Badminton Player : अश्विनी-तनिशाची जमली जोडी

२०२३ वर्षाच्या सुरुवातीपासून ही नवी जोडी महिला दुहेरीत बॅडमिंटन कोर्टवर उतरली.
badminton
badminton esakal

अश्विनी-तनिशा यांनी पॅरिस ऑलिंपिक पात्रतेचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्टच आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी पुढील वर्षी ३० एप्रिलपर्यंतचे मानांकन ग्राह्य असेल. सध्या अश्विनी-तनिशा जोडीसमोर जागतिक खेळाडूंबरोबर आणखी एका युवा भारतीय जोडीचे खडतर आव्हान आहे.

किशोर पेटकर

अश्विनी पोन्नाप्पा ही भारताची दुहेरी बॅडमिंटनमधील अनुभवी महिला बॅडमिंटनपटू. ज्वाला गुट्टाच्या साथीत तिने जागतिक बॅडमिंटन कोर्ट गाजविले.

२०११मध्ये जागतिक स्पर्धेत महिला दुहेरीत ब्राँझपदकाची कमाई केली, तसेच २०१० साली राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले.

कालांतराने ज्वालाने निवृत्ती घेतली आणि अश्विनीला उदयोन्मुख खेळाडू एन. सिक्की रेड्डी हिच्याशी जोडी जमवावी लागली, पण त्यांना विशेष यश प्राप्त झाले नाही.

गतवर्षी अश्विनी आणि सिक्की रेड्डी यांनी वेगळे होण्याचे ठरविले. त्यानंतर अश्विनीने आपल्यापेक्षा वयाने चौदा वर्षे लहान असलेल्या तनिशा क्रास्टोसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. २०२३ वर्षाच्या सुरुवातीपासून ही नवी जोडी महिला दुहेरीत बॅडमिंटन कोर्टवर उतरली.

अश्विनीचे वय चौतीस, तर तनिशा वीस वर्षांची आहे. अनुभवाचा विचार करता, बंगळूरमध्ये जन्मलेली अश्विनी आंतरराष्ट्रीय महिला दुहेरीतील दिग्गज खेळाडू आहे.

तनिशाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आत्ता कुठे सुरू झाली आहे. मात्र त्यांची जोडी चांगलीच जमल्याचे २०२३मधील त्यांची कामगिरी बघता जाणवते. फेब्रुवारी महिन्यात अश्विनी-तनिशा जोडी जागतिक क्रमवारीत १४१व्या स्थानी होती.

वर्षभरात चमकदार खेळ करत त्यांनी आता पहिल्या २५ जोड्यांत स्थान मिळविले आहे. वर्षभरात तीन स्पर्धा जिंकल्या, तर दोन स्पर्धांत उपविजेतेपद मिळविले. यावर्षी जूनमध्ये नँटेस इंटरनॅशनल स्पर्धेत अश्विनी व तनिशा जोडीने एकत्रितपणे पहिले यश मिळविले.

नंतर अबुधाबी मास्टर्स या सुपर १०० गटात ही भारतीय जोडी विजेती ठरली. त्यानंतर सलग तीन स्पर्धांत अंतिम फेरी गाठून अश्विनी-तनिशा जोडीने लक्ष वेधले. लखनौमध्ये झालेल्या सैयद मोदी इंटरनॅशनल या सुपर ३०० स्पर्धेत त्यांना उपविजेतेपद मिळाले, तर गुवाहाटी मास्टर्स या सुपर १०० स्पर्धेत विजेतेपदाचा करंडक पटकावला.

ओडिशा मास्टर्स सुपर १०० स्पर्धेत मात्र त्यांना उपविजेतेपद मिळाले. वर्षाच्या सुरुवातीस या जोडीने इंडोनेशिया मास्टर्स या सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेत भाग घेतला. तेथे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली.

त्या कामगिरीने या जोडीचा आत्मविश्वासही उंचावला. फेब्रुवारीमध्ये असलेले खूप लांबचे जागतिक मानांकन आणि आता वर्षअखेरीस उंचावलेला आलेख पाहता, अश्विनीला तनिशाच्या रूपात महिला दुहेरीत चांगली जोडीदार सापडली आहे.

पॅरिस ऑलिंपिकचे लक्ष्य

पॅरिसमध्ये २०२४ सालची ऑलिंपिक स्पर्धा होत आहे.

जगातील या सर्वांत मोठ्या क्रीडा महोत्सवातील सहभागासाठी बॅडमिंटनमध्ये खेळाडूचे जागतिक मानांकन निर्णायक ठरणार आहे.

महिला दुहेरीत १६ जोड्यांना खेळण्याची संधी मिळेल. जागतिक बॅडमिंटनमधील चुरस लक्षात घेता, पात्रता सोपी नाही. अश्विनी-तनिशा यांनी पॅरिस ऑलिंपिक पात्रतेचे उद्दिष्ट बाळगले

आहे. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्टच आहे. ऑलिंपिक पात्रतेसाठी पुढील वर्षी ३० एप्रिलपर्यंतचे मानांकन ग्राह्य असेल.

सध्या अश्विनी-तनिशा जोडीसमोर जागतिक खेळाडूंबरोबर आणखी एका युवा भारतीय जोडीचे खडतर आव्हान आहे. महान बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपीचंद व ट्रिसा जॉली यांनी जागतिक महिला बॅडमिंटन दुहेरीत मोठी झेप घेतली आहे. सध्या ही जोडी जगात पहिल्या वीसमध्ये आहे.

गायत्री आणि ट्रिसा या दोघीही वीस वर्षांच्या आहेत आणि त्यांच्यात चांगला समन्वय आहे. सध्याची कामगिरी आणि मानांकन लक्षात घेता, गायत्री व ट्रिसा यांना पॅरिस ऑलिंपिकमधील बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्राधान्यक्रम असेल.

त्याचवेळी अश्विनी आणि तनिशा यांनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धांद्वारे गुण प्राप्त करून मानांकन उंचावण्यावर भर दिला आहे. अश्विनी यापूर्वी २०१२मधील लंडन व २०१६मधील रिओ ऑलिंपिकमध्ये खेळली आहे.

अगोदरच्या दोन्ही ऑलिंपिक स्पर्धांत अश्विनीला ज्वालाची साथ लाभली होती, परंतु त्यांना बाद फेरी गाठता आली नव्हती. आता तिसऱ्यांदा या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तिची मनीषा आहे आणि या वाटचालीत युवा दमाच्या तनिशाची साथ तिच्यासाठी मौल्यवान असेल.

ऑलिंपिक पात्रतेसाठी मानांकन राखताना त्यांच्यासाठी यापुढील प्रत्येक स्पर्धेतील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रगतिपथावरील तनिशा

तनिशा क्रास्टो ही मूळ गोमंतकीय. तिचे पालक गोव्यातील, पण व्यवसायानिमित्त दुबईत स्थायिक झाले. तनिशाने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये ज्युनियर गटात २०१६पर्यंत बाहरीनचे प्रतिनिधित्व केले. तिचे प्रारंभिक प्रशिक्षण दुबईत झालेले आहे.

संयुक्त अरब अमिरातीची ती नोंदणीकृत खेळाडू होती. २०१८ साली तिने मायभूमीची वाट धरली. गोव्यात जन्मलेल्या पालकांमुळे गोवा बॅडमिंटन संघटनेत नोंदणी करणे तिला शक्य झाले.

याद्वारे तनिशाला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दरवाजा उघडला गेला. दुबईत वास्तव्यास असली, तरी गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत तिची गुणवत्ता बहरली.

आंतरराष्ट्रीय ज्युनियर पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करताना यश प्राप्त केल्यानंतर तनिशाने सीनियर गटात आता पाय रोवायची सुरुवात केली आहे. ती महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील निष्णात खेळाडू आहे.

महिला दुहेरीतील नवी सहकारी अश्विनी पोन्नाप्पाने विश्वास दाखविल्यानंतर तनिशाची कामगिरी आणखीनच उंचावली आहे. ज्युनियर गटात असल्यापासून तनिशाचा भर दुहेरीवरच आहे. त्याचा फायदा तिला आता सीनियर गटात होत आहे.

ज्युनियर गटापासून ती मिश्र दुहेरीत ईशान भटनागर याच्यासमवेत खेळत आहे. या जोडीने गतवर्षी सैयद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत किताब जिंकला. आता तिने आणखी एक मिश्र दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे.

ध्रुव कपिला याच्या साथीत खेळताना तनिशाने कटक येथे झालेल्या ओडिशा मास्टर्स स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. अश्विनीच्या साथीत खेळताना तनिशाने पॅरिस ऑलिंपिक पात्रतेला प्राधान्य दिले आहे.

मिश्र दुहेरीतही तिने आवश्यक मानांकन गाठल्यास या गटातही तिला ऑलिंपिकची पात्रता मिळू शकेल, मात्र लक्ष्यप्राप्तीसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com