सोपान पितृभक्त
सूक्ष्मतेच्या अद्भुत विश्वात आपल्या डोळ्यांसमोर कल्पनेपलीकडचे चमत्कार उभे राहतात. कधी तांदळाच्या एका कणीवर साकारलेला गणराया दिसतो; कधी एखाद्या मोहरीच्या दाण्यावर कोरलेला बाप्पा पाहण्यात आपण दंग होतो. पण शुद्ध सोन्यात घडविलेला सूक्ष्म गणपती हा मात्र फारच दुर्मीळ आहे. अशा या विलक्षण आणि देखण्या कलाकृतीचा अनुभव यंदा पुण्यात गणेशोत्सवात घेता येणार आहे. या अद्वितीय गणपतींमागील कौशल्य, संयम आणि कलानिष्ठा पाहणाऱ्या प्रत्येकाला आश्चर्यचकित करते. सूक्ष्मातून प्रकट होणाऱ्या गणपती बाप्पाची ही गोष्ट...
सूक्ष्मातून ज्ञान मिळविणे ही मानवासाठी फक्त वैज्ञानिक प्रगतीची अमूल्य देणगी आहे. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या परंतु आपल्या जगण्यावर खोलवर परिणाम करणाऱ्या गोष्टींचा शोध घेण्याचे कुतूहल मानवाला अनादी काळापासून आहे. सूक्ष्म गोष्टींमध्ये अनोखे सौंदर्य दडलेले असते. त्या सौंदर्याचे मानवाला नेहमीच आकर्षण असते. ते सौंदर्य मोहक असते. नुसत्या डोळ्यांना न दिसणारे असे सूक्ष्म सौंदर्य आपल्याला निरीक्षण करायला शिकवते. त्यातून आपला संयम वाढतो. त्या सूक्ष्म वस्तूंमुळे नेमकेपणाने आणि लक्षपूर्वक पाहण्याची सवय आपल्याला लागते.
एखाद्या पानाच्या शिरांमधील नाजूक रचना असो, थेंबातील अपार विश्व असो किंवा सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारा कोशिकांचा अद््भुत खेळ असो, यातली प्रत्येक गोष्ट आपल्याला केवळ माहितीच देत नाही, तर जीवन आणि निसर्गाकडे पाहण्याचा नवा समृद्ध दृष्टिकोनही देत असते. या सूक्ष्मतेमधील विश्वात तुम्ही कधी तांदळाच्या एका कणीवर साकारलेला गणराया संग्रहालयात पाहिला असेल, कधी मोहरीवरील गणपतीही बघण्यात आला असेल. पण, शुद्ध सोन्यात साकारलेला सूक्ष्म गणपती दुर्मीळ आहे. तो यंदा पुण्यात गणेशोत्सवात पाहता येणार आहे.