गणपती विशेष : ढोल-ताशांची जादू

विश्वजीत राळे लिखित ढोल ताशांची जादू विशेष लेख वाचा
magical moment of dhol tasha pathak article by vishwajeet rale ganesh utsav
magical moment of dhol tasha pathak article by vishwajeet rale ganesh utsav SAKAL

विश्वजीत राळे: ढोल-ताशांची जादू

ढोल-ताशांची जादू न ओसरणारी आहे, ती कायमस्वरूपी राहील. संस्कृती, परंपरेची जपणूक करणाऱ्‍या या ढोल-ताशांमध्ये तरुणांना गुंग करण्याचे, आबालवृद्धांना डोलायला लावण्याचे सामर्थ्य आहे.

दुमदुमणारे ढोल अन् कडाडणारे ताशे... गणेशोत्सवात ही दोन वाद्ये नसतील तर गणेशोत्सवाचा ‘फील’च येत नाही. गणेशोत्सवाला एक सोहळ्याचे, जल्लोषाचे स्वरूप प्राप्त करून देतात ते ढोल-ताशेच. गणरायाचे स्वागतही ढोल-ताशांच्या गजरात होते, आणि त्याला निरोप देतानाही विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे हवेतच!

magical moment of dhol tasha pathak article by vishwajeet rale ganesh utsav
Jawan: नाटकातला 'नाच्या' ते अभिनेता.. जवानमध्ये असलेला शेतकरी कोण? किरण माने सांगतात...

गणपती मिरवणुकांना खऱ्‍या अर्थाने शोभा येते ती ढोल-ताशा पथकांमुळे. आजमितीस पाहायला गेले, तर एकट्या पुणे शहरात साधारणपणे १७०-१८० ढोल पथके आहेत. त्याद्वारे जवळपास वीस ते बावीस हजार तरुण-तरुणी जोडले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील आळंदी, तळेगाव, पिंपरी-चिंचवड, लोणावळा अशा शहरांसोबतच पुण्याबाहेर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, पेण याठिकाणीही या पथकांचा विस्तार झाल्याचे दिसून येते. तसेच बंगळूर, अहमदाबाद येथेदेखील काही पथके आहेत. एवढेच नव्हे, तर भारताबाहेरही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई येथे ही पथके विस्तारलेली आहेत. दुबई येथील पथकाला तर ‘बॅण्ड’चा दर्जा प्राप्त आहे. दुबईतील एका परेडच्यावेळी तेथील पोलिस दल महाराष्ट्रातील ढोल-ताशांच्या तालावर संचलन करतात, ही केवढी अभिमानाची गोष्ट!

ढोल-ताशा ही लोकवाद्ये आहेत. ‘सहजता’ हे या वाद्यांचे वैशिष्ट्य! म्हणूनच तर ही वाद्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर वाजवली जातात. केवळ ऐकून, निरीक्षण करून थोडक्या सरावानेदेखील ही वाद्ये वाजवता येणे शक्य आहे. ढोल-ताशांचे वादन, या वाद्यांना असणारा नाद, वादनातली सहजता यामुळे तरुणाई या वाद्यप्रकाराकडे आकर्षित झाली आहे. दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे, या कलाप्रकाराला लोकांनी फार डोक्यावर घेतले. अगदी बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण ढोल-ताशांच्या नादावर ठेका धरतात. यातून निर्माण होणारी ऊर्जा, निर्माण होणारा नाद आणि एकंदरीतच वादनाचे लोकांना आकर्षण असते. हीच या वाद्यांची ताकद आहे.

ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांच्याशी या लेखाच्या निमित्ताने गप्पा मारताना ढोल-ताशांचे विश्‍व उलगडत गेले.

गणेशोत्सवात ढोल-ताशांचा आवाज घुमू लागला तो १९६०-७०च्या दशकापासून. त्या काळचा विचार केला, तर तेव्हा आजच्यासारखा मनोरंजनाच्या साधनांचा सुकाळ नव्हता. वयस्कर मंडळी भजन, कीर्तन, नामस्मरण यांमध्ये रमत असत, परंतु जोरबैठका मारून तालमीत घाम गाळणारा, सळसळणारे गरम रक्त असणारा तरुण मात्र ढोल-ताशांकडे आपसूकच आकर्षित होऊ लागला. त्यातूनच पुढे पथके निर्माण होऊ लागली. ढोल-ताशांसोबतच लेझीम, झांज खेळले जाऊ लागले. त्यांचीही वेगवेगळी पथके तयार होऊ लागली. मावळ-मुळशी भागांतील ही पथके पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी होऊ लागली. पथकांतील तो रांगडेपणा लोकांना आकर्षित करून नाचण्यास भाग पाडू लागला. या पथकांमुळे मिरवणुका आकर्षक होत आहेत, हे लोकांच्या लक्षात येऊ लागले.

याच काळात म्हणजे साधारणपणे १९६२च्या आसपास ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक आप्पासाहेब पेंडसे यांनी खेड-शिवापूरजवळ असेच एक ढोल-ताशा पथक पाहिले. गुलाबराव कांबळे यांच्या ताशा वादनाने ते प्रभावित झाले. त्यांना सोबत घेऊन शालेय विद्यार्थ्यांना आपण या प्रवाहात आणू शकलो, तर उत्सवाला एक चांगल्या प्रकारची शिस्त निर्माण होण्यास मदत होईल, या विचारातूनच पुढे आप्पासाहेबांनी ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशांचा सराव करून घ्यायला सुरुवात केली आणि साधारण दोन-तीन वर्षांनी पुण्यातील गणेशोत्सवामध्ये ज्ञानप्रबोधिनीचे पथक पहिल्यांदा उतरले. शालेय विद्यार्थ्यांचे पुणे शहरातील पहिले पथक म्हणून ज्ञानप्रबोधिनीचा उल्लेख होतो. यानंतर ‘स्व’रूपवर्धिनी, विमलाबाई गरवारे शाळेबरोबर नू.म.वि., रमणबाग या शाळांनीही आपापली पथके तयार केल्याने शालेय पथकांचा एक जमाना सुरू झाला. शालेय विद्यार्थ्यांची ही पथके, त्यांच्या पथकांतील शिस्त, त्यापुढील लेझीम नृत्य या गोष्टी लोकांना भावू लागल्या. या पथकांतील वादन, त्यापुढील ढाल-तलवारींची प्रात्यक्षिके लोकांना आवडू लागली आणि मग सुरू झाला पथकांचा एक वेगळाच ‘दौर’!

माघी चतुर्थीला गणेशजन्म होऊन गेल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ढोल-ताशा पथकांची पूर्वतयारी सुरू होते. सरावाची जागा निवडणे, पथकातील मुलांशी संपर्क साधणे, त्यासंबंधीच्या बैठका घेऊन नियोजन करणे, मांडव टाकणे, गणवेश काय असावा हे ठरवणे, सरावाच्या तारखा निश्चित करणे, वाद्यांची स्थिती बघून त्यांची डागडुजी करणे, सरावाच्या उद्‌घाटनासाठी प्रमुख पाहुण्यांना निमंत्रणे धाडणे आणि नंतर प्रत्यक्ष एक-दीड महिन्यांचा वादनसराव अशाप्रकारे साधारण पूर्वतयारीचे स्वरूप सांगता येईल. प्रत्यक्ष ढोल-ताशा वादनाचा सराव गणेशोत्सवाच्या साधारणपणे एक ते दीड महिना आधी सुरू होतो. आता दहीहंडीला वाजवण्यासाठीदेखील ढोल-ताशा पथकांना वाढती मागणी आहे.

अलीकडे मिरवणुकांमध्ये ढोल, ताशांबरोबरच झांज, लेझीम यांचाही वापर होताना दिसून येतो. सध्या गणपती मिरवणुकांमध्ये शंख वाद्याचादेखील समावेश होत असल्याचे दिसून येते. पथक म्हटले की ढोल-ताशांसोबत ध्वज आलाच! ध्वज नेहमी पथकाच्या अग्रभागी असतो. पथक आल्याचे पहिले चिन्ह म्हणजे ध्वज निदर्शनास पडणे होय. या ध्वजाला अग्रभागी ठेवून, त्याला प्रणाम करून मगच ढोल-ताशा वादनास सुरुवात केली जाते. प्रत्येक पथकात ध्वजाचे नृत्य खास वेगळे शिकवले जाते. जेव्हा सुरुवातीला ध्वज आकाशात उडवला जातो, त्यावेळी त्यात असलेल्या फुलांच्या पाकळ्या खाली पडतानाचे दृश्य अत्यंत सुंदर असते. ध्वज एकदा गुंडाळून आत ठेवला की पुन्हा वादन नाही, अशी प्रथा पथकांमध्ये आहे, ठाकूर सांगतात.

आता वादकांच्या पोशाखालाही झळाळी मिळाली आहे. गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ, डोक्याला फेटा, पांढरा कुर्ता, त्यावर जॅकेट किंवा नऊवारी साड्या, नाकात नथ असा पोशाख परिधान केला जातो. एखाद्या विशिष्ट थीमवर आधारितही पोशाख घातले जातात.

पथकांमध्ये आता मुलींचे प्रमाणही लक्षणीय आहे. ध्वज नाचवणे आणि ढोल वाजवणे यात मुलींची कामगिरी नजरेत भरण्यासारखी आहे. स्मिता इंदापूरकर चालवत असलेले ‘मानिनी’ हे महिलांचे पथक किंवा ज्ञानप्रबोधिनीचे महिला पथक अशी महिला पथकांची उदाहरणे सांगता येतील. वादक श्रद्धा परांजपे सांगते, ‘मला तालवाद्यांचं आकर्षण फार लहानपणापासून होतं. मला ढोल-ताशा वाजवायची इच्छा होती. पण तेव्हा बाबा म्हणायचे, ‘जरा मोठी झालीस की जा वाजवायला.’ मात्र कालांतराने प्रत्येक वर्षी ती इच्छा अपूर्णच राहत होती. मी स्वतःच नाटक, शिक्षण ही कारणं देत वादन टाळत होते. पण या वर्षी माझं मास्टर्ससुद्धा संपेल मग पुढे वादनासाठी वेळ मिळणार नाही, म्हणून गेलेच नाव नोंदवायला पथकात. एक महिना झालाय सराव सुरू होऊन. आता वाटतंय उगाच टाळला मी वादनाचा आनंद!’

एकदा वादनाची गोडी लागली की गणेशाची ही सेवा अविरत सुरूच राहते. ठाकूर म्हणतात, ‘मी ताशाच्या आकर्षणापोटी गणेशोत्सवाशी जोडला गेलो. मी दहा वर्षांचा असेन. मला ताशा हे वाद्य फार आवडायचे. आमच्या घराजवळच्या मेहुणपुरा मंडळात मी ताशावादन बघत बसायचो आणि नंतर घरी जाऊन खराट्याच्या दोन काड्या घेऊन एका लाकडी टेबलवर ऐकलेले ते ताल मी वाजवत बसायचो. असेच एके दिवशी मंडळातील ताशावादक काही कारणाने आला नव्हता. त्या दिवशी मी पहिल्यांदा ताशा वाजवला. वयाच्या दहाव्या वर्षी गळ्यात घेतलेला तो ताशा आज वयाच्या छपन्नाव्या वर्षीदेखील मी वाजवतोच आहे. माझ्या मते ही एक प्रकारची सेवाच आहे. आपल्याला जे येते ते लोकांसाठी सादर करायला हवे, असे मला वाटते.’

magical moment of dhol tasha pathak article by vishwajeet rale ganesh utsav
शिल्पा शेट्टी - राज कुंद्राच्या घरी गणपती बाप्पाचं दणक्यात आगमन

आणखी माहिती घेत गेलो तसे महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या वादनासोबतच वादनाच्या इतरही शैलींबद्दल समजत गेले. उदाहरणार्थ सांगलीला ‘घुणके आणि हलगी’ असते. त्यावर लेझीम खेळली जाते. ही हलगी साधी कातड्याची असते. तेच तुम्ही सोलापूरला गेलात, तर तिथे स्क्रूची हलगी वापरली जाते. या प्रकारच्या हलगीला एक विशिष्ट प्रकारचा ‘कडकडाट’ असतो. काही ठिकाणी तर आजही अशा कार्यक्रमांमध्ये संबळवादन केले जाते. परंतु एकंदरीतच महाराष्ट्रात प्रामुख्याने ढोल-ताशांचेच प्राबल्य दिसून येते.

वादन शैलीचे प्रकार सांगायचे झाल्यास काही गावांमधील पथकांची एक शैली दिसून येते. त्यात लेझीम, झांज यांचा वापर करून सादर केले जाणारे रामायण, महाभारत, सीताहरण यांसारख्या खेळांना अधिक महत्त्व आहे. या प्रकारात ताल आणि चाल यांना कमी महत्त्व आणि या खेळांना जास्त महत्त्व असते. पुणे शहरातील पथकांनी ताल आणि सुरांची गुंफण केली. पुण्याने या खेळाला एक आकार दिला, एक रचना दिली. आजच्या शहरी शैलीमध्ये मारुती स्तोत्र, ‘इंद्र जिमि जंभ पर’ हे कवी भूषण यांचे काव्य यांसारख्या विविध वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींवरील रचना पथके बसवतात.

पथकांचे अर्थकारण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. वादक पैशांसाठी नव्हे तर आवड, छंद म्हणून वादन करतात. पथके पैसे घेतात, परंतु वादक कधीही पैसे घेत नाहीत. मात्र पथकांचा एकूण खर्च जर लक्षात घेतला तर पदरचे पैसे घालवून पथक चालवल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील, असे ठाकूर सांगतात. मांडव, प्रवास, वाद्यांची देखभाल, वादकांसाठीच्या सोयीसुविधा, प्रथमोपचार, खानपान यासाठी लागणारा खर्च मोठा आहे. तरीदेखील उरलेल्या पैशांतून या पथकांतर्फे विविध समाजोपयोगी कार्ये केली जातात, ही बाब नक्कीच वाखणण्याजोगी आहे.

ढोल-ताशांच्या आवाजासंबंधीच्या तक्रारी अनेकदा कानावर पडतात. ढोल-ताशा ही कातडी वाद्ये असल्यामुळे त्यातून निर्माण होणारी कंपने हवेत विरतात, त्यामुळे त्यांच्या आवाजाचा त्रास होत नाही. परंतु, १९९० सालचे पुणे आणि आजचे पुणे यात प्रचंड अंतर आहे. त्याकाळी बांधकामे कमी होती. आजकाल पुण्याचा व्हर्टिकल विस्तारदेखील झपाट्याने होतो आहे. परिणामी ढोल-ताशांचा आवाज त्यात ट्रॅप होऊन घुमतो. त्यामुळे काही प्रमाणात त्रास होणे शक्य आहे. पण मिरवणुकीतील हे वादन एकाजागी थांबत नसून चालत-चालत असते. ते पुढे पुढे जात राहते. जेथे सराव होतो तेथे आवाजाचा त्रास होऊ शकतो. मात्र सामंजस्याने हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. दोन्हीही बाजूंनी सामंजस्य आणि समन्वय गरजेचा आहे, तरच हा त्रास न वाटता एक छान उत्सव होईल.

ढोल-ताशांची जादू न ओसरणारी आहे, ती कायमस्वरूपी राहील. संस्कृती, परंपरेची जपणूक करणाऱ्‍या या ढोल-ताशांमध्ये तरुणांना गुंग करण्याचे, आबालवृद्धांना डोलायला लावण्याचे सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य वर्धिष्णू आहे. चंद्रकोरीप्रमाणे ते दिवसेंदिवस वाढत जावो हीच अपेक्षा! {{{

एका हाडाच्या वादकासाठी ढोल-ताशा पथक हे केवळ पथकंच नसून त्याचं दुसरं घर असतं. सरावाचे दोन महिने वर्षभर ताकद व स्फूर्ती देणारे असतात. पथकामध्ये काम करत असताना अनेक सामाजिक गोष्टींचा अनुभव सातत्याने येत असतो व अशाच सर्व अनुभवांमुळे वादकाचा आत्मविश्वास, काम करण्याची ऊर्मी कित्येक पटींनी वाढत असते. स्वतःची क्षमता ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे ढोल-ताशा पथकाचं काम करणं. त्याबाबत मला एक किस्सा आठवतो. त्यादिवशी ढोलांचा मेंटेनन्स करायचा होता, परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे काय करावे ते सुचत नव्हते. मग मी व माझा मित्र हर्ष आम्ही दोघेच लागलो कामाला. त्या दिवशी आम्ही ४० ढोल दुरुस्त केले. यावरून मला माझ्या क्षमतेचा अंदाज आला. एक वादक म्हणून नक्कीच मला या गोष्टीचा अभिमान वाटतो.

- सिद्धांत साळुंके, ढोलवादक

ढोल-ताशा महासंघ

सन १९९७-९८मध्ये एका वाहिनीने ढोल-ताशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याच्या परीक्षणाची जबाबदारी माझ्याकडे आणि अनिलराव गाडगीळ सर यांच्याकडे होती. यावेळी झालेल्या चर्चेतूनच ‘ढोल-ताशा महासंघा’ची कल्पना पुढे आली. अनिलराव गाडगीळ हे या महासंघाचे पहिले अध्यक्ष होत. पुढे पुण्यातही अशा प्रकारची स्पर्धा भरवली गेली. यातूनच महासंघाचे बीजारोपण झाले, असे महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले. सध्या ‘ढोल-ताशा महासंघ’ ही पथकांसाठी कटिबद्ध असणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे. महासंघाची नागपूर, अमरावती, विदर्भ अशी वेगळी कार्यकारिणी आहे. त्याचप्रमाणे नाशिक, कोल्हापूर, मुंबई, पेण येथेही कार्यकारिणी आहेत. अहमदाबाद, बंगळूर याचबरोबर अमेरिकेतील डलास, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे महासंघाची व्याप्ती वाढत चालली आहे.

महासंघातर्फे अनेक समाजोपयोगी कार्ये राबवण्यात येतात. त्याबद्दल ठाकूर यांनी सांगितले, ‘वादकांना वैद्यकीय व आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, अनाथ मुलांसाठी आमरस पुरीचे जेवण, पोलिस स्टेशनमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरे करणे, देहविक्री करणाऱ्या महिलांबरोबर भाऊबीज साजरी करणे यांसारख्या अनेक उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम महासंघातर्फे आजवर करण्यात आलेले आहे आणि यापुढेही होत राहील. मला वाटते, पथकांकडून होत असलेल्या या कामांचा विचार होणे, त्यांचा समाजासाठी अधिकाधिक वापर कसा करता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com