मृत्युपत्र करायचेय? वकिलांकडे न जाता केलेले मृत्युपत्रदेखील धरले जाईल ग्राह्य?

एकत्र मालकी असलेल्या मालमत्तांबाबत एकत्रच विल करावे का?
Legal Will
Legal WillEsakal

अॅड. सायली गानू- दाबके

माझ्या वडिलांनी त्यांच्या डायरीत त्यांच्या मालमत्तेविषयी आणि त्यांच्या पश्चात ती मालमत्ता कशी वाटावी याविषयी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत. त्याखाली त्यांनी त्यांची सही केली आहे आणि त्यांच्या एका मित्राचीदेखील सही घेतली आहे. हे माझ्या वडिलांचे मृत्युपत्र मानले जाईल का?

मृत्युपत्र/ इच्छापत्र कुठे, कशा कागदावर लिहावे, काय प्रकारे लिहावे याबद्दल कायद्याने फार बंधने नाहीत.

त्यामुळे डायरीत, वहीत, कोऱ्या कागदावर, रेघा आखलेल्या कागदावर, लीगल पेपर (हिरव्या रंगाच्या) कागदावर लिहिलेली अशी सर्व प्रकारची मृत्युपत्रे ग्राह्य धरली जातात.

इच्छापत्र स्वतःच्या हस्ताक्षरात, दुसऱ्याकडून लिहून घेतलेले (विशेषतः अशिक्षित किंवा दृष्टिहीन व्यक्तींनी किंवा हात थरथरत असल्याने लिहिता न येणाऱ्या व्यक्तींनी) किंवा टंकलिखित म्हणजेच टाइप केलेलेदेखील असू शकते.

परंतु इच्छापत्रावरती दोन साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीत डायरीत लिहिलेले इच्छापत्रदेखील ग्राह्य धरले जाऊ शकते, परंतु एकाच साक्षीदाराची सही असल्याने हे इच्छापत्र कायद्याच्या दृष्टिकोनातून वैध मानले जाणार नाही.

मला व माझ्या पत्नीला आमची एकत्र मालकी असलेल्या मालमत्तांबाबत विल करायचे आहे. या मालमत्तांखेरीज आमच्या एकेकट्याच्या नावे आणि मालकीच्या असलेल्यादेखील काही गुंतवणुकी व इतर संपत्ती आहे. या परिस्थितीत आम्हाला आमची एकत्र मालकी असलेल्या मालमत्तांबाबत एकत्रच विल करावे लागेल का?

कायद्यानुसार दोन किंवा जास्ती व्यक्तींना एकत्र मृत्युपत्र करता येते. अशा इच्छापत्राला ‘संयुक्त इच्छापत्र’ म्हणतात. संयुक्त इच्छापत्र केल्याने त्यात नमूद केलेल्या मालमत्तांबाबतीत सामाईक मालकी हक्क निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे सामाईक मालमत्तांबाबत संयुक्तच इच्छापत्र केले पाहिजे असे बंधन नाही.

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या स्वतंत्र आणि स्वकष्टार्जित मिळकतींबाबत विल करता येते. त्यामुळे तुम्ही व तुमची पत्नी हे दोघेही तुमच्या मिळकतींबाबत वेगवेगळे विल करू शकता.

अशा स्वतंत्र विलमध्ये तुम्ही तुमच्या दोघांच्याही सामाईक मालकीच्या ज्या ज्या मिळकती आहेत त्यातील स्वतःच्या हिश्श्यापुरती, तुमच्या इच्छेप्रमाणे, तरतूद करू शकता, तसेच स्वतंत्र मालकीच्या मिळकतींबाबत तरतूद करू शकता.

जर तुम्ही संयुक्त विल करायचे ठरवले, तर त्यातदेखील तुम्ही सामाईक मालकीच्या मिळकतीत स्वतःच्या हिश्श्यापुरतेच निर्देश देऊ शकता.

अशा संयुक्त इच्छापत्रातसुद्धा तुम्ही आपापल्या स्वतंत्र मालकीच्या मालमत्तांचादेखील उल्लेख करून त्याबद्दलचे निर्देश लिहून ठेवू शकता.

तुम्हाला तुमच्या एकत्र मालकीच्या मालमत्तांबाबत एकत्र विल करायची गरज नाही. अंमलबजावणीला सोपे जाण्यासाठी दोघांचेही वेगवेगळे विल करणे श्रेयस्कर ठरते.

मी आत्ता एका अवघड ट्रेकला जाणार आहे. त्यातील सर्व शक्यतांचा विचार करून मी ट्रेकला जाण्याआधी माझे विल करून ठेवायचे ठरवले आहे. पण आत्ता माझ्या सगळ्या गोष्टींची घडी मला हवी तशी बसवलेली नाही आणि मी परत आलो, की त्यात बरेच बदल करू इच्छितो, तर मला असे ट्रेक पुरते विल करता येईल का?

होय, तुम्हाला ट्रेकपुरते इच्छापत्र करता येईल.

इच्छापत्राबद्दलच्या कायद्यानुसार ‘सशर्त इच्छापत्र’ असा एक प्रकार आहे. अशा इच्छापत्रात एखादी अट घालता येते आणि ती पूर्ण झाली तरच ते इच्छापत्र अमलात येते.

त्यामुळे तुम्ही तुमच्या अशा विलमध्ये अट घालावी, की ते इच्छापत्र तुमचा मृत्यू या ट्रेकदरम्यान झाला तरच अमलात येईल. अशा प्रकारे हे विल या ट्रेकच्या कालावधीपुरतेच लागू होईल.

ट्रेकहून परत आल्यानंतर तुम्ही तुमचे आर्थिक व इतर व्यवहार आणि गोष्टींची तुमच्या मनाप्रमाणे व्यवस्था लावू शकता. त्यानंतर तुमचे नवे इच्छापत्र करू शकता.

महत्त्वाचे : या लेखमालेत प्रश्‍नकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारावर उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे. तरी या उत्तरांना कायदेशीर सल्ला समजू नये. या उत्तरांच्या आधाराने कुठलेही कायदेशीर पाऊल उचलू नये. आपले प्रश्न व शंकांबद्दल वकिलांचा सल्ला घेऊनच योग्य ती कृती करावी.

-----------------

Legal Will
Legal Will : मृत्युपत्र खरे नसल्याचा संशय असल्यास त्याला आव्हान देता येते का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com