Astronomy : या खगोलशास्त्राला दिलेल्या दोन मोठ्या देणग्याच होत्या

टीको ब्राहे आणि एडमंड हेली या दोघांनाही जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी ती त्यांना मिळाली नाही, असे आपल्याला दिसून येते.
astronomy
astronomyesakal

अरविंद परांजपे

धूमकेतू ग्रहांसारखेच सूर्याची परिक्रमा करतात हे एडमंड हेलीने दाखवून दिले. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर मोजण्याची पद्धतही त्यानेच सुचविली. हेलीने खगोलशास्त्राला दिलेल्या या दोन मोठ्या देणग्या.

टीको ब्राहे आणि एडमंड हेली या दोघांनाही जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी ती त्यांना मिळाली नाही, असे आपल्याला दिसून येते.

टीकोच्या बाबतीत त्याचे काम केप्लरच्या ग्रहांच्या कक्षांच्या नियमांच्या प्रसिद्धीच्या झोतात कुठेतरी हरवून गेल्यासारखे वाटते. आणि हेलीच्या बाबतीत बोलायचे झाले तर आयझॅक न्यूटनचे काम नक्कीच हेलीपेक्षा वरचढ होते.

पण सूर्यमालेच्या शोधातील टीकोचे योगदान जसे महत्त्वपूर्ण ठरले तसेच हेलीचेही. या दोघांच्या, म्हणजे टिको आणि हेलीच्या सामाजिक जीवनाची तुलना करायची झाली तर केप्लर टीकोचा पगारी नोकरच होता आणि हेली व न्यूटन हे मित्र होते.

हेलीने खगोलशास्त्राला दिलेल्या दोन मोठ्या देणग्या म्हणजे धूमकेतू हे ग्रहांसारखे सूर्याची परिक्रमा करतात हे दाखवून देणे आणि दुसरे म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतर मोजण्याची पद्धत सुचविणे.

astronomy
Aditya L1: सूर्य मोहिमेची मोठी कामगिरी! पहिल्यांदाच सूर्याची जवळून टिपली छायाचित्रे; मोहिमेचं पुण्याशी खास कनेक्शन

एडमंड हेलीचा (Edmond Halley) जन्म ८ नोव्हेंबर १६५६ रोजी मिडलसेक्स हॅगर्स्टन येथे एका सधन घरात झाला. त्याच्या वडिलांचा, एडमंड हेली सीनियर यांचा, साबण बनवण्याचा कारखाना होता. लहानपणापासूनच हेलीला गणिताची खूप आवड होती.

त्याला लंडनमधील प्रसिद्ध सेंट पॉल स्कूलमध्ये पाठविण्यात आले. आणि इथेच त्याला खगोलशास्त्रात रुची वाटू लागली, आणि वाढलीही. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याला शाळेचा कॅप्टन नेमण्यात आले होते. पुढे जुलै १६७३मध्ये त्याने ऑक्लफर्डच्या द क्वीन्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

तिथे तो स्वतःची दुर्बीणही घेऊन गेला होता. त्याला ती त्याच्या वडिलांनी विकत घेऊन दिली असावी. या दुर्बिणीचा वापर तो ग्रहांच्या आणि ताऱ्यांच्या जागांची नोंद घेण्यासाठी करत होता. ग्रहांच्या जागांची भाकिते आणि टीको ब्राहेने दिलेल्या ताऱ्यांच्या नोंदी यांत फरक दिसल्याने त्याने आपली ही निरीक्षणे जॉन फ्लेमस्टीड यांच्याकडे पाठवली. फ्लेमस्टीड हे पहिले अॅस्ट्रॉनॉमर रॉयल होते.

ग्रीनीचच्या रॉयल ऑब्झर्व्हेटरीची स्थापना करणाऱ्या चार्ल्स द्वितीय या इंग्लंडच्या राजाने अॅस्ट्रॉनॉमर रॉयल हे पद निर्माण केले होते. अॅस्ट्रॉनॉमर रॉयल हा रॉयल ऑब्झर्व्हेटरी ग्रीनीचचा संचालक असायचा भविष्यात ग्रहांच्या जागा अचूकपणे सांगणारे पंचाग तयार करणे, हे त्याचे मुख्य काम असायचे.

ताऱ्यांच्या जागांची अचूक नोंदणी करून त्याची सारणी प्रसिद्ध करायची, हादेखील अॅस्ट्रॉनॉमर रॉयलच्या कामाचा भाग असे. हे आकडे खगोलनिरीक्षणासाठी महत्त्वाचे तर होतेच पण त्यांचा उपयोग समुद्रमार्गे होणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा होता.

१९७२पासून ह्या पदवीचे स्वरूप मानद पदवी असे करण्यात आले आणि आता हा बहुमान मिळवणाऱ्या संशोधकांना वेधशाळेच्या कार्यकारी जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

फ्लेमस्टीडने हेलीला आपल्या निरीक्षणांबाबत एक शोधनिबंध लिहिण्यास प्रोत्साहित केले आणि अवघ्या २० वर्षांच्या हेलीने जो शोधनिबंध प्रसिद्ध केला त्यामुळे त्याचे नाव शास्त्रज्ञांच्या गोटात प्रसिद्धीस आले.

astronomy
सूर्यमालेच्या शोधातील दोन नावे अशी आहेत ज्यांनी इतर शास्त्रज्ञांसारखे शोध लावले नाहीत.

हेलीला हे काम आणखी पुढे न्यायचे होते; पण इंग्लंडमध्ये फ्लेमस्टीड यांनी तर डॅनिश खगोलशास्त्रज्ञ योहानेस हेवेलियस यांनीही हेच काम हाती घेतल्याचे लक्षात आल्याने आपल्या कामाचे नावीन्य दाखविण्याकरिता त्याने दक्षिण गोलार्धातून निरीक्षणे घेण्याचे ठरविले.

त्यासाठी त्याने दक्षिण अटलांटिक बेटांमधील सेंट हेलेना या बेटावर जाण्याचे ठरवले. साधारण १६ बाय ८ किलोमीटर लांबी रुंदीचे हे बेट दक्षिण पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून सुमारे दोन हजार किलोमीटर दूर आहे.

सेंट हेलेनामधून त्याला दक्षिण गोलार्धातील सर्व तारे तर दिसणार होतेच, पण त्याचबरोबर तो उत्तर गोलार्धातील बहुतांश ताऱ्यांचीही निरीक्षणे घेऊ शकणार होता, हा सेंट हेलेना बेटावर जाण्याचा एक मोठा फायदा होता.

आपण घेत असलेली निरीक्षणे किती अचूक आहेत हे पडताळून पाहण्याकरिता ही उत्तर गोलार्धातील ताऱ्यांची निरीक्षणे महत्त्वाची असणार होती.

त्याचे शिक्षण अजून पूर्ण झालेले नव्हते तरीही तिथे जाण्याकरिता जेव्हा तो परवानगी मागण्याकरिता गेला तेव्हा त्याच्या वडिलांनी मोठा समजूतदारपणा दाखवत त्याला नुसती परवानगीच दिली नाही, तर त्याला वार्षिक ३०० पाऊंडाची रक्कमही देऊ केली. ही रक्कम त्या काळात त्याला एक मोठी आर्थिक मदत होती. या शिवाय किंग चार्ल्स द्वितीय यानेही त्याला प्रोत्साहन दिले.

वर्ष १६७६च्या अखेरीस हेलीने आपल्या प्रवासाला सुरुवात केली. साडेपाच फूट त्रिज्या असलेला सेक्सटंट आणि आपली २४ फूट लांबीची दुर्बीण तो बरोबर घेऊन गेला होता. त्या काळात दुर्बिणी त्यांच्या फोकल लेंथवरून ठरवत असत.

सेंट हेलेनामध्ये मात्र त्याला हवामानाने दगा दिला. नेहमी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस. त्यामुळे एका वर्षातच तो परतला. पण सेंट हेलेनामध्ये असताना आकाशाने साथ दिली तेव्हा तेव्हा त्याने निरीक्षणे घेतली, इतकी की नंतर त्याला लोक दक्षिणेचा टीको ब्राहे (Tycho Brahe, 1541-1601) म्हणू लागले.

इथूनच त्याने बुधाच्या पिधानाचे निरीक्षण घेतले आणि या निरीक्षणावरून त्याला पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर शोधून काढण्याची कल्पना सुचली. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणार आहोत.

परत आल्यावर ऑक्सफर्डने मात्र त्याला पुन्हा कॉलेजमध्ये घेण्यास नकार दिला. पण हेलीला बिनशर्त मास्टर ऑफ आर्टस््‌ची पदवी देण्यात यावी, अशी विनंती चार्ल्स द्वितीयने एका पत्राद्वारे ऑक्सफर्डला केली.

प्रत्यक्ष राजाची विनंती म्हणजे नम्रपणे केलेली आज्ञाच असल्याने ३ डिसेंबर १६७८ रोजी त्याला ही पदवी देण्यात आली. पाठोपाठ त्याची फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून निवडही झाली. यावेळी तो अवघा बावीस वर्षांचा होता.

astronomy
Underwater Telescope : चीनचा मेगाप्लॅन, समुद्रात बनवतंय जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप! काय होणार फायदा?

पुढे दोन वर्षांनंतर हेली युरोपियन देशांच्या दौऱ्यावर गेला. प्रत्येक देशात मैत्रीपूर्ण स्वभावाच्या आणि दुर्मीळ बुद्धिमत्तेच्या खुणा ठेवत त्याचा हा प्रवास झाला.

फ्रान्समध्ये त्याचे खूप चांगले स्वागत झाले. इथेच त्याची भेट जियोव्हानी डोमेनिको कॅसिनीशी झाली. कॅसिनी हा त्याकाळातला एक मोठा खगोलशास्त्रज्ञ होता.

त्याची आणि हेलीची खूप चांगली मैत्री जमली होती. त्या दोघांनी मिळून त्यावेळी दिसत असलेल्या धूमकेतूंची निरीक्षणेही घेतली होती. हे धूमकेतूसुद्धा इतर ग्रहांसारखे सूर्याची परिक्रमा करत असावेत, असे मत कॅसिनी व्यक्त केले होते. पुढे याच सिद्धांताने हेलीला खगोलशास्त्रात मोठे नाव मिळवून दिले.

इंग्लंडला परत आल्यावर २० एप्रिल १६८२ या दिवशी हेलीने मेरी टूकबरोबर लग्न केले. मेरीच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे पुढची पंचावन्न वर्षे या दोघांनी आनंदाने संसार केला. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या सर्व शास्त्रज्ञांमध्ये हेली आणि मेरी यांचा संसार सर्वात यशस्वी ठरला होता. हेलीने खगोलशास्त्राव्यतिरिक्त इतरही विषयांचा अभ्यास केला.

जिच्या खाली बसून नदीच्या पाण्यात खोलवर उतरणे शक्य होऊ शकेल अशी एक मोठी घंटा त्याने तयार केली होती. आपल्या पाच मित्रांबरोबर थेम्स नदीत १८ मीटर खोल उतरून तिथे दीड तास राहू शकला होता.

या घंटेचा उपयोग नदीच्या तळाशी अडकलेल्या वस्तूंचा शोध आणि त्या वस्तू बाहेर काढण्यासाठी होऊ शकेल, हे त्याला दाखवायचे होते.

पृथ्वीचे चुंबकीय उत्तर ध्रुव आणि भौगोलिक उत्तर ध्रुव समान नाहीत आणि वेगवेगळ्या अक्षांश रेखांशावर त्यांची दिशा बदलत असते हेदेखील त्याने शोधले. समुद्रप्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी या दोन्हींमध्ये किती फरक असतो याची सारणी त्याने तयार केली. नाविकांना ही माहिती असणे खूप महत्त्वाचे असते.

------------

astronomy
प्रयोगातून शिका खगोलशास्त्र व अवकाश विज्ञान 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com