कथा : गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन संकल्प करू, असं घरात सगळ्यांनी ठरवलं होतं...

मराठीच्या श्रद्धा मॅडम म्हणाल्या होत्या, घरचं वळण, स्वभाव सारं सारं उतरतं आपल्या अक्षरात. त्यामुळे अक्षर छान असलं की आपोआप सगळं जमलंच..
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 Esakal

कविता मेहेंदळे

यंदा गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन संकल्प करू, असं घरात सगळ्यांनी ठरवलं होतं. हळूहळू घरातल्यांचे संकल्प जाहीर व्हायला लागले.

बाबा म्हणाला, ‘‘कमी खाण्यानं वजन कमी होतं यावर विश्वास ठेवण्याचे दिवस संपलेत. आता पहाटे उठून फिरायला जाणं एवढा एकच मार्ग दिसतो. भले, एखाद्या दिवशी दाढी करणं जमलं नाही तरी...!’’

आजीने, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ जपाच्या तीन माळा ओढायच्या ठरवलं. आई रोज रात्री ‘रोजनिशी लिहिणार’ असं घोकीत होती, त्याकरिता एका देखण्या डायरीची खरेदी झाली होती. दिशानं जाहीर केलं, ‘‘आई, मीसुद्धा अधूनमधून खाण्याचा पदार्थ करून पाहीन.’’

घरी आईसुद्धा ‘अक्षर सुधार रे राजा’ असा जप करायची. परंतु परीक्षेतले मार्क अक्षराशीही निगडित असतात हे प्रशांत सरांनी नीटपणे लक्षात आणून दिलं होतं. त्यात तथ्य होतंच. ‘प्रगतीला ते मारक आहे’ असं आबांचं सांगणं पटत होतं. मराठीच्या श्रद्धा मॅडम म्हणाल्या होत्या, ‘‘घरचं वळण, स्वभाव सारं सारं उतरतं आपल्या अक्षरात. त्यामुळे अक्षर छान असलं की आपोआप सगळं जमलंच.’’

‘‘परिमल, मघापासून मी पाहतेय, तू टाळाटाळ करतोयस. मी ते अजिबात खपवून घेणार नाहीये.’’

‘‘कसली गं टाळाटाळ? आई, तुला मी चुकारपणा करतोय असं म्हणायचंय ना?’’

‘‘नाहीतर काय?’’

‘‘तरी बरं, मामा चल म्हणाला म्हणून त्याच्याबरोबर जाऊन विड्याची पानं आणली. ठेल्यावर देठाची मिळाली नाहीत म्हणून मंडईतून आणली. ते बघ की! मामानं तिथून माझ्यासाठी गंमतपण आणलीय.’’

‘‘लाड करून घेतोयस मामाकडून! काय आणलंयस ते तर दाखव...’’

‘‘आई, मी टीव्ही बघत बसलो नाहीये की फोनवरचे गेम खेळत नाहीये. उलट, ‘बाळ रडतंय खुळखुळा वाजवत बस’ असं मावशीनं सांगितल्यावर बाळाला खेळवलं. खुळखुळा त्याच्या हातात दिला नाही.’’

‘‘विषयाला फाटे फोडू नकोस हं परिमल! दहा महिन्यांचं बाळ काही मागतं का?’’

‘‘हंऽऽ! पण खुणेनं सांगतं की!’’

‘‘खरं की काय?’’ परिमलचं तोंड उघडून हाताची बोटं वरवर नाचवणं पाहून आईला हसू फुटलं. मान उडवीत ती पुढे म्हणाली, ‘‘संध्याकाळी समुद्रावर जाशील आणि सोईस्करपणे सुलेखन विसरशील. सुबक अक्षरात दहा ओळी लिहून व्हायला हव्यात.’’

‘‘विसरणार नाहीये. विश्वास ठेव की गं आई!’’

‘‘गीता, किती लहान आहे परिमल अजून! अवघा पाचवीत आहे. विश्वास काय? किती दटावतेस गं त्याला!’’ सुलू मावशीनं विचारलं.

आईचं उत्तर तयार होतं, ‘‘लहान कसला आता? जाऊ दे. कळेल तुलाही.’’

लगेचच परिमल सुरेख हस्ताक्षराची वही नि पेन घेऊन आला. समोरच्या वर्तमानपत्रातली एक बातमी लिहायला त्यानं सुरुवात केली. शुद्धलेखनात खंड नको म्हणून त्यानं हस्ताक्षराची वही बरोबर आणलेली होती. मावशीच्या घरचं कार्य होतं, आणि त्यानिमित्तानं मंडळी रत्नागिरीला आली होती. शनिवार-रविवारला जोडून सोमवारची सुट्टी आली होती.

मावशीनं तोच मुहूर्त साधला होता. तसंही कोकणात यायला परिमलला खूप आवडायचं. पालशेतला आजोळी जायचं असू दे किंवा रत्नागिरीला मावशीकडे! वेगळीच धम्माल यायची. यावेळी परिमलची आई, मावशी, मामी कामात गुंतल्या होत्या. त्यामुळं परिमल छोट्या नेहाचं, म्हणजे बाळाचं निरीक्षण करत बसायचा.

बाळ जास्त वेळ झोपलेलं असायचं. दूध पिण्यापुरतं उठायचं, तेव्हा रडायचं. रडताना त्या छोटुल्या पायांची ‘सायकल’ अखंड सुरू असायची. बाळाकडे पाहता पाहता परिमलला पेंडीतले सोलाणे खुडायला आवडायचं. टपाटप बोरं तोंडात टाकणं हा टाइमपासही खुशीचा होता. मधूनच आईच्या आणि मावशी-मामीच्या तोंडात बोरं घालून त्यांनाही तो खूश करायचा.

ही सगळी धमाल चालू असली, तरी परिमल सुलेखन विसरला नव्हता. सुलेखनाचं महत्त्व आता त्याला चांगलंच पटलं होतं. ‘त्या’ अनुभवाच्या आठवणीनंही तो खजील व्हायचा. सहामाही परीक्षा झाल्यावर वर्गात एक-एक पेपर मिळायला लागले. मार्क समजू लागले.

गणितात त्याला चांगले गुण होते. सायन्सचेही ठीकठाक होते. सरांनी ‘आकृत्यांसाठीही सराव हवा’ असं परिमलला नाव घेऊन सांगितलं होतं. ‘पुस्तकाकडे नुसतं पाहून आजवर कोणीच सुरेख आकृती काढू शकलेला नाही’ अशी पुस्ती जोडायला ते विसरले नव्हते. इतिहासाच्या प्रशांत सरांनी मात्र ‘इज्जत का फालुदा’ केला होता.

उत्तरपत्रिकेचा पतंग वर्गासमोर फडफडवला. म्हणाले, ‘‘सुरुवातीला वाटलं शिवराज्याभिषेकाचं वर्णन परिमलनं मोडी लिपीत लिहिलेलं दिसतंय. मग लक्षात आलं, ही अगम्य लिपी त्याची स्वतःचीच आहे.

मार्क देणाऱ्याला पेपर तपासता येईल एवढं तरी सुबक अक्षर काढत चल, परिमल.’’ तेवढ्यात वर्गातलं कोणीतरी ‘कोंबडीचे पाय पकाक् पक्’ म्हणालं तर दुसरं कोणी ‘मुंग्यांची फौज तुटून पडलीय’ असं चिडवून गप्प बसलं. परिमलनं मागं वळून पाहिलं, पण त्याला कोणत्या मित्राचा आवाज होता ते कळलं नाही. परिमलला खूप वाईट वाटलं होतं त्यावेळी.

घरी आईसुद्धा ‘अक्षर सुधार रे राजा’ असा जप करायची. परंतु मार्क अक्षराशीही निगडित असतात हे प्रशांत सरांनी नीटपणे लक्षात आणून दिलं होतं. त्यात तथ्य होतंच. ‘प्रगतीला ते मारक आहे’ असं आबांचं सांगणं पटत होतं. मराठीच्या श्रद्धा मॅडम म्हणाल्या होत्या, ‘‘घरचं वळण, स्वभाव सारं सारं उतरतं आपल्या अक्षरात.

त्यामुळे अक्षर छान असलं की आपोआप सगळं जमलंच.’’ पण काही असू दे. अक्षरं गिरवणं आता शक्य नव्हतं. सराव आणि सावकाश, लक्षपूर्वक लिहूनच ते सुधारायचं होतं. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन संकल्प करू, असं घरात सगळ्यांनी ठरवलं होतं. हळूहळू घरातल्यांचे संकल्प जाहीर व्हायला लागले.

बाबा म्हणाला, ‘‘कमी खाण्यानं वजन कमी होतं यावर विश्वास ठेवण्याचे दिवस संपलेत. आता पहाटे उठून फिरायला जाणं एवढा एकच मार्ग दिसतो. भले, एखाद्या दिवशी दाढी करणं जमलं नाही तरी...!’’

आजीने, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ जपाच्या तीन माळा ओढायच्या ठरवलं. आई रोज रात्री ‘रोजनिशी लिहिणार’ असं घोकीत होती, त्याकरिता एका देखण्या डायरीची खरेदी झाली होती. दिशानं जाहीर केलं, ‘‘आई, मीसुद्धा अधूनमधून खाण्याचा पदार्थ करून पाहीन.’’

‘‘त्याबरोबर ‘अट’ राहील. त्यासाठी केलेला ओट्यावरचा पसरादेखील आवरायचा...’’

‘‘होऽऽय! काही केलं तरी तू खोट काढतेसच!’’ दिशा तणतणत तिच्या खोलीत निघून गेली. एकदम पसरलेल्या शांततेला छेदीत परिमल म्हणाला, ‘‘मी रोज दहा ओळी शुद्धलेखन लिहीन. अभ्यासाव्यतिरिक्त!’’

‘‘म्हणजे तू वाचून मग लिहिणार?’’ बाबानं विचारलं.

‘‘अर्थात! वाचल्याखेरीज शुद्ध लिहिणं अवघड होईल.’’

‘‘बरं झालं तुझं तुला कळलं. आता फक्त तेरड्याचा रंग उतरणार नाही इतकंच पाहायचं. ऐकताय ना, परिमलच्या आई?’’ बाबाने भुवया उंचावल्या. बोलण्यातली खोच लक्षात न आल्यानं परिमल गोंधळून आई-बाबाकडे पाहत राहिला होता.

आत्ता या क्षणी हे सर्व आठवून परिमलला हसू आलं... आणि सारं काही समजल्यासारखं नेहा बाळही हसत होतं.

----------------------

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने या सर्व गोष्टीचे शास्त्रीय महत्व काय? जाणून घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com