Crime : पोलिसांनी जप्त केली धारदार तलवार

अक्षरश: बारा बारा तास काम करणाऱ्या कॅमिलीचं कर्तृत्व या काळात पूर्णपणे बहराला येत होतं. तिनं केलेली ‘द वॉल्ट्‌झ’, ‘सकुंतला’ आणि रोदॅंचा ‘बस्ट’ ही शिल्पं उत्कृष्ट जमली होती. ‘द वॉल्ट्‌झ’ या शिल्पामध्ये नृत्यात मग्न, एकमेकांच्या मिठीत, एका बाजूला झुकलेलं नग्न स्त्री-पुरुष युगुल दिसतं. विलक्षण कल्पनाशक्ती आणि काव्यमय गतीमानता यांचा सुरेख संगम या शिल्पात दिसून येतो. याचं पूर्ण उंचीचं संगमरवरी शिल्प उभारण्याकरता कॅमिलीने फ्रेंच सरकारकडे प्रस्ताव दिला. पण या शिल्पातील स्त्री-पुरुष एकमेकांच्या फार निकट असल्याचे कारण सांगून तिचा प्रस्ताव नाकारला गेला. ‘सकुंतला’ किंवा ‘ल अॅबॅंडन’ (Sakountala or Çacountala) हे शिल्प राजा दुष्यंत आणि त्याने केलेला शकुंतलेचा त्याग या कथेवर आधारित आहे.

रोदॅं हा रोझ बरेटच्या आहारी जाऊन आपल्याला सोडून तर देणार नाही ना, या विचाराने ग्रस्त कॅमिलीने हे शिल्प तयार केलं होतं. या शिल्पातील पुरुष गुढगे टेकून बसला आहे. तो उभ्या, किंचित वाकलेल्या स्त्रीच्या कमरेला मिठी मारून आपल्या चुकीची कबुली देत आहे. यातील स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यांवरील भावदर्शन विलोभनीय आहे. तिने १८८९ साली केलेला आणि १८९२ साली सलोंमध्ये प्रदर्शित झाल्यावर कौतुकास पात्र ठरलेला रोदॅंचा ‘बस्ट’ किंवा शिरोशिल्पही उल्लेखनीय आहे. कॅमिली क्ले, टेराकोटा, प्लास्टर, ब्रॉन्झ आणि संगमरवर अशा विविध माध्यमात सारख्याच ताकदीने काम करत होती.

१८९२नंतर मात्र कॅमिलीचं रोदॅंबरोबर बिनसत गेलं. रोझला सोडून रोदॅं आपल्याशी विवाह करत नाही हे जाणवल्यामुळे ती शोकसंतप्त झाली. त्यात पुन्हा गर्भपात झाल्यामुळे (किंवा केल्यामुळे) ती निराश, दु:खी, एकाकी अवस्थेत होती. मात्र असं असलं तरी तिचं शिल्पकर्तृत्व या काळात कळसाला पोहोचलं होतं. त्या काळातील तिच्या शिल्पांमध्ये ‘द एज ऑफ मॅच्युरिटी’, ‘क्लोदो’, आणि ‘पेरसस अॅण्ड गोरगॉन’ या संतप्त मनःस्थितीतल्या पण उत्कृष्ट शिल्पांचा समावेश होतो. यातही ‘द एज ऑफ मॅच्युरिटी’ ऊर्फ ‘पाथ ऑफ लाइफ’ या विविध माध्यमात सादर झालेल्या आणि रोदॅंबरोबरचे संबंध बिघडण्यास कारणीभूत ठरलेल्या समूहशिल्पाचा विशेष उल्लेख करावयास हवा.

शिल्पकलेचा इतिहास
Solapur : आ.अवताडेंच्या गाव भेट दोंऱ्यात प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी; कारवाईच्या सुचना

सुरुवातीला यामध्ये कॅमिलीने गुडघ्यावर बसलेली नग्न तरुणी कोणाची तरी याचना करताना दाखवली होती. तिनं या शिल्पाचं नाव ‘द इम्प्लोरर’ (The Implorer) असं दिलं होतं. रोदॅंने हे पाहून तिच्या समूहशिल्पाला फ्रेंच सरकारचं अनुदान मिळावं म्हणून प्रयत्न सुरू केले. मात्र लवकरच प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये सादर केलेलं संपूर्ण समूहशिल्प पाहिल्यावर, आपलं खासगी आयुष्य सार्वजनिकरित्या मांडलंय, असं समजून रोदॅं नाराज झाला. या समूहशिल्पात तीन मनुष्याकृती दाखवल्या होत्या. यातील गुडघ्यावर बसलेली तरुणी हात उंचावून एका मध्यमवयीन पुरुषाची याचना करताना दाखवली होती.

पण तो पुरुष एका वृद्ध, कुरूप स्त्रीच्या कचाट्यात सापडला असून, ती वृद्धा त्याला फरफटत नेताना दिसत होती. काही समीक्षकांच्या मते या शिल्पकृतीमध्ये आयुष्यातील अपरिहार्य टप्पे दाखवले असून, वृद्धत्व मध्यमवयीन पुरुषाला तारुण्यापासून फरफटत नेत आहे. समूहशिल्पातील संरचना, गतीमानता आणि भावनांचं उत्कट प्रकटीकरण यामुळे हे शिल्प एक सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृती ठरले होते.पण रोदॅंच्या मते यातील याचना करणारी तरुणी म्हणजे कॅमिली, तिची विनंती अव्हेरणारा पुरुष म्हणजे रोदॅं आणि त्याला फरफटत नेणारी कुरूप वृद्धा म्हणजे रोझ बरेट होती. या शिल्पाला सरकारी अनुदान मिळण्यास होणारा विलंब व दिरंगाईमागे नाराज रोदॅं आहे, असं समजून कॅमिली त्याच्यावर आणखीनच चिडली.

शारीरिकदृष्ट्या विकल झालेली आणि मानसिक संतुलन हरवलेली कॅमिली म्हातारी दिसायला लागली. तिनं आता रोदॅंला मनोमन शत्रू मानलं होतं. ‘रोदॅं आपल्या शिल्पकलेच्या कल्पना चोरतो, त्यानं आपलं ‘क्लोदो’ हे शिल्प पळवलं आहे’, अशी पत्रं तिनं मित्रांना, समीक्षकांना आणि मंत्रालयात पाठवायला सुरुवात केली. भुकेकंगाल, एकाकी आणि आजारी कॅमिलीला भ्रम व्हायला लागले. रोदॅं आणि त्याची गँग आपला खून करणार आहे, असं तिला वाटायला लागलं. लोखंडी दरवाजे, जाळ्या, साखळ्या वगैरे लावून कडेकोट किल्ल्यासारख्या बनवलेल्या तिच्या स्टुडिओत भ्रमिष्ट कॅमिली कधी तिची जुनी शिल्पं हातोड्याने तोडत, नाहीतरी जुनी पत्रं जाळत बसे.

मार्च १९१३ मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या भावाने अठ्ठेचाळीस वर्षाच्या कॅमिलीला जबरदस्तीने व्हिले अॅव्हरार्द या मनोरुग्णालयात भरती केलं. आणि मग यानंतरची आयुष्यातील उरलेली सर्व तीसपेक्षा जास्त वर्षं तिनं मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतींच्या आड एकांतवासात खितपत काढली. तिच्या बेछूट-कलंदर वर्तनामुळे नाराज झालेली तिची आई स्वतः तर तिला कधीही भेटायला गेली नाहीच, पण बहीण-भाऊ-मित्र-मैत्रिणी कोणालाच आईने मनोरुग्णालयात जाऊ दिलं नाही. भ्रमिष्ट, भयग्रस्त पण अजिबात हिंस्र नसलेली कॅमिली सुटकेसाठी अयशस्वी प्रयत्न करत राहिली. दिवसभर एकटीच बसलेली कॅमिली ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हापुन्हा पत्रं लिहून तिथून सोडविण्याची विनंती करत राहायची. अखेर १९ ऑक्टोबर, १९४३ रोजी कॅमिलीचा मृत्यू झाला. जिवंत असताना शेवटच्या श्वासापर्यंत बाहेर पडण्यासाठी तळमळणाऱ्या कॅमिलीची हाडंसुद्धा मृत्यूनंतर मनोरुग्णालयाबाहेर पडू शकली नाहीत!

एका विलक्षण प्रतिभावान, सुस्वरूप आणि बंडखोर विचारांच्या स्त्री-कलाकाराच्या आयुष्याची झालेली ही वाताहात वाचताना जीव गलबलून जातो. एकांतकोठडीतले कंटाळवाणे दिवस आणि न संपणाऱ्या रात्री... अशी एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीस वर्षं तिनं कशी काढली असतील, याचा विचार करायला लागलं की मन दडपून जातं. पुन्हापुन्हा असं वाटत राहतं की हे सगळं होण्याऐवजी जर तिला थोडं प्रेम, थोडं कौटुंबिक सुख आणि थोडं निर्भेळ कौतुक मिळालं असतं तर...? रोदॅंबरोबर सुखी वैवाहिक जीवन तिला लाभलं असतं तर...? तिचं मानसिक संतुलन हरपलं नसतं तर...? किमानपक्षी तिच्या आईने थोडी प्रेमळ भूमिका घेऊन तिला मनोरुग्णालयातून घरी नेलं असतं तर...?

खरंतर या जर... तर...ना काहीच अर्थ नसतो. बाकी अनेक प्रतिभावंत कलाकारांबाबत हे पाहायला मिळालं होतंच की. व्हॅन गॉग, तुलूज लोत्रेक, एडवर्ड मुंक अशा अनेक प्रतिभावंतांच्या आयुष्याचा एकाकी शेवट त्यांचं मानसिक संतुलन हरविण्यात झाला होताच की. पण तरीही तीस वर्षांपेक्षा जास्त वर्षं मनोरुग्णालयातील एकांतकोठडीत काढणाऱ्या कॅमिलीचं करुण आयुष्य डोळ्यांसमोर आलं की मन जरा जास्तच उदास होतं, हेही तितकंच खरंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.