Sleep Disorder : तो चक्क १८-१८ तास सलग झोपतो.. झोपेचेही असतात का आगळेवेगळे आजार? जाणून घ्या

सध्या जागतिक झोप जागरूकता सप्ताह सुरु आहे, त्यानिमित्ताने झोप हा किती अंगाने महत्वाचा घटक आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न..!
sleep disorder
sleep disorder Esakal

मुंबई: "मी चक्क दिवसभर झोपायचो, एकदा डोळा लागला की जागच यायची नाही. यापायी ऑफिसला दांडी मारावी लागली. मित्र माझी चेष्टा करायचे तर ऑफिसमध्ये माझ्यावरुन गॉसिप्स व्हायचे.

मला लाज वाटायची. माझ्यामुळे इतर सहकाऱ्यांना जास्त वेळ काम करायला लागायचे आणि शेवटी मला नोकरी सोडावी लागली".... पुण्यात राहणारा सुमित (नाव बदललेले) त्याची व्यथा मांडत होता.

रामायणात कुंभकर्ण नावाचं पात्रही असंच होते. पण अनेकदा हा विषय हसणे किंवा चेष्टा करणे या पलीकडे गेलाच नाही. पण हसून सोडून द्यावं इतकं साधं सोपं नाही हे.

पुण्यातील सुमितने त्याच्या आजाराविषयी पुढे सांगतो, झोप येत ही देखील समस्या आहे पण या समस्येला जशी समाजमान्यता आहे, तशी १८ ते २० तास मरणासन्न अवस्थेत झोप लागू शकते या गोष्टीला समाजमान्यता नाही.

मी चेष्टेचा विषय होतो. पण आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली माझ्यावर उपचार सुरूयेत" खूप कमी वेळात खूप गाढ झोप लागणे. तसेच जेव्हा झोपेतून उठायची वेळ येते तेव्हा तुमचे शरीर काही वेळासाठी हलतच नाही. सुमितची अवस्था अशीच काहीशी व्हायची. पण या आजाराला नेमके काय म्हणतात?

sleep disorder
Sleep and Mood: रात्री झोप होत नाही, दुसऱ्या दिवशी चिडचिड होते, या चक्रातून सुटका कशी करावी?

नार्कोलेप्सी म्हणजे काय?

भारतात नार्कोलेप्सी ( Narcolepsy) या आजाराचा पहिला पेशंट हा २००८ साली सापडल्याची नोंद आहे. यावर परदेशात ज्या प्रमाणात संशोधन झालं आहे त्या प्रमाणात भारतात झालेलं नाही.

नारकोलॅप्सी हा एक मेंदूशी संबंधी आजार आहे. मेंदूतील ओरॅक्सिन नावाच्या रसायनाच्या कमतरतेमुळे हा विकार होतो. ज्यामध्ये रुग्णाला १० तासांपासून ते २४ तास सलग झोप लागते.

झोपेत असताना त्यांच्या शरीरातील वायू कमकुवत होतात, त्यांना त्या अवस्थेतून बाहेर पडायला वेळ लागू शकतो.

तसेच मानसिक हेलकावे जास्त झाले जसे की खूप जोरात हसू आले तर त्यांचे गुडघे लॉक होतात. काही काळासाठी गुडघे आखडले जातात.

अशा केसेस या तरुण वयातच अधिक दिसून येतात. मात्र अशा व्यक्तींना छोट्या काळासाठी झोप घेतली की बरं वाटतं.

यावर औषधे आहेत मात्र हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण थेरीपी घेऊन हा तुमचे झोपेचे चक्र नियमित करण्याचा प्रयत्न केला जातो

झोपेच्या आजारांचे कारण काय?

झोपेचे इतक्या गंभीर स्वरूपातील आजार असतात हे अनेकांना माहिती देखील नसेल. मुख्य म्हणजे ऐन तारुण्यात अनेकांना याचा सामना करावा लागतो.

याबाबत पुण्यातील केईएम हॉस्पिटलच्या झोप तज्ज्ञ डॉ.स्मिता धाडगे म्हणाल्या, झोपेचे ज्या कॉमन समस्या असतात त्या बऱ्यापैकी मानसिक स्वास्थ्याशी संबंधित असतात. या झोपेच्या चुकीच्या सवयीतून किंवा स्ट्रेस मधून आलेल्या असतात.

यातूनही झोपेचे आजार निर्माण होतात, त्यासोबतच झोपेचे काही आजार हे मेंदूतील केमिकलमुळे, काही श्वसनामुळे, काही मानसिक आरोग्य खराब झाल्याने तर काही अनुवांशिक देखील असतात.

१) घोरणे हा देखील श्वसनाशी निगडित झोपेचा आजार

या पहिल्या प्रकारात ऑप्स्ट्रक्टिव्ह स्लीप अप्निया, सेंट्रल स्लीप अप्निया असे प्रकार येतात. ज्यामध्ये समस्या या तुमच्या श्वसनाशी संबंधित असतात यामध्ये घोरणे हा प्रकार येतो.

माझ्याकडे अनेक पेशंट जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात, आम्हाला घोरण्याची खूप सवय आहे, कुठेही बसलो तरी आम्हाला झोप लागते आणि आम्ही घोरायला सुरुवात करतो. तर हे फक्त अपुऱ्या झोपेचे लक्षण नाही तर स्लीप अप्निया किंवा स्लीप डिसऑर्डर ब्रीथिंग म्हणजे घोरण्याच्या आजारांशी निगडित त्रास असतो.

रात्रीतून तुमचा श्वासोच्छवास नीट होत असूनही गळ्याच्या बाजूला श्वसनमार्गात तात्पुरते अडथळे येतात. जर तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा टॉन्सिल किंवा जबडा आणि पडजीभ यांची संरचना वेगळी असते अशा वेळी ऑक्सिजन लेव्हल कमी होते. थोड्या वेळाने मेंदूला सिग्नल जाऊन यंत्रणा पुन्हा कामाला लागते आणि मग ते नॉर्मल होतं आणि असं झोपेत वारंवार होत राहतं.

यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि मग त्यांना दिवसा झोप येते. काही काही जणांना ड्रायव्हिंग करताना, ऑफिसमध्ये तर काही जण सांगतात की सिग्नलला थांबलो तरी झोप येते. यासाठी तुमचं झोपेचं गणित नेमकं कोणत्या कारणामुळे बिघडलं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे.

अशा व्यक्ती आमच्याकडे आल्या की आम्ही त्यांचे स्लीप स्टडी करतो. रात्री पेशन्ट झोपलेला असताना त्याच्या महत्वाच्या गोष्टी जसे की श्वसनाची गती, घोरणं अभ्यासून स्लीप अप्नियाचे निदान केले जाते. त्यातही त्याचे प्रमाण किती आहे त्यानुसार उपाय सुचविले जातात. तसेच जीवनशैलीतील बदल जसे की वजन कमी करणे, झोपेच्या वेळा, झोपताना चहा, कॉफी सारखे पदार्थ न घेणे, मद्यपान, धूम्रपान वर्ज करणे याविषयीचे मार्गदर्शन करतो. पण हा स्लीप अप्निया जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टर यासाठी 'सीपॅप' मशीनचा वापर करून रुग्णावर उपचार करतात.

२) तीन महिन्यापेक्षा जास्त जर झोप लागत नसेल तर...

निद्रानाश (insomnia) यातही दोन प्रकार येतात. तात्पुरता किंवा दीर्घकालीन किंवा क्रोनिक. जेव्हा एखाद्या कामाच्या ताणामुळे झोप लागत नाही किंवा जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय किंवा काही अन्य कारण आहे अशा स्थितीत हा तात्पुरता निद्रानाश होऊ शकतो. पण काही काळानंतर मात्र तुमची झोप नॉर्मल होते.

पण जर हा निद्रानाश तीन महिन्यांपेक्षा जास्त राहिला तर मात्र तो दीर्घकालीन निद्रानाश प्रकारात मोडतो. त्यामध्ये व्यक्तीला झोप लागायला त्रास होतो तसेच मध्येच जाग येऊन झोपमोड होते आणि परत झोप लागत नाही.

३) छातीत धडधडणे, भीतीदायक स्वप्न पडणे असे तुमच्या बाबतीतही होते का?

हे प्रकार पॅरासोम्निया (Parasomnia) या आजारात दिसून येतात. ज्या हालचाली झोपेच्या सुरुवातीला, झोपेमध्ये किंवा झोपेतून उठताना ज्या अनैसर्गिक गोष्टी होतात त्या गोष्टी पॅरासोम्नियामध्ये येतात. यामध्ये देखील दोन प्रकार येतात. नॉन रेम हालचाली आणि रेम हालचाली.

'नॉन रेम' मध्ये यामध्ये मध्येच जाग येणे, दचकून जागे होणे, रात्रीच्या वेळी किंवा झोपेत चक्क जागे असल्याप्रमाणे चालते, झोपेत बोलते, हालचाली करते, उठून बसते. डॉ.स्मिता धाडगे म्हणाल्या, यांच्यातील गंभीर प्रकारात अनेकदा काही झोपेत खातात देखील तर काही जण हिंसक होत भिंतीवर डोके आपटून घेतात.

रेम हालचालींमध्ये ज्यामध्ये झोप न लागणे, छातीत धडधडणे, भीतीदायक स्वप्न पडणे, कुठूनतरी पडतोय असे वाटणे असे मानसिक स्वास्थ्याशी संबंधित अनेक प्रकार येतात. तसेच स्लीप पॅरालिसिस म्हणजे अंग आखडणे हे प्रकार येतात.

अनेकदा हे मेंदूतील रसाययामुळे होत असतात. तर काहींमध्ये हार्मोनमुळे आणि काहींमध्ये हे जनुकीय बदलांमुळे होतात. हा प्रकार अनेकदा अनुवांशिक देखील असतो. यांच्यावर तीन प्रकाराने उपचार करता येतात, ड्रग थेरपी म्हणजेच औषोधोपचार, 'कॉग्नेटिव्ह बेहेविअरल थेरपी' आणि 'स्लीप हायजिन'.

झोपेच्या या आजारात आणखीही प्रकार येतात.. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीतूनच ते समोर येतात. झोप हा सर्वांच्याच आयुष्यातला महत्वाचा घटक असला तरीही आपण त्याला तितकेसे महत्व देत नाही हे खरे... सध्या जागतिक झोप जागरूकता सप्ताह सुरु आहे, त्यानिमित्ताने झोप हा किती अंगाने महत्वाचा घटक आहे हे सांगण्याचा आमचा छोटासा प्रयत्न..!

---------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com