

Maharashtri Prakrit Language
esakal
डॉ. नागनाथ बळते
वररुची, हेमचंद्र आणि मार्कंडेय हे प्राकृत भाषेचे व्याकरणकार आहेत. यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. एवढेच नव्हे, तर ‘शेषं महाराष्ट्रीवत्’ ही उक्ती इतर भाषांपेक्षा महाराष्ट्री प्राकृतचे स्थान सिद्ध करणारी आहे, त्यातूनच पुढे मराठी विकास पावली आहे.
हे मचंद्रांचा काळ आणि कात्यायनांचा काळ यांमध्ये सुमारे दीड हजार वर्षांचे अंतर होते. हेमचंद्रांच्या काळात गुजराती आणि मराठी या भाषा प्रचलित झाल्या होत्या, तर प्राकृत भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त झाल्या होत्या. त्यामुळे हेमचंद्रांनी आपल्या व्याकरणात दिलेली उदाहरणे बोलीभाषेतील नसून प्राचीन ग्रंथांमधील असल्याचे मानले जाते. कात्यायनांनी महाराष्ट्री प्राकृतमध्ये ‘भू’ या धातूचे ‘हो’ आणि ‘हुव’ ही दोनच रूपे दिली आहेत. परंतु हेमचंद्रांनी ‘हो’, ‘हुव’ यांबरोबर ‘हव’ हे तिसरे रूपही स्वीकारले आहे. काळानुसार उच्चारांमध्ये झालेले बदल किंवा हस्तलिखितांतील वाचनभेद यांमुळे त्यांनी हे रूप स्वीकारले असावे. हेमचंद्रांनी आपल्या व्याकरणात ‘महाराष्ट्री’ हा शब्द न वापरता त्या भाषेसाठी ‘प्राकृत’ हा शब्द वापरला आहे. तसेच, शौरसेनी भाषेच्या वर्णनाच्या शेवटी कात्यायनांनी ‘शेषं महाराष्ट्रीवत्’ असा उल्लेख केला आहे; तर हेमचंद्रांनी ‘शेषं प्राकृतवत्’ असा उल्लेख आहे. यावरून त्यांनी महाराष्ट्रीला व्यापक अर्थाने प्राकृत या नावाने संबोधले असावे असे दिसते. थोडक्यात, हेमचंद्रांनी कात्यायनांच्या परंपरेचा स्वीकार केला, मात्र काळानुसार झालेले भाषिक बदल व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे काही नियम व रूपे त्यांनी अधिक व्यापक स्वरूपात मांडली.
उदाहरणार्थ, हेमचंद्रांनी प्राकृत (महाराष्ट्री) भाषेच्या व्याकरणात अनेक धातूंचा समावेश केला आहे. त्यांपैकी अट्ट (आटणे), कोक्क (कोकलणे), खउर (खवळणे), घूसल (घुसळणे), घोट्ट (घोट घेणे), चढ (चढणे), चव (चावटपणा करणे), चोप्पड (चोपडणे), छड्डु (सोडणे), डर (डरणे), ढूंढोल (धुंडणे), णिआर (निहाळणे), णिब्वड (निवडणे), थक्क (थकणे), पज्जर (पंचकळपणा करणे), पञ्झर (पाझरणे), फंस (फसणे), भिड (भिडणे), भुल्ल (भुलणे, चुकणे), बज्जर (वातरटपणा करणे), वडवड (बडबडणे), संघ (सांगणे), सोल्ल (सोलणे) आणि हक्क (हाकणे) हे धातू विशेष उल्लेखनीय आहेत. हेमचंद्रांनी याशिवायही अनेक धातू दिले आहेत. मात्र वरील धातू आजच्या मराठीतील शब्दांशी अधिक साम्य दाखवतात. त्यामुळे महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी यांचा परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठी हे धातू विशेष महत्त्वाचे मानले जातात. यावरून मराठी भाषेतील अनेक शब्दांची मुळे महाराष्ट्री प्राकृतमध्ये असल्याचे दिसून येते.