Mother Cooking :आहाहा! पृथ्वीतलावरची सगळी खमंगाई त्यात उतरलेली...

Puranpoli
Puranpoliesakal

आई जेव्हा शेवया करी तेव्हा मी तासनतास बघत बसे. डालड्याच्या दोन पिंपांवर वेळूची लांबसडक काठी ठेवलेली आणि तिच्यावर हाताने केलेल्या शेवया वाळत घालायच्या. आईच्या शेवयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पाण्यात कितीही गदागदा उकळले तरीही त्यांचा रेषाकार शाबूत राहतो. अलीकडच्या काळातील नूडल स्वतःच्या हाताने उकडून खाताना मला आईच्या शेवयांची आठवण येते..

प्रा. विश्वास वसेकर

‘Mother is the best cook in the world.’ अशी मानवशास्त्रातील एक म्हण आहे आणि जगातला प्रत्येक मातृभक्त माणूस या म्हणीशी सहमत होईल. आई मुलाचं पोषण, भरण व रुची संपन्न करण्यासाठी त्याला जेवू घालते. सगळ्यांना वरदान देणाऱ्या श्रीकृष्णालासुद्धा एकदा वर मागायची वेळ आली तेव्हा त्याने वरदात्याला कोणता वर मागावा, जन्मभर आईच्या हातचं खायला मिळू दे!

माझी आई माझ्या वयाच्या ६८व्या वर्षापर्यंत जगली, म्हणजे जवळजवळ जन्मभर तिच्या हातचं मला खायला मिळालं. शेवटची काही वर्षं ती स्वयंपाक करत नव्हती तरी काही विशिष्ट पदार्थ आईच्या शैलीतच झाले पाहिजेत आणि तिला विचारूनच केले पाहिजेत, असा माझा आग्रह असे. स्वयंपाकातले सगळे बारकावे तिच्या दोन्ही सुना तिला विचारतच आपल्या स्वयंपाकात आणत असत. तिला मी जगातली सर्वात श्रेष्ठ सुगरण मानतो. माझी खाण्याची अभिरुची, जिला ‘चवना’ असा उत्तम मराठवाडी शब्द आहे, तिच्या महान पाककलेने घडवली.

पन्नास वर्षापूर्वी जेव्हा नॉनस्टीकच्या तव्यांचा शोधही लागला नव्हता तेव्हा नेहमीच्याच भाकरी, पोळ्या करायच्या तव्यावर धिरडं करणं सोपं नव्हतं. आई त्याच तव्यावर वाळूक किंवा गाजराच्या अर्ध्या कापलेल्या भागाला तेल लावून ते तेल तव्यावर फिरवत असे. पूर्वीचे तवे मुळी धिरड्यांसाठी बनवलेलेच नव्हते.

त्यामुळे असल्या तव्यावर तेल फार हळुवारपणे फिरवावे लागे. सामान्यतः कणीक किंवा तांदळाचे पीठ वापरून धिरडे करतात. या दोन्ही पिठांमध्ये एक मऊपणा, लुसलुशीतपणा असतो. आई तर गव्हापेक्षाही जाड्याभरड्या असणाऱ्या जोंधळ्याच्या पिठाचे धिरडे करी. आईच्या धिरड्यांचे कधी तुकडे पडले नाहीत, किंवा ती कधी फसली नाहीत.

कणीक किंवा तांदळाचे पीठ न वापरता जोंधळ्याच्या पिठाची धिरडी का करायची? याचे कारण गरिबी. आमच्याकडे पोळी किंवा भात आई फक्त सणासुदीला करत असे. गरिबीतून जन्मलेल्या सुगरणपणातही एक वेगळेच सौंदर्य आणि सूक्ष्मता असते. आईमध्ये ती होती. घरात कधी गोडेतेल नसेल, तेव्हा आई ‘तडफोडणी’ द्यायची. तडफोडणी म्हणजे गोडेतेल न वापरता तापलेल्या कोरड्या भांड्यात मोहऱ्या फुटू देणे. त्या फुटल्या की झाली फोडणी.

गरिबीचा स्वयंपाक करणे म्हणजे बेचव आणि नीरस स्वयंपाक करणे नव्हे. आपण पुष्कळदा म्हणतो, स्वयंपाक करताना करणाऱ्याच्या हातचा गुण त्याच्यात उतरत असतो. माझ्या घरातील अन्नाला अप्रतिम स्वाद आणि रुची यायची ती आईच्या हातच्या गुणामुळे.

Puranpoli
Bill Gates Cooks Khichdi : बिल गेट्स बनले शेफ! स्मृती इराणींसोबत बनवली खिचडी; पाहा Video

धिरड्यापेक्षाही करायला अवघड पदार्थ म्हणजे माझ्यामते पुरणपोळी हा आहे.

पुरणपोळी करण्यासाठीची कणीक पोळ्या करण्याच्या कणकेपेक्षा एका विशिष्ट प्रमाणात पातळ तिंबावी लागते. कणकेच्या या पातळपणामुळेच पुरणाची गोळी पुरणपोळीच्या काठापर्यंत पोहोचू शकते. आईच्या पुरणपोळीत पुरण अगदी काठापर्यंत पसरलेले असे. म्हणजे पोळीचा कितीही अलीकडचा आणि छोटा तुकडा मोडला तरी त्यात पुरण असणारच.

कितीही माणसे जेवायला बसली तरी जरा हळूहळू जेवा बरं का! अशी आईची सूचना असायची. कारण पुरणपोळी प्रत्येकाला तव्यावरून ताटात वाढली गेली पाहिजे. पुरण साधंच असायचं. त्यात ना जायफळ, ना वेलची. तरीही आईची पुरणपोळी स्वादिष्ट होत असे. लहानपणी आम्हाला तुपात बुडवून पुरणाची पोळी कधी खाता आलीच नाही. दुधाच्या वाटीत तुपाचे एक-दोन थेंब टाकले जायचे. दुधाच्या पृष्ठभागावर तुपाचे एक दोन चंद्र उमटायचे त्या चंद्राना डिवचतच पुरणपोळी खायची.

मी बारा वर्षं आवडीने स्वयंपाक केला तेव्हा पिठलं हा माझा आवडता पदार्थ होता. माझ्यासारखं सुंदर पिठलं कुणालाच करता येत नाही, असा माझा दावा आहे. पिठलं सुंदर कसं करायच हे मी माझ्या आईचं पाहून शिकलो. फोडणी दिल्यानंतर उकळी आलेल्या पाण्यात कढीचं पीठ हाटणे ही एक फार अवघड गोष्ट आहे. उजव्या हातात उलथणे किंवा सराट्याचं मोठं टोक धरायचं आणि दुसऱ्या टोकाने पिठलं हाटायचं.

डाव्या हाताने कढीचं पीठ भुरभुरताना खरी कसोटी असते. उकळी फुटलेल्या पाण्यात उलथण्याचे टोक इतके वेगाने फिरवावे लागते की पिठाची गुठळी होता कामा नये. हे तुमचे काम कमीतकमी वेळात पूर्ण झाले नाही तर आतील पिठल्याचे शिंतोडे तुमच्या हाताला लागू शकतात. ज्या पिठल्यात डाळीच्या पिठाच्या शुभ पांढऱ्या गुठळ्या निघतात ते पिठलं सपशेल फसलं असं समजावं.

असं पिठलं करण्यात ज्यांना यश येत नाही त्या बिचाऱ्या बायका नुसत्या पाण्यात पीठ कालवून ते फोडणीत ओततात. असं पिठलं पचायला त्रास देतं आणि खमंगही होत नाही. भूतकाळात चांगलं पिठलं फक्त माझी आई करू शकत असे आणि वर्तमानकाळात

मी.

करडखीर हा एक माझ्या आईचा खास पदार्थ. जात्यात करडी भरडून तयार केलेल्या दुधात तांदूळ शिजवून केलेला हा गोड पदार्थ आई नेहमीच करायची. तो कढीपेक्षा घट्ट आणि पिठल्यापेक्षा पातळ असावा लागतो. पुरणपोळी जशी आई गुळाचीच करायची तशी करडखीरीमध्येसुद्धा साखरेऐवजी गूळच वापरायची.

करडी ही मुळात तेल बी असल्यामुळे करडखीर हा पदार्थ गोड असून खमंगसुद्धा होतो. तो जेव्हा आई करायची तेव्हा ताटात नुसती करडखीरच असे. मर्यादित स्वरूपात जर ती खाल्ली नाही तर पन्नास वर्षापूर्वीच्या खेड्यातल्या खाणाऱ्याच्या गावाबाहेरच्या चकरा वाढायच्या.

खाद्यसंस्कृतीच्या बाबतीत मराठवाड्याचे बाकीच्या महाराष्ट्रापेक्षा वेगळेपण म्हणजे ‘उकडशेंगुळ’. हा पदार्थ मराठवाड्याच्या बाहेर कुणी करत नाही. केलाच तर ज्यांची मुळं मराठवाड्यात आहेत, पण आता ते मराठवाड्याच्या बाहेर स्थायिक झाले आहेत अशाच मंडळींच्या घरीच होतो. उकडशेंगुळ म्हणजे फोडणीच्या पाण्यात शेंगुळ शिजवणे.

एकदा माझ्या आईने शेंगुळ्यात टोपीसारखा आकार करून काही भाग टाकला तर खडूस आज्या चिडल्या. त्यांनी रागाने विचारले, ‘‘हे काय आहे?” आई म्हणाली, ‘‘टोपी!’’ तर आज्या म्हणाल्या, “घाल माझ्या डोक्यावर.” तेव्हा आम्ही खूप हसलो. त्यानंतर आईने पुन्हा कधी उकडशेंगुळ्यात टोपी घातली नाही.

अनेक वर्षं सासुरवासात काढल्यानंतर वडिलांनी आम्हा सर्वांना घेऊन देवीचे भोगाव या गावी बिऱ्हाड थाटले. तिथे आम्ही ज्यांचे किरायदार होतो, त्या गजानन जोशींच्या बायकोने उकडशेंगुळ्यात थोडा बदल केला होता, तो आम्हाला आवडला आणि आजतागायत आम्ही ती पद्धत चालवली आहे.

उकडशेंगुळी शिजवलेले जे पाणी आहे त्यात त्यांच्या शिजवण्यामुळे खमंगपणा येतोच. आमच्या या मालकीणबाई त्यात थोडी मुगाची डाळ टाकायच्या. अशा पाण्यात शेंगुळी कुस्करून खाताना एक अजून चांगला स्वाद मिळायचा.

Puranpoli
Apple CEO Tim Cook: अॅपलचे सीईओ टिम कुक यांचे भारतीय संस्कृतीबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाले, भारतात इतिहास...

माझी आई एवढी सुगरण असूनदेखील तिला मी माझ्या आवडीच्या संदर्भात ना ना सूचना करायचो. तेव्हाचे तिचे ठरलेले वाक्य असायचे, ‘माहित्येय तुला मोठा चवणा आहे ते.’ एकदा मी चंद्रमोळी मंदिरात राहणाऱ्या मैनाबाई गुरवीन हिने अंगणातल्या चुलीवर केलेले धपाटे पाहिले. दोन्हीकडून तेल लावल्यामुळे तव्यामधून पांढरा धूर निघत होता. त्यांनी मला गरमगरम धपाटे खायलाही दिले. इतके सुंदर धपाटे माझ्या आईलासुद्धा जमले नव्हते.

तेव्हापासून घरी धपाटे होत असतील तर माझी पूर्वी आईला आणि आता बायकोला सक्त ताकीद असते, की धपाटे मैनाबाई गुरविनीसारखे झाले पाहिजेत. इतकं भरपूर तेल लाव की त्यातून पांढरा धूर निघाला पाहिजे. एका अर्थानं आई माझी पहिली समीक्षक होती. ती स्वतः निरक्षर असली तरी आपला मुलगा जे लिहितो ते इतरांपेक्षा काही तरी वेगळं असतं याची तिला जाणीव होती.

तसाच मी सरसकट केलेला स्वयंपाक खात नसतो तर मला ‘स्पेशल’ असं काहीतरी लागतं तेही तिला माहीत होतं. तिच्याकडून मला पाहिजे तस्साच स्वयंपाक मी करून घ्यायचो त्यामुळे माझ्या या आद्य समीक्षकाचं माझ्याविषयी विधान असं होत, “घासा आगळं खाणार आणि टाका आगळं लिहिणार.” खूप अवघड अवघड पदार्थ करायला आईला जमायचे.

उदाहरणार्थ बारीक पोत असलेली फेणी. आता फेणी हा प्रकार फक्त यंत्राने तयार केलेल्या हैदराबाद वगैरेच्या बाजारातच पहायला मिळतो. आई हाताने तयार केलेली फेणी साजूक तुपात तळून काढायची, तेव्हा तिचा गुंतागुंतीचा बाह्य आकारही शाबूत राहिलेला असे. त्या मग साखर आणि तुपात बुडवून खायच्या असत. कुरकुरीतपणा हे फेणीचे स्वाद सौंदर्य. आई जेव्हा शेवया करी तेव्हा मी तासनतास बघत बसे. डालड्याच्या दोन पिंपांवर वेळूची लांबसडक काठी ठेवलेली आणि तिच्यावर हाताने केलेल्या शेवया वाळत घालायच्या.

आईच्या शेवयांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना पाण्यात कितीही गदागदा उकळले तरीही त्यांचा रेषाकार शाबूत राहतो. अलीकडच्या काळातील नूडल स्वतःच्या हाताने उकडून खाताना मला आईच्या शेवयांची आठवण येते. तसाच आईचा एक खास पदार्थ म्हणजे अनारसे. तुपात टाकल्यानंतरही त्यांचा आकार कायम राहिला की ते अनारसे यशस्वी झाले. महालक्ष्मीच्या सणानंतर मंडपीला लटकवलेले तिने केलेले अनारसे, करंज्या, साटोऱ्या ती एका मोठ्या डब्यात भरून ठेवी.

हा मधुर फराळ आम्हाला नंतरचे कित्येक दिवस खायला पुरे. ‘चवणा'सारखे सदर लिहिणाऱ्या लेखकाचा त्याच्या आईने केलेला सर्वात आवडता खमंग पदार्थ कोणता, तर कोहळा-उडदाचे वडे. आईखेरीज इतर कोणी केलेला हा पदार्थ माझ्या खाण्यात नाही (अपवाद फक्त तिच्या सुनांचा). कोहळ्याचे वडे करायचे झाल्यास आई आदल्या दिवशी उडदाची डाळ भिजत घालायची, दुसऱ्या दिवशी पाट्यावरवंट्यामध्ये ती ओबडधोबड बारीक करायची.

त्यानंतर कोळ कोहळा किसायचा. त्यात खूप पाणी असतं. कीस पिळून बाजूला ठेवायचा. कीस, वाटलेली डाळ, त्यात थोडी मेथीची पाने, कोथिंबीर, हिंग, जिरे, धने वगैरे टाकायचे आणि तिखट-मीठही अर्थात! आई या मिश्रणाचे वडे तळून काढायची. मग हे गरमागरम वडे गरम गरम भातात कालवून खायचे आहाहा!

पृथ्वीतलावरची सगळी खमंगाई त्यात उतरलेली असते. वडे केलेल्या दिवशी दुसरे काहीच करायचे, खायचे नाही. वरण, पोळी, चटणी वगैरे काहीही नाही. वन पीस आयटम. आईच्या हातचे वडे खाल्यानंतर दिवसभर इतकी सुंदर तहान लागायची म्हणता! त्यानंतर दिवसभर सारखं पाणीच पीत राहावं असं वाटे.

Puranpoli
Kurdaya Bhaji: नुडल्सपेक्षाही भारी लागणारी आणि खायला पौष्टिक असणारी कुरडया भाजी कशी तयार करायची?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com