

Rabindranath Tagore Bengal legacy
esakal
‘आमार सोनार बांगला’ या कवितेबद्दलचा मुद्दा मांडण्यामागे आधारभूत आहे, ती खुद्द रवींद्रनाथांनीच स्वातंत्र्यस्वर्गाबद्दलची कल्पना स्पष्ट करण्यासाठी लिहिलेल्या प्रार्थनागीतात भारतासाठीची मागणी आहे, केवळ वंगभूमीबद्दलची नाही. ‘Where the mind is without fear and the head is held high’ हे मूळ बंगाली कवितेचे खुद्द रवींद्रनाथांनीच केलेले इंग्रजी भाषांतर शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे सर्वपरिचित आहे, तरीही त्याबाबतचा एक किरकोळ वाटणारा, पण महत्त्वाचा फरक आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे.
रवींद्रनाथ टागोरांचे नाव उच्चारले, की माझ्या मनात त्यांच्या भावसमृद्ध जीवनाचे असंख्य पैलू समोर येतात. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने गं. दे. खानोलकरांनी लिहिलेल्या रवींद्रनाथ जीवनकथा या वैशिष्ट्यपूर्ण चरित्रग्रंथामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जी मोहिनी सुमारे साठ वर्षांपूर्वी माझ्या मनावर पडली, ती गांधीवादी साहित्यिक काका कालेलकर यांच्या आस्वादक परिचयग्रंथामुळे अनेक पटींनी वाढली. रवींद्रवीणा, रवींद्रमनन, रवींद्रझंकार व नैवेद्य या चार पुस्तकांमधून काकासाहेबांनी गुरुदेवांच्या असंख्य कवितांचा भावानुवाद तर सादर केला होताच, पण त्या कवितांमध्ये सामावलेल्या औपनिषदिक तत्त्वज्ञानाचे सौंदर्यसुद्धा उलगडून दाखवले होते. कुठल्याही अभिनिवेशाच्या आहारी न जाता शुचिर्भूत भारतीयत्वाचे दर्शन घडविणारी त्यांची विविधांगी प्रतिभा व तिचे नाटकांपासून चित्रांपर्यंत आणि निबंधांपासून प्रवासवर्णनांपर्यंत कमी-अधिक प्रकाशझोतामध्ये आलेले आविष्कार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अजूनही आठवत असतात.