

Ganesh Festival Creativity
esakal
प्रतीक जाधव
गणपती बाप्पा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. कलेची देवता हीच बाप्पाची ओळख म्हटल्यावर बाप्पाच्या उत्सवामध्ये क्रिएटिव्हिटी येणं स्वाभाविकच! म्हणजे बघा ना, अगदी बाप्पाच्या मूर्तिकामापासून, डेकोरेशन्सपासून ते प्रसादाच्या इनोव्हेटिव्ह प्रकारांपर्यंत सगळीकडे क्रिएटिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीच आहे; इन फॅक्ट कुठे नाही ते विचारा. बाप्पाची आभूषणं, मुकुट, पूजेची सामग्री, नक्षीदार छाप, वस्त्र, उपरणं, टोपी, आरतीचं ताट, आसनाचा पाट, इतकंच नाही तर मखरं आणि मंदिरंसुद्धा क्रिएटिव्हच...!
कोणत्याही घरामध्ये नॉर्मल डेजना दिसणारा हा सिनॅरिओ -
किचनमध्ये रेसिपीजचे रील्स स्क्रोल करणारी आई... हॉलमध्ये लेटेस्ट आलेली वेबसीरिज बिंज वॉच करणारे बाबा... बेडरूममध्ये फॅशन ब्लॉग बघणारी मुलगी... बाल्कनीमध्ये व्हिडिओ कॉलवर असलेला मुलगा...
पण ऑन गणेशोत्सव डेज, धिस सिनॅरिओ शिफ्ट्स टू -
प्रसादासाठी उकडीचे मोदक आणून ठेवणारी आई... बाप्पाच्या मूर्तीसाठी हार तयार करणारे बाबा... बाप्पासाठी भन्नाट क्रिएटिव्ह डेकोरेशन करणारी मुलगी... आणि पूजेसाठी २१ दुर्वांची जुडी बांधणारा मुलगा!
हे ‘ट्रान्झिशन’ म्हणजेच गणेशोत्सव... सगळ्या कुटुंबाला सामावून घेणारा! एकाच घरात राहणारे चारजण इतर दिवशी फक्त ‘स्क्रीन टाइम’मध्ये असतात, पण बाप्पाच्या आगमनानिमित्तानं तेच चारजण खऱ्या अर्थानं ‘फॅमिली टाइम’ म्हणत एकत्र येतात. गणेशोत्सव म्हणजे आजच्या टर्मिनॉलॉजीमध्ये सांगायचं, तर एक प्रकारचा डिटॉक्सच! समाजामध्ये एकता आणि बंधुभाव आणण्याच्या विचारातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आजच्या काळात सगळ्यांनी एकत्र येण्यासाठीचं उत्तम निमित्त ठरतोय. ऑनलाइन जगापेक्षा प्रत्यक्ष क्षणांमध्ये आणि सणांमध्ये काय आनंद असतो हे बाप्पा दरवर्षी नव्यानं शिकवतो, असं मला वाटतं.