जर्मन भाषेतून मराठीत 'नऊ कथांची कादंबरी'

दानिएल केलमान या १९७५मध्ये जन्मलेल्या ऑस्ट्रियन-जर्मन तरुण लेखकाची ही कादंबरी Ruhm (रूम) या नावाने जर्मन भाषेत २००८मध्ये प्रथम प्रकाशित झाली.
Reading
Reading esakal

प्रसाद घाणेकर

परदेशी अथवा भारतीय भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरित होताना बव्हंशी मूळ भाषेऐवजी इंग्रजी/ हिंदीतील भाषांतराचा आधार घेतला जातो. कलासक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेले नाव - नऊ कथांची कादंबरी हे पुस्तक मात्र श्रीकांत अरुण पाठक यांनी थेट जर्मन भाषेतून मराठीत आणले आहे.

दानिएल केलमान या १९७५मध्ये जन्मलेल्या ऑस्ट्रियन-जर्मन तरुण लेखकाची ही कादंबरी Ruhm (रूम) या नावाने जर्मन भाषेत २००८मध्ये प्रथम प्रकाशित झाली. ही कादंबरी मुंबई विद्यापीठात एम.एच्या मुलांना शिकवत असताना श्रीकांत पाठक या कादंबरीच्या प्रेमात पडले आणि ती मराठीत आणण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केले.

दानिएल केलमान यांची २००५मध्ये आलेली Die Vermessung der Welt (Measuring the World -जगाचे मोजमाप) ही कादंबरी जगातील अनेक भाषांत पोहोचली आणि केलमान यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. ते टीव्ही मालिकांसाठीही लेखन करतात.

Reading
Book Reading Benefits : स्ट्रेस कमी करायचाय? मग दररोज पुस्तक वाचा...

Ruhm या शब्दाचा अर्थ कीर्ती, प्रसिद्धी असा आहे. श्रीकांत पाठक यांनी मराठीसाठी नाव हे शीर्षक निवडले. ‘नाव’ या शब्दाचे मराठीत अनेक अर्थ आहेत. नाव म्हणजे माणसाची ओळख आणि नाव कमावणे म्हणजे प्रसिद्धी मिळवणे. हे दोन्ही अर्थ यातील काही कथांमध्ये येतात, हे जाणवून आपण ‘नाव’ शब्द शीर्षकात योजला, असे श्रीकांत पाठक मनोगतात सांगतात. शिवाय ‘नाव’ आणि आणि उपशीर्षकातील ‘नऊ’ यांचा सलग उच्चार एक नाद निर्माण करतो. नऊ कथांची कादंबरी हे उपशीर्षक जर्मन भाषेतही तसेच आहे.

नऊ वेगळ्या भासणाऱ्या कथांमधून काही एक दृश्य अदृश्य संबंध ठेवत, संदर्भ देत या कादंबरीची रचना करण्यात आली आहे. यातील काही पात्रे एका कथेतून दुसऱ्या कथेत जातात, त्यांची अर्धवट राहिलेली कथानके पुन्हा दुसऱ्याच कथेत पुढे जातात, त्यांच्या वर्तनाचा काही खुलासा होतो. काहीशी गुंतागुंत असलेली ही रचना वाचकाचे पूर्ण अवधान मागणारी आहे. त्याचबरोबर आताच्या काळातील समाजमाध्यमे आणि इतर आभासी वावर लक्षात घेता दैनंदिन जीवनातील सलगतेचा अभाव, तुकड्या-तुकड्यात विभागले गेलेले जीवन, कुठेच जास्त काळ न रेंगाळता ब्राउझिंग, सर्फिंग करत जगण्याची लागलेली सवय हे सारे वास्तव केलमान आपल्या लेखनातून मांडू पाहत आहेत. श्रीकांत पाठक यांनी ही गुंतागुंत प्रभावीपणे मराठीत आणली आहे.

Reading
Importance Of Reading: काय आहेत पुस्तक वाचण्याचे फायदे?

नऊ कथांच्या या कादंबरीत अभिनेता, लेखक, भोंदू लेखक, लेखकाच्या कादंबरीत पात्र म्हणून येऊ पाहणारा एक, तर अजिबात येऊ न पाहणारी एक, नकलाकार अशी वेगवेगळी पार्श्वभूमी घेऊन आलेली अनेकविध पात्रे आहेत. ज्या कुशलतेने त्यांचे वेगळेपण राखत त्यांना एकमेकांत गुंतवण्याची रचना केली आहे, ते वाचताना थक्क व्हायला होते. यासाठीच वाचकाला पूर्ण अवधान देऊन ती वाचावी लागते, काहीवेळा कथानकासारखेच मागेपुढे करावे लागते. सर्व कथानक या काळाला अगदी सुसंगत असल्याने वाचक वैयक्तिक अनुभव आठवत ह्या कथा वाचत राहतो. अस्तित्वाचा शोध घेणारी, स्वतःचे अस्तित्व पुसले जाण्याचा आनंद घेणारी, स्वभाषेसह अस्तित्व गमावलेली, इच्छामरण तर हवे आहे पण प्रत्यक्ष वेळ येताच ते टाळू पाहणारी, आभासी जगात अधिक काळ जगणारी यातील माणसे ही प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती आहेत.

जीवन किती तंत्रावलंबी झाली आहे याची भेदक जाणीव उपहास, उपरोध, ब्लॅक कॉमेडी यातून होत राहते. अस्तित्वाचा शोध असा तत्त्वचिंतनाचा विषय वरवर सोपा वाटेल, हसू येईल अशा पद्धतीने केलमान मांडतो, तेव्हा या लेखकाची प्रगल्भता जाणवते. मेटाफिक्शन तंत्र वापरत केलमान यांनी लिहिलेली ही कादंबरी मराठीत आणणे निश्चितच अवघड काम आहे, पण श्रीकांत पाठक यांनी इथे ते लीलया केल्याचे जाणवते.

लक्ष्मी बेहेरे यांनी केलेले कादंबरीचे मुखपृष्ठ कथानकातील गुंतागुंतीचे नेमके निदर्शक आहे. अशा पद्धतीच्या पुस्तकांचे स्वागत मराठी वाचकांनी केले तर जागतिक साहित्यातील उत्तर उत्तर आधुनिक साहित्याचा परिचय अधिकाधिक होत राहील हे नक्की!

---------------

Reading
Pune Book Mahotsav : शांतता.... पुणेकर वाचत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com