

Lennart Karl
esakal
लेनार्ट कार्लला ‘जर्मनीचा मेस्सी’ असे कौतुकाने संबोधले जात आहे. मेस्सी आणि कार्ल यांच्या खेळण्याच्या शैलीत भरपूर साम्य असल्याचे मानले जाते. मेस्सीप्रमाणे कार्लची उंची कमी. पाच फूट, सहा इंच - मेस्सीपेक्षा एक इंच कमी. मेस्सीप्रमाणेच कार्लचे गुरुत्वकेंद्र खूपच खाली आहे.
युरोपियन फुटबॉलमध्ये एक नवा सितारा सध्या चर्चेत आहेत. जर्मन फुटबॉल क्लब बायर्न म्युनिककडून खेळणारा १७ वर्षीय लेनार्ट कार्ल याने अपेक्षा उंचावल्या असून, तो पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत जर्मन संघाच्या जर्सीत दिसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आक्रमक मध्यरक्षक असलेला कार्ल अल्पावधीतच बायर्न म्युनिक संघातील प्रमुख खेळाडू झाला. ९ डिसेंबर रोजी पोर्तुगीज संघ स्पोर्टिंग क्लब द पोर्तुगालविरुद्ध त्याने चमकदार गोल केला. यासह युरोपियन चँपियन्स लीगमध्ये सलग तीन सामन्यांत गोल करणारा कार्ल हा सर्वांत युवा फुटबॉलपटू ठरला. ऑक्टोबरमध्ये क्लब ब्रूज या बेल्जियममधील संघाविरुद्ध गोल केला, तेव्हा तो १७ वर्षे व २४२ दिवसांचा होता. तो चँपियन्स स्पर्धेत गोल करणारा बायर्न म्युनिकचादेखील सर्वांत तरुण फुटबॉलपटू ठरला. २०२२मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी बायर्न म्युनिकच्या युवा संघात दाखल झालेल्या या अलौकिक गुणवत्तेच्या विंगरने, संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हिन्सेंट कोम्पानी यांचा विश्वास संपादन केला. म्हणूनच यावर्षी जूनमध्ये अमेरिकेत झालेल्या क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत त्याला मोठे व्यासपीठ मिळाले. विश्वास सार्थ ठरवताना त्याने ऑक्टोबरमध्ये लागोपाठ दोन सामन्यांत गोल केले. चँपियन्स लीगमध्ये अचूक नेमबाजी साधल्यानंतर लगेच बोरुसिया माँचनग्लाडबाकविरुद्ध त्याने बुंडेस्लिगा स्पर्धेतील वैयक्तिक गोलखाते उघडले. या बिनधास्त, आक्रमक आणि मुक्त शैलीत खेळणाऱ्या फुटबॉलपटूची दोन वर्षांतील प्रगती थक्क करणारी आहे. २०२४-२५ मोसमात बायर्न म्युनिकच्या ज्युनियर संघातून, तसेच जर्मनीच्या १७ वर्षांखालील संघातून खेळताना कार्ल कमालीचा बहरला. त्या मोसमात त्याने एकूण ३४ गोल केले, तर ११ वेळा गोलसाह्य (असिस्ट) केले.