जागतिक फुटबॉलमध्ये पॉल पोग्बा हे नाव मोठे वलयांकित, पण असं काय घडलं ज्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली?

तो पुन्हा व्यावसायिक क्लब पातळीवर अथवा आंतरराष्ट्रीय मैदानावर फुटबॉल खेळू शकणार का? हा प्रश्न तीव्र स्वरात विचारला जात आहे..
paul pogba
paul pogbaEsakal

फुटबॉल कारकिर्दीत पोग्बाची गणना नेहमीच प्रमुख फुटबॉलपटूंत झाली. उत्तेजक द्रव्य अनावधानाने शरीरात गेले असले, तरी तो गुन्हाच मानला जातो.

वैयक्तिक फिजिओ आणि आहारतज्ज्ञ दिमतीस असूनही पोग्बाकडून चूक घडली. क्रीडा लवाद न्यायालयात आपले निर्दोषत्व पटविण्यासाठी पोग्बा व त्याच्या कायदाविषयक चमूला खूप प्रयत्न करावे लागतील, हे स्पष्टच आहे.

किशोर पेटकर

जागतिक फुटबॉलमध्ये पॉल पोग्बा हे नाव मोठे वलयांकित आहे. पॉल पोग्बा हा जगातील काही मोजक्या अतिश्रीमंत सफल फुटबॉलपटूंपैकी एक. पोग्बा हा फ्रान्सचा अनुभवी आणि हुकमी फुटबॉलपटू, पण तो २०२६मध्ये फ्रान्सतर्फे विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची शक्यता अंधूक वाटते आहे, कारण या तीस वर्षीय आक्रमक शैलीच्या मध्यरक्षकाची कारकीर्दच संकटात सापडली आहे. तो पुन्हा व्यावसायिक क्लब पातळीवर अथवा आंतरराष्ट्रीय मैदानावर फुटबॉल खेळू शकणार का? हा प्रश्न तीव्र स्वरात विचारला जात आहे.

याचे कारण म्हणजे, उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत ‘ब’ नमुन्यातही दोषी आढळल्यामुळे युव्हेंट्स संघातर्फे खेळणाऱ्या पोग्बावर इटलीच्या राष्ट्रीय उत्तेजकविरोधी न्यायाधिकरणाने (नाडो) चार वर्षांची बंदी लादली आहे.

त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन या बंदी असलेल्या द्रव्याचे अंश सापडले. पोग्बाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या माहितीतील एका डॉक्टरने अन्नपूरक सुचविले होते, त्यातून हे बंदी असलेले द्रव्य शरीरात गेले असावे.

परंतु इटलीच्या राष्ट्रीय उत्तेजकविरोधी न्यायाधिकरणाने हा दावा मान्य केला नाही आणि पोग्बाच्या बंदीवर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे तो २०२७मधील ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत स्पर्धात्मक फुटबॉल अजिबात खेळू शकणार नाही. पोग्बावरील बंदीच्या कालावधीतच विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने फ्रेंच संघाच्या जर्सीत पोग्बा खेळताना दिसणार नाही.

स्वित्झर्लंडस्थित क्रीडा लवाद न्यायालयात दाद मागणार असल्याचे पोग्बा याने बंदीनंतर नमूद केले. त्या न्यायालयात दिलासा मिळाल्यास कदाचित पोग्बाचे पुनरागमन लवकर होऊ शकते, परंतु त्याच्या थकलेल्या शरीराचा अंदाज घेता, आंतरराष्ट्रीय मैदानावर तो उच्च दर्जाचे फुटबॉल खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

सन २०१८मध्ये रशियात विश्वकरंडक स्पर्धा झाली. मॉस्कोत झालेल्या अंतिम लढतीत फ्रेंच संघाने जगज्जेतेपद पटकावताना क्रोएशियावर ४-२ फरकाने मात केली. त्यावेळी उत्तरार्धातील एक गोल पोग्बाने केला होता. या यशानंतर फ्रान्सच्या या प्रतिभाशाली फुटबॉलपटूला दुखापतींनी ग्रासले.

पोग्बाच्या कारकिर्दीत अडथळे आले आणि याच कालावधीत फ्रेंच संघातील त्याचा सहकारी किलियन एम्बापेनेही मोठी मुसंडी मारली. दुखापतीमुळे पोग्बा २०२२मधील विश्वकरंडक खेळू शकला नाही. व्यावसायिक क्लब पातळीवर युव्हेंट्स क्लबतर्फे तो फारच क्वचित खेळला. दुखापतीतून सावरत त्याने २० ऑगस्ट २०२३ रोजी पुनरागमन केले.

इटलीतील सेरी ए फुटबॉल मोसमातील उदिनेज संघाविरुद्धच्या लढतीनंतर तो डोपिंगमध्ये दोषी आढळला. त्या तारखेपासून या महागड्या फुटबॉलपटूवर तात्पुरते निलंबन लादण्यात आले होते; आता ‘ब’ नमुन्यातही दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर बंदी लादली गेली आहे.

पोग्बाला सतत त्रास देणारा गुडघा, वारंवार आखडणारे स्नायू यांचा विचार करताना आणखी चार वर्षांनी वयाच्या ३४व्या वर्षी फुटबॉल मैदानावर पुनरागमन करणे त्याच्यासाठी खूपच आव्हानात्मक असेल.

जगप्रसिद्ध फुटबॉलपटूला धक्का

पॉल पोग्बाने अल्पावधीत मोठे वैभव अनुभवले. व्यावसायिक क्लब पातळीवर विक्रमी रकमेत त्याला करारबद्ध करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर युनायटेड व इटलीतील युव्हेंट्स क्लबमध्ये नेहमीच चुरस राहिली.

कारकिर्दीची सुरुवात मँचेस्टर युनायटेडकडून झाल्यानंतर हा फ्रेंच फुटबॉलपटू २०१२ ते २०१६ या कालावधीत युव्हेंट्सतर्फे खेळला, नंतर तो पुन्हा इंग्लंडमध्ये आला आणि मँचेस्टर युनायटेडचे २०१६ ते २०२२ या कालावधीत प्रतिनिधित्व केले.

दुखापतीमुळे ओल्ड ट्रॅफर्डवरील त्याची इनिंग विशेष उल्लेखनीय ठरली नाही. तो पुन्हा इटलीतील तुरिन शहरात आला, परंतु आता तो ‘लंगडा घोडा’ बनला होता. २०२२ ते २०२३ या कालावधीत तो युव्हेंट्सतर्फे २१३ मिनिटेच मैदानावर खेळला. तंदुरुस्तीच्या अभावामुळे त्याच्या प्रेक्षणीय खेळावर मर्यादा आल्या.

दोन मोसमात युव्हेंट्सचे मार्गदर्शक मस्सीमिलियानो अल्लेग्री यांनी पोग्बाचा वापर बदली खेळाडूच्या रूपात जास्त केला. डोपिंगप्रकरणी बंदी आल्यामुळे युव्हेंट्स क्लबने या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूचा करार अकाली संपुष्टात आणल्याची वार्ता असली, तरी त्यास दुजोरा कोणीही दिलेला नाही.

पोग्बा व युव्हेंट्स यांच्यातील करार २०२६पर्यंत आहे. पोग्बावरील चार वर्षांच्या बंदीची घोषणा झाल्यानंतर, फुटबॉलक्षेत्र एका असामान्य खेळाडूला गमावत आहे, अशी प्रतिक्रिया युव्हेंट्सचे मार्गदर्शक अल्लेग्री यांनी दिली. खरे म्हणजे, पोग्बावरील बंदी युव्हेंट्ससाठी जास्त धक्कादायक आहे.

किलियन एम्बाप्पेमुळे फ्रेंच फुटबॉल संघ पोग्बाच्या अनुपस्थितीत खेळण्यास सरावला. युव्हेंट्सने मोठ्या अपेक्षा बाळगून त्याला दोन वर्षांपूर्वी करारबद्ध केले होते, परंतु दोन मोसमात शरीर साथ देत नसल्याने पोग्बा मोजकेच सामने खेळू शकला. यामुळे युव्हेंट्स संघ बांधणीत अल्लेग्री यांना नियोजन व व्यूहरचना यात बदल करावा लागला.

बंदी असलेल्या खेळाडूवर संघ विनाकारण खर्च करण्याची शक्यता खूपच कमी आहे. क्रीडा लवाद न्यायालयानेही पोग्बाचे अपिल फेटाळल्यास युव्हेंट्सला करार रद्द करण्यावाचून गत्यंतर नसेल. तसे झाल्यास पोग्बाचे व्यावसायिक फुटबॉल निश्चितच कोसळणार. वय वाढले म्हणून नव्हे, तर तंदुरुस्तीच्या कारणास्तव तो निवृत्तही होऊ शकतो.

जादा वयाचे, परंतु जबरदस्त तंदुरुस्ती राखलेले कितीतरी खेळाडू अजूनही स्टेडियमवर गर्दी खेचत आहेत. अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी ३६ वर्षांचा आहे. मेस्सी, तसेच पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ३९व्या वर्षीही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सुपरस्टार आहेत.

पोर्तुगीज फुटबॉलपटू पेपे वयाच्या ४१व्या वर्षी राष्ट्रीय, तसेच क्लब पातळीवर पोर्तो संघाचा आधारस्तंभ आहे. भारताचा सुनील छेत्रीही ३९ वर्षांचा आहे आणि तोच देशाचा हुकमी आघाडीपटू आहे. या साऱ्या वय वाढलेल्या फुटबॉलपटूंना त्यांचे शरीर सकारात्मक साथ देत आहे, त्यामुळे त्यांची व्यावसायिक कारकीर्दही लांबली.

तुलनेत पोग्बाचे शरीर रुसलेले आहे. बंदीच्या कालखंडात शरीराचा रुसवा दूर करण्यात यश आले, तर कदाचित पोग्बा नव्या दमाने फुटबॉल मैदानावर उतरू शकतो. त्यासाठी दृढनिश्चय आणि प्रबळ इच्छाशक्ती गरजेची ठरेल.

paul pogba
Sleep Disorder : तो चक्क १८-१८ तास सलग झोपतो.. झोपेचेही असतात का आगळेवेगळे आजार? जाणून घ्या

पोग्बाची झळाळती कारकीर्द

पोग्बाने लहान वयात मोठी कीर्ती प्राप्त केली. आर्थिक आघाडीवरही तो सफल ठरला. लक्झरी जीवनशैलीत तो सुखावला. त्याला फुटबॉल गुणवत्तेची दैवी देणगी लाभली आहे. त्यामुळेच त्याची कारकीर्द झळाळली. २०१३मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने २० वर्षांखालील विश्वकरंडक जिंकला.

२०१४ सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत पोग्बा सर्वोत्तम युवा फुटबॉलपटू ठरला. २०१८ साली फ्रान्सच्या विश्वविजेत्या मोहिमेत त्याने मौल्यवान योगदान दिले. वयाच्या २३ वर्षी पोग्बाने सर्वप्रकारच्या फुटबॉलमध्ये सात करंडक जिंकले होते. कारकिर्दीत त्याने युव्हेंट्सतर्फे चार वेळा सेरी ए विजेतेपद पटकावले.

पोग्बा महान फुटबॉलपटूंच्या रांगेत असताना कारकिर्दीच्या उत्तरार्धाला उतरती कळा लागली. २०१३ ते २०२२ या कालावधीत तो फ्रान्सच्या राष्ट्रीय संघातर्फे ९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळला, पण मागील दोन वर्षांत दिदिएर देशाँ यांच्या मार्गदर्शनाखालील संघात तो स्थान मिळवू शकला नाही.

फुटबॉल कारकिर्दीत पोग्बाला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठीचा बॅलोन डी ओर किताब जिंकता आला नाही, परंतु प्रमुख फुटबॉलपटूंत त्याची नेहमीच गणना झाली. उत्तेजक द्रव्य अनावधानाने शरीरात गेले असले, तरी तो गुन्हाच मानला जातो.

वैयक्तिक फिजिओ आणि आहारतज्ज्ञ दिमतीस असूनही पोग्बाकडून चूक घडली. क्रीडा लवाद न्यायालयात आपले निर्दोषत्व पटविण्यासाठी पोग्बा व त्याच्या कायदाविषयक चमूला खूप प्रयत्न करावे लागतील, हे स्पष्टच आहे.

मैदानावर हमखास प्रेक्षणीय गोल करणाऱ्या या सराईत फुटबॉलपटूस कायद्याची लढाई जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील आणि निर्दोष ठरण्यासाठी ठोस पुराव्यांचीही आवश्यकता भासेल.

--------------------

paul pogba
Women's Cricket: भविष्यात भारतीय महिला विश्वकरंडकासह जल्लोष करताना दिसतील..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com