सायबर फसवणुकीच्या घटनांचे बळी नेमके कोण? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तेलंगण आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढे आहेत.
Instagram Cyber Crime News
Instagram Cyber Crime News esakal

“तुम्ही कधी सायबर फ्रॉडची शिकार झाला आहात का, असा प्रश्न मला जेव्हा पहिल्यांदा विचारला गेला तेव्हा माझे उत्तर ‘नाही’ असे होते; अशा प्रश्नाला असे उत्तर मी फक्त एकदाच दिले. आता जेव्हा जेव्हा मला हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मी म्हणतो, ‘नॉट यट’ (अजून तरी नाही) ...”

हे उद्धृत आहे ब्रिटनमधल्या एका नामवंत विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाच्या अलीकडच्या मुलाखतीमधील. स्टीफन ली हे एक्स्टर विद्यापीठात सुप्रतिष्ठीत प्राध्यापक आहेत. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत त्यांनी काही निरीक्षणे आणि मुद्दे मांडले आहेत.

सायबर फसवणूक, सायबर छळ का आणि कसे घडतात याविषयी असंख्य तज्ज्ञांनी यापूर्वी विश्लेषणे केली आहेत, विविधांगी कारणे या तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहेत, इशारे दिले आहेत. यापैकी काही मुद्दे पुन्हा मांडताना प्रा. ली यांनी दोन मुद्द्यांवर भर दिला आहे.

एखाद्या व्यक्तीचे शिक्षण, ज्ञान, माहिती आणि ती व्यक्ती सायबर गुन्ह्याचा बळी ठरण्याची शक्यता याचा एकमेकांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हा पहिला मुद्दा.

आणि सायबर फसवणुकीच्या, छळाच्या घटनांचे बळी ठरणारे लोक येनकेनप्रकारेण फसवणूक ओढवून घेत असतात, असा त्यांचा दुसरा मुद्दा आहे.

मग कधी ते घरबसल्या; विनाकष्ट पैसा मिळवण्याचे, लॉटरी जिंकण्याचे, एखादी महागडी वस्तू, फक्त स्वप्नातच शक्य आहे असा महागडा प्रवास पदरात पाडून घेण्याचे, अतृप्त इच्छापूर्तीचे आमिष असेल किंवा आपला कष्टाने मिळवलेला पैसा केवळ केवायसी अपडेट नसल्याने बुडण्याची किंवा एखादी सेवा बंद होण्याची भीती असेल अथवा निव्वळ आंबटषौक असेल.

Instagram Cyber Crime News
Cyber Security : सायबर सिक्युरिटी करिअरचा उत्तम पर्याय!

एखादी लिंक क्लिक करून म्हणा, अनोळखी व्यक्तीच्या साखरपेरणीला भुलून म्हणा, ओटीपी, पिन, बँक खात्याचा तपशील, आधार किंवा पॅन नंबर सांगून म्हणा, समाजमाध्यमांवर आपली नको तेवढी माहिती देऊन म्हणा, एखादे अनोळखी अॅप डाऊनलोड करून म्हणा सायबर गुन्ह्यांचे बळी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात शिरत असतात, आणि कळत नकळत केलेल्या म्हणा, त्यांच्याकडून झालेल्या म्हणा त्या कृतीच्या गंभीर परिणामांना त्यांना सामोरे जावे लागत असते.

प्रा. ली यांची ही मुलाखत आठवण्याचं कारण म्हणजे आयआयटी कानपूरचे सहकार्य असणाऱ्या फ्युचर क्राईम रिसर्च फाउंडेशन या स्टार्टअपचा एक अभ्यास आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा (एनसीआरबी) ताजा अहवाल.

वर्ष २०२१च्या तुलनेत २०२२मध्ये सायबर गुन्ह्यांच्या नोंदलेल्या प्रकरणांमध्ये २४.५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे एनसीआरबीने नोंदवले आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या वाढते आहे, असंही हा अहवाल नोंदवतो कारण २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये ११.८ टक्के वाढ नोंदवली गेली होती. महाराष्ट्र या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत तेलंगण आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढे आहेत.

ही आकडेवारी फक्त नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची आहे हा मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा. कारण अन्य एका आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या व्यक्तींनी ज्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर गुन्ह्यांची माहिती नोंदवणे अपेक्षित असते त्या पोर्टलवर जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२२ या काळात नोंदवल्या गेलेल्या तक्रारींपैकी फक्त दोन टक्के तक्रारींवरून प्रत्यक्षात गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय अजिबातच न सांगितल्या गेलेल्या सायबर फसवणुकीच्या, छळाच्या कहाण्यांचं प्रमाणही मोठं असू शकतं या शंकेला वाव आहेच.

सायबर फसवणुकीच्या, छळाच्या प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवले जाणे, त्या प्रकरणांचा तपास होणे, गुन्हेगार पकडले जाणे, या प्रकरणांचे बळी ठरलेल्यांना न्याय मिळणे या सगळ्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, त्या यंत्रणेचा काम करण्याचा वेग याविषयीही आजवर बरेच लिहिले बोलले गेले आहे.

Instagram Cyber Crime News
सावधान! WhatsApp OTP Scam मधून हॅकर्स साधतायत निशाणा

या साऱ्या पार्श्वभूमीवर फ्युचर क्राईम रिसर्च फाउंडेशनच्या अभ्यासाचा निष्कर्षही महत्त्वाचा ठरतो. या अभ्यासानुसार जानेवारी २०२३ ते जून २०२३ या काळात जे सायबर गुन्हे घडले त्यातले ७७ टक्क्यांहून अधिक अर्थविषयक गुन्हे होते. फाउंडेशनने या अभ्यासावर ‘अ डीप डाइव्ह इनटू सायबरक्राइम ट्रेन्ड्स इम्पॅक्टिंग इंडिया’ अशी श्वेतपत्रिकाच प्रसिद्ध केली आहे.

माणसाच्या मनाला दशदिशांनी वेढूनही अंगुळभर उरणाऱ्या लोभ, मोहादी रिपूंबद्दल विविध दृष्टांत देत माणसाला या साऱ्या विकारांपासून दूर राहण्याचेच सल्ले अनेक तत्त्वज्ञ गेल्या अनेक शतकांपासून देत आहेत. मनात घर करून राहणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार आणि ईर्षा या षड्‌रिपूंवर जो विजय मिळवतो तो जितेंद्रिय असतो, असं विदुर नीती सांगते. अशा जितेंद्रिय अवस्थेपर्यंत प्रत्येकाला पोहोचता येईल की नाही ते सांगणे अवघडच आहे. तंत्रज्ञान-बळी आणि ते रोखण्याचे उपाय यांविषयी जगभर विचार सुरू असतो, कृती होत असते. मात्र या साऱ्याची परिणामकारकता ठरवेल ती प्रत्येक तंत्रवापरकर्त्याची सजगता आणि सद्सद्‌विवेकबुद्धीच.

-------------

Instagram Cyber Crime News
Nashik Cyber Crime: ॲप्लिकेशन पाठवून बँक खातेच केले रिकामे! सायबर भामट्याने 5 लाख घेतले काढून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com