Women's Day : कधीपासून साजरा केला जातो महिला दिन? यंदाच्या वर्षी महिला दिनाची थीम काय? जाणून घ्या..

महिला असोत की पुरुष. प्रत्येकालाच थोडं अंतर्मुख व्हायला सांगणारा हा दिवस.
Womens day
Womens day Esakal

संपादकीय

जागतिक महिलादिन. हा दिवस खरंतर सिंहावलोकनाचा; सगळ्यांसाठीच. महिला असोत की पुरुष. प्रत्येकालाच थोडं अंतर्मुख व्हायला सांगणारा हा दिवस. निमित्तानिमित्ताने असे दिवस जगण्याच्या प्रवासात यावेत कारण त्यांचा सांगावा असतो, चांगले ते दुणावण्याचा अन् वाईट ते उणावण्याचा!

अमेरिकेतल्या एका कारखान्यात काम करणाऱ्या बायका एकशे सोळा वर्षांपूर्वी एका दिवशी एकत्र आल्या. मुद्दा होता अमानुष वातावरणात, पुरेशा मोबदल्याविना, काळावेळाचा मुलाहिजा न ठेवता काम करून घेतलं जाण्याचा.

इतिहासाला आज कदाचित त्या सगळ्याजणींची नावंही आठवणार नाहीत, पण त्या सगळ्याजणींनी त्यांच्यासारख्याच सगळ्याजणींना एक विश्वास दिला – आपणही बोलू शकतो, विचार करू शकतो.

माणसांच्या जगात माणूस म्हणून समान हक्कांची अपेक्षा ठेवण्याचा आधुनिक जगातल्या पहिल्या प्रयत्नांपैकी हा एक.

मग जगाच्या पाठीवर कुठेकुठे बायका आणि त्यांच्या हक्कांविषयी विचार करणारे पुरुषही बोलत राहिले – कधी बायकांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून, कधी त्यांना लिंगाधारित असमानतेला तोंड द्यावे लागू नये म्हणून; तर कधी रूढी आणि परंपरांच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून.

आज एकविसावे शतक पंचविशीत येत असतानाही महिलादिनाच्या निमित्ताने अपेक्षित असणाऱ्या सिंहावलोकनाचे महत्त्व उणावत नाहीये –दोघांसाठीही.

शंभर वर्षांपूर्वीच्या काही प्रश्नांची धार आता कमीही झाली असेल, काही प्रश्न तेव्हा होते त्याच स्वरूपात आता अस्तित्वात नसतीलही.

काहीशी समज आलीही असेल आपल्या सगळ्यांनाच. पण स्त्री असण्याशी जोडले गेलेले अनेक मुद्दे बदलत्या काळाबरोबर, जगण्याच्या बदलत्या वेगाबरोबर रूपं बदलत कमी-अधिक प्रमाणात तिला भेडसावत राहताना आपण पिढ्यानपिढ्या पाहतो आहोत.

मग ते मुद्दे निर्णयाच्या अवकाशाचे असतील, तिच्यावरच्या अपेक्षांच्या ओझ्याचे असतील, तिला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचे असतील, तिच्या शरीरावरच्या तिच्या अधिकाराचे असतील, तिच्या भावनांचे असतील, सहजीवनातल्या तिच्या स्थानाचे असतील, तिच्या आर्थिक सुरक्षेचे असतील, तिची कर्तबगारी नाकारण्याचे असतील, आजही स्त्री म्हणून स्त्रियांना घेरणाऱ्या अन्याय, अत्याचार, विटंबना, अवहेलनेच्या वावटळीचे असतील. सत्तासंपत्तीच्या संघर्षांमध्ये पहिला बळी तीच जाणार हे तर जणू कुठल्याशा युगात गुहांत राहणारा माणूस स्थिरावत गेला तेव्हापासूनच तिचं प्राक्तनच ठरलं आहे.

आपल्या भवतालासह जगभरातल्या घटितांकडे जाणत्या नजरेनं पाहिलं तर हे सारं सहज लक्षात येतं; आणि पुन्हापुन्हा होणाऱ्या नवसर्जनातही महत्त्वाचा असतो तिचाच वाटा, हेदेखील लक्षात येतं कितीएक संकटातून सावरून पुन्हा उभ्या राहिलेल्या माणसाचा इतिहास चाळताना.

Womens day
Women’s Day 2024 : ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचा महिला दिन बनवा स्पेशल, या आयडिया येतील कामी

आव्हान आहे ते आजही स्त्रीत्वाला घेरून असणाऱ्या चिंतांच्या, कालबाह्य रूढी-परंपरांच्या आग्रहांच्या, मुलगी-पत्नी-आई अशा तिन्ही टप्प्यांवर तिला सतत आश्रितच मानण्याच्या आणि स्त्री व पुरुषांमधल्या संघर्षाच्या अनावश्यक मांडण्यांच्या जंजाळातून मनं बाहेर काढण्याचं.

ह्या दिशेचा प्रवास होऊ शकतो तो कुटुंब ते समाज या मार्गानेच; बदलत्या जीवनशैली, उपजीविकेच्या गरजांतून नातेसंबंधांची वीण विस्कटू पाहत असताना कुटुंबव्यवस्थेचा कणा असणाऱ्या स्त्रियांच्या क्षमता अधोरेखित करून या ‘अर्ध्या जगा’च्या ‘सोशिक मध्यबिंदू’च्या असण्याला कुटुंबव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणूनच.

हीच पार्श्वभूमी आहे यंदाच्या महिलादिनाच्या मध्यवर्ती कल्पनेची. १९७५च्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून युनेस्को दरवर्षी महिलादिनानिमित्त जगभर काही उपक्रम करत असते.

युनेस्कोची यंदाच्या महिलादिनाची थीम आहे, ‘इन्स्पायर इन्क्ल्युजन’. ‘अर्ध्या जगा’चं प्रतिनिधित्व करत आई, बहीण, लेक, सखी, पत्नी अशा कोणत्याही रूपात सामोरी येणारी स्त्री म्हणजे कुटुंबाचा आणि म्हणून पर्यायाने आपल्या

भवतालाचा आधारच. या भवतालाला बांधून घालणाऱ्या ‘अर्ध्या जगा’च्या आदराची भावना जोपासून आपण जग आणखी सुंदर करू असं युनेस्कोला वाटतं.

जिथे स्त्रीचा मान राखला जात नाही तेथील सर्व कार्ये निष्फळ होतात, अशी शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीने शिव आणि शक्ती यांच्यातलं अद्वैत दर्शवणाऱ्या अर्धनारीश्वराच्या रूपाने ही समावेशकता अधोरेखित केली आहेच.

अशा वेळी, ‘जागतिक महिलादिन’ हा खरंतर प्रत्येकीनं तिचा ‘आतला आवाज’ ऐकण्याचा आणि सभोवतालाच्या जगाला ऐकवण्याचाही दिवस ठरतो.

ती, तिच्या क्षमता, तिची कर्तबगारी या सगळ्याविषयी जग काय म्हणते; यापेक्षा तिचा स्वतःवरचा विश्‍वास, तिच्या आत्मप्रेरणा अधिक महत्त्वाच्या आहेत, हे समजून घ्यायला हवं; तिनं आणि तिच्या भवतालानंही!

--------------

Womens day
World Womens Day : पुण्यात १७ मार्गांवर पीएमपीमध्ये महिलांना शुक्रवारी मोफत प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com