women's Day: “अहो मॅडम मुलाच्या लग्नाला चार महिने झालेत फक्त! आणि आता घटस्फोट???

नाती जपा... नाती फुलवा... नात्यावर प्रेम करा आणि बघा.. आहे तेच जग... तेच आयुष्य किती समाधानी आणि आनंददायी होईल..
Balancing relation
Balancing relation Esakal

डॉ. वैजयंती पटवर्धन

“अहो मॅडम मुलाच्या लग्नाला चार महिने झालेत फक्त! ओळखीतलेच स्थळ! लग्न ठरवताना मुलीकडच्यांनी सांगितले होते, की मुलीची पसंती एकत्र कुटुंबाला आहेच -आमच्या घरी ये जा असते ना सर्वांची!

आणि आता लग्न झाल्यावर थोड्याच दिवसात भुणभुण सुरू केली मला वेगळे घर हवे. मुलाने नाही सांगितल्यानंतर सरळ माहेरी निघून गेली -त्याला आता महिना होत आला! मी घरी जाऊन तिला विचारले! ती काही बोलत नाही, पण वेगळे घर हवे म्हणते. आम्ही तर खूप खचलोय.

काय करायचे आता?” साठी जवळ आलेल्या नीलाताई भडभडून बोलत होत्या. डोळ्यातले पाणी हलकेच टिपत होत्या. रोहित त्यांचा एकुलता एक मुलगा. उच्चशिक्षित. मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत भल्यामोठ्या पगाराची नोकरी... सर्वच छान!

सून श्रुतीही त्याला साजेशी - स्मार्ट, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ. मुलीला एक मोठी बहीण -तिच्याचवरून कदाचित वेगळे राहण्याचा आदर्श घेतला असावा. कारण ती एकाच गावात असून सासरच्या घरी राहत नव्हती.

नोकरीमुळे तिच्या आईकडे रोज मुलाला आणून सोडते, हे ठाऊक होते. पण म्हणून कुठल्याही कारणाशिवाय नीलाताईंच्या सुनेने हा हट्ट धरणे सुसंगत वाटत नव्हते.

नीलाताई स्वतः अत्यंत सुस्वभावी, सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या. बँकेतून व्हीआरएस घेऊन आनंदाने राहात होत्या. मिस्टरही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एचओडी. दृष्ट लागावे असे घर! मोठ्या हौसेने त्यांनी रोहितचे लग्न केले.

मधुचंद्राला मॉरिशसला जाऊन परत आल्यावर थोड्याच दिवसात श्रुतीने वेगळे राहायचा हट्ट सुरू केला. मुलीच्या घरच्यांनी हात वर केले “ती स्वतंत्र विचारांची आहे, मुळातच! आमचे तरी कुठे ऐकते?” यावर तर रोहित खूपच चिडला.

“तिला माझे घरचे नको असतील तर मला ती नको!” रोहित खूप ठाम होता. पण नीलाताई पूर्णच खचल्या होत्या. इतक्या हौसेने कोडकौतुक करीत आणलेल्या सुनेला “आपण नको” हे पचवणे जड होते. स्वाभाविकही होते ते.

त्यात तो पर्यायही त्यांनी नाइलाजाने स्वीकारला असता, पण रोहित तयार नव्हता. म्हणजे घटस्फोट??? हा विचारही त्यांना सहन होत नव्हता.

“नका काळजी करू नीलाताई, हे बऱ्यापैकी कॉमन आहे हल्ली. आपण बोलू या त्यांच्याशी!”

कौन्सिलिंगची वेळ घेऊन नीलाताई गेल्या खऱ्या. आणि मी विचार करू लागले. खरेच किती बदललाय आपला समाज, आपली मुलेमुली, आपली घरे, आपणसुद्धा!

त्या दोघांच्या लग्नाचे काही कार्यक्रम मीही पाहिले होते. अगदी फिल्मी लग्न. किती नटणे-थटणे. प्री-वेडिंग शूट, ‘संगीत’मध्ये फिल्मी स्टाईलने प्रपोज करणे, भरजरी कपड्यातील नृत्ये, लग्नाचे विधी, हसणे-खिदळणे. चेहऱ्यांवरचे ते आनंद ओसंडणारे भाव. हे सगळे फक्त बाकीच्या लोकांसाठी होते? फोटो, व्हिडिओ आणि फेसबुक, इन्स्टासाठी? खूप आश्चर्य वाटले. त्यापेक्षा दुःख वाटले.

आजच्या काळातल्या या पिढयांचे आभासी जग आणि आभासी जगणे. त्यालाच खरे मानणारी ही पिढी आणि त्याचे साक्षीदार, काही अंशी जबाबदार आणि सहभागी... बहुतांश आपण सगळेसुद्धा!

खरेच किती बदललेय जग, किती बदलली आहेत नातीगोती!

ज्याला जनरेशन गॅप म्हटले जाते ती सर्वच पिढ्यांनी अनुभवली आहे. प्रत्येक नवीन पिढीला आधीच्या पिढ्यांची शिकवण जुनीच वाटायची, ‘ओल्ड फॅशन्ड’ वाटायचे. आणि स्वतःला प्रगत समजत, जमेल तशी बंडखोरी आपल्या पणजोबा आणि आजोबांच्या पिढ्यांनीसुद्धा बघितली, केली आणि सहनही केली.

...त्यामुळेच प्रगती झाली ना समाजाची! ...तेव्हा आणि आता...

पण प्रगती झाली म्हणजे नेमकं काय?

आपल्यापुरते बोलायचे तर स्वातंत्र्योत्तर काळात जगाच्या स्पर्धेत उतरणाऱ्या आपल्या देशात राज्यघटनेनेच शिक्षण, व्यवसाय, नोकरी असे प्रगतीचे दरवाजे स्त्रिया, पुरुष -सर्वांनाच खुले केले.

गेल्या तीन, साडेतीन दशकांत आपल्या भारतीय जगात जागतिकीकरण, शास्त्रीय आणि वैज्ञानिक संशोधन, इंटरनेटने जोडले गेलेले जग आणि मानवी मेंदू या सगळ्याचा परिपाक घडून एक वेगळाच समाज अस्तित्वात येऊ लागला.

समाजाबरोबर घराचे रूप बदलले. घरे आणि मनेही आक्रसत गेली. रोजच्या धावपळीत पाहुणेरावळे घरी बोलावणे कमी झाले. केळवणे आणि बारशी हॉटेलमध्ये होऊ लागली. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोबाईलवर मिळायला लागल्या.

प्रत्यक्ष भेट आणि संभाषणाची जागा फोनवरचे त्रोटक संवाद आणि भारंभार संदेशांनी घेतली. भावना व्यक्त करायला चिन्हे (Emojis) आणि मेसेजमधले गुलाब आणि चुंबनेही उधार मिळाली. ही आभासी दुनिया तशी वेळखाऊ असली तरी (वरवर पाहता) फुकट!

त्यामुळे बाह्य जगाकडून घरच्यांपेक्षा कित्येक पटीने भरभरून प्रतिसाद मिळू लागले, मग घरच्यांची गरज वाटली तरच नवल!! काही व्यवसायांचे (आणि कुटुंबांचेही) अपवाद वगळले तर अनेक मराठी घरांत पुढच्या पिढ्यांना त्यांच्या अस्मिता...

स्वाभिमान वगैरेवगैरेंच्या नादात घरचे पारंपरिक व्यवसाय पुढे सुरू ठेवणे कमीपणाचे वाटू लागले, त्यापेक्षा बाहेरची नोकरी मानाची वाटू लागली आणि ‘आपल्या माणसांची’ आर्थिक कारणासाठीची गरज संपली. परिणामी (मायेचीसुद्धा) बंधने संपली...!

आपल्या मनाप्रमाणे वागता, जगता येणे ह्या ‘उत्कर्षबिंदू’चे ध्येय ठेवून जवळच्या नात्यांमध्ये अंतर पडत गेले आणि त्याच संस्कारात उदयाला येणाऱ्या पिढ्या मोठ्या होत गेल्या.

तांत्रिक प्रगती प्रचंड झाली. भौतिक सुखे तर मिळाली पण समाधान हरवले. गाड्या, मोठ्ठ्या पॅकेजची नोकरी- हाय फाय अॅमिनिटींचे घर -आणि हे सर्व असले, तरी अजून अजून काही मिळवण्याचा अट्टाहास हेच जीवन बनले. यात आपण कुठे हरवलो ते कळलेच नाही.

‘प्रगत’ जगात कुठेतरी पैसा हे यशाचे परिमाण होत गेले. पैशाने सर्व सुखे विकत घेता येतात या भावनेने मग पैसे मिळवणे... मिळवतच जाणे... हेच आयुष्याचे उद्दिष्ट ठरले आणि न थांबणारी रॅट रेस सुरू झाली. पदवी-पदव्युत्तर-आणि अजून बरेच काही शिकल्याने पैसा तर मिळाला, पण त्या डिग्र्यांनी किती पैसा मिळवला म्हणजे ‘पुरे’ समजायचे ते शिकवलेच नाही.

मोबाईल आणि आभासी माध्यमांनी ज्ञानाबरोबरच आपल्याला हवे ते नेत्रसुख-कर्णसुख-मुख्य म्हणजे आभासी (Virtual) मित्रमैत्रिणी, लोकप्रियता, प्रेम (?), अगदी शृंगारसुद्धा दिला. पण ते आभासी- म्हणजे खोटे आहे, हे स्वीकारण्याची मानसिकता दिलीच नाही.

मग पणाला लागली आपली वास्तवातील नाती, आपला खरेपणा, आपली खरेखोटे समजण्याची, सारासार विचार करण्याची बुद्धी आणि मनःस्वास्थ्य - पर्यायाने आपला माणूसपणा.

अजून अजून मिळवायच्या अथक धडपडीत येणाऱ्या तणावाला आवरणे आपल्याच हातात असते, हे वेळेवर समजायचे संस्कार हरवले आणि माणूस एकटा होत गेला.

सुरुवातीला गरज किंवा हौस म्हणून अर्थाजन करणारी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने- अनेकदा पुढेसुद्धा -सर्वच क्षेत्रात आपले अस्तित्व ठसवू लागली, यश मिळवू लागली, पण आपल्या पारंपरिक मानसिकतेमुळे आणि समाजाच्या स्त्रीविषयक पूर्वग्रहयुक्त विचारसरणीमुळे अनेकदा तिचे यश तितक्या खुलेपणाने स्वीकारले गेले नाही.

ज्याचे दृश्य परिणाम सुशिक्षित आणि स्वतंत्र स्त्रियांच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर झाले आणि ज्यांना शक्य झाले त्या स्त्रिया ‘मी का म्हणून अॅड्जस्ट करू? त्यापेक्षा वेगळे होऊ,’ म्हणत अपेक्षांच्या आणि विवाहाच्या बंधनातून मुक्त होणे पसंत करू लागल्या.

हे योग्य की अयोग्य या बाबत मतमतांतरे असू शकतात. परंतु हे वास्तव नाकारण्यात हशील नाही.

सामाजिक स्तरावर शहरीकरणाचे दृश्य परिणाम म्हणून विभक्त कुटुंबपद्धत रुजली. शहरातील जागेची अडचण, नवराबायको दोघांनीही नोकरी व्यवसायासाठी दिवसाचे कित्येक तास बाहेर असणे, शहरातील वेगवान दिनचर्येशी जुळवून घेण्यास कुटुंबातील ज्येष्ठांची (कधी अगतिकतेतून किंवा कधी जाणीवपूर्वकही) असमर्थता.

मग मुलांसाठी पाळणाघरे, ज्येष्ठांसाठी केअर सेंटर (वृद्धाश्रम शब्द मात्र बहुतेकांना आवडत नाही) असे पेड पर्याय उपलब्ध झाले.

व्यावसायिक यशासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रम कशाला द्यायचा ते आपापले ठरविणाऱ्या, ते ठरवताना जोडीदार, कुटुंब यांना दुय्यम मानणाऱ्या पतिपत्नीचे वैयक्तिक नातेसंबंध खूपच दुरावतात, असे माझे निरीक्षण आहे. पण ते स्वातंत्र्य अनेकांना महत्त्वाचे वाटते.

पतिपत्नींपैकी कोणीही फक्त स्वकेंद्रित असेल तर जुळवून घेणे कमीपणाचे समजले जाते. इगोमुळे माघार कोण घेणार? त्यातून मानसिक विभक्तीकरणाला सुरुवात होते. मानसिकदृष्ट्या अशा दुखावलेल्या अनेक जोड्या भावनिक, शारीरिक देवाणघेवाणीशिवाय लग्नाच्या नात्यात जगत राहतात.

काही चुकतेय हे त्यांना ना कळत, ना कुणी सांगितलेले त्यांना रुचत! म्हणून तर आज आपल्याकडेसुद्धा घटस्फोटांचे प्रमाण किती वाढतेय...

Balancing relation
Women's Day 2024 : महिलांनी तिशीनंतर रोज आहारात खावी 'ही' भाजी; प्रजनन क्षमता सुधारण्यास होईल मदत..

डबल इन्कम नो सेक्स, शारीरिक संबंधांशिवायची लग्ने अशा कल्पनांमधून येणारा मनाचा एकटेपणा त्यातून येणारे नैराश्य, मग व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंध, लौकिकार्थाने यशाच्या शिखरावर असताना होणाऱ्या हत्या, आत्महत्या, घटस्फोट अशी प्रगतीची ‘बाय प्रॉडक्ट’ नकळत आपल्यापैकी अनेकांच्या घरांत आणि आयुष्यातही येत आहेत.

वेळेवर समजले तरच त्यांना आवर घालता येतो. पण त्यासाठी काहीतरी चुकतेय-सुटतेय-हरवतेय हे कळायला हवे. ते मान्य व्हायला हवे.

‘प्रगत’ जगातल्या या गुदमरलेल्या नात्यांना आणि हरवलेल्या माणसांना सावरायचे कसे?

त्यासाठी महत्त्वाचे आहेत प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास. आणि त्यासाठी महत्त्वाची आहेत आपली माणसे आणि कुटुंबसंस्था. अर्थात त्यातील जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, त्यासाठी कुटुंबसंस्था जाणीवपूर्वक समानतेच्या तत्त्वावर आधारित असण्यासारखी पथ्यं आहेत.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पण सध्या त्याचे माणसात राहणे दुरावलेय. ते परत आणायचे तर स्वतःच्या खऱ्या गरजा ओळखाव्यात. ‘मी खूप सुखात आहे,’ हे सोशल मीडियावर दाखवण्यासाठी ठीक असले तरी स्वतःला फसवू नये. आपला खरा आनंद एकटेपणात नाही हे मान्य केले, की मनातले पूर्वग्रह काढून टाकावेत,

आणि खुल्या मनाने नात्यांचे स्वागत करावे, नाती समजून घ्यावीत, अपेक्षांच्या ओझ्याखाली नाती चिरडू नयेत. सर्वगुणसंपन्न कोणीही नाही, त्यामुळे प्रत्येकात काही ना काही खटकणारे / न आवडणारे असणारच. पण नाती स्वीकारताना आवडत्या-नावडत्या गोष्टींसह स्वीकारायला हवीत, समोरच्या व्यक्तीला बदलायचा अट्टाहास नको.

बाहेरच्या जगात आपण परिस्थितीचे किंवा व्यक्तीचे ‘स्वोट अॅनालिसीस’ करतो ना, तसेच आपल्या माणसांचे-नात्याचे करायचे. आपले कौशल्य त्या नात्यातल्या /व्यक्तीतल्या चांगल्या गुणांना फुलवण्यात आणि नात्याला आधार देण्यात आहे.

नात्यात मोकळेपणा असायला हवा, त्यासाठी संवाद हवा आणि त्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला आवश्यक ती स्पेस -अवकाशही द्यायला हवा. नात्यांमध्ये निर्णयस्वातंत्र्य द्यावे -चुकले तर चुकू द्या...

मधूनमधून या नात्यांचे ‘सर्व्हिसिंग’ही करावे. एक वेगळा ‘डे’ प्लॅन करून, कधी भेटवस्तू आणून. मनःपूर्वक कौतुक करणेसुद्धा एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातले स्थान महत्त्वाचे असल्याची खात्री देणारे असते.

*

या लेखाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली त्या रोहित आणि श्रुतीशी दोन-तीनवेळा, आधी एकेकटे आणि मग एकत्र, चर्चा केली. थोडे तुझे अन थोडे माझे असे वागल्याने गोष्टी कशा बदलतील याविषयी बोलल्यावर तो अनुभव महिनाभर घ्यायला दोघे तयार झाले आणि खरेच दोघांना पटले की जुळवून घेता येते आणि काही गोष्टी मनाविरुद्ध असल्या तरी आनंदी राहता येते. आज पुन्हा ते एकत्र राहत आहेत.

*

नाती जपा... नाती फुलवा... नात्यावर प्रेम करा आणि बघा.

आहे तेच जग... तेच आयुष्य किती समाधानी आणि आनंददायी होईल.

----------------

Balancing relation
Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com