corn recipes
corn recipesesakal

सर्वात मका : मक्यापासून 11 चटकदार पदार्थ

मक्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज

सुप्रिया खासनीस

करंज्या

साहित्य

तीन वाट्या मक्याचे दाणे, अर्धा वाटी मुगाची डाळ, ७-८ हिरव्या मिरच्या, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी ओले किंवा सुके खोबरे, थोडा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर, फोडणीचे साहित्य, तेल, पारीसाठी २ वाट्या मैदा.

कृती

प्रथम तेलाचे मोहन घालून मैदा पाण्याने घट्ट भिजवून ठेवावा. मक्याचे दाणे, भिजलेली डाळ, मिरच्या यांचे मिक्सरमधून दाटसर मिश्रण करून घ्यावे. नंतर तेलात हळद, मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. त्यामध्ये वरील मिश्रण घालावे. चांगले परतून घ्यावे. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. मिश्रण चांगले हलवावे. चवीनुसार मीठ, साखर घालून एकसारखे करावे व कोरडे होऊ द्यावे. सारण गार झाल्यावर त्यात खोबरे, कोथिंबीर, लिंबाचा रस घालावा. सारण एकसारखे करावे. नेहमीप्रमाणे भिजवलेल्या मैद्याच्या पारी लाटून त्यात सारण भरून करंज्या करून तळाव्यात.

कोफ्ता करी

साहित्य

मक्याची ४ मोठी कणसे, १०० ग्रॅम बेसन, २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धी वाटी दही, चिमूटभर खायचा सोडा, अर्धा चमचा मिरे पूड, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा तिखट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, तेल.

ग्रेव्हीसाठी

एक मोठा कांदा, २ मोठे टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या, १ इंच आले, तिखट, हळद, मीठ.

कृती

मक्याची कणसे किसून घ्यावीत. नंतर तो कीस कुकरमध्ये शिजवून घ्यावा. बटाटे उकडून सोलून घ्यावेत. नंतर मक्याचा कीस, बटाटे यासह साहित्यातील इतर सर्व वस्तू एकत्र एकजीव कराव्यात. तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून ते तळून बाजूला ठेवावेत. ग्रेव्हीसाठी जरा जास्त तेलावर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात वाटलेले आले, लसूण, घालून चांगले परतावे. परतल्यावर हळद, तिखट, मसाला घालून परतावे. थोडासा पाण्याचा शिपका मारावा. नंतर त्यात अगदी बारीक चिरलेले टोमॅटो व चवीनुसार मीठ घालावे. थोडे परतावे. बेताचे पाणी घालून रस्सा दाटसर वाटला की थोडे उकळावे. मग तळलेले कोफ्ते घालून कढई लगेच खाली उतरवावी. कोफ्ते घातल्यावर पुन्हा उकळू नये. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

स्वीट कॉर्न सूप

साहित्य

दोन मोठ्या वाट्या स्वीट कॉर्न दाणे, अर्धी वाटी मटार दाणे, १ मध्यम आकाराची बारीक चिरलेली सिमला मिरची, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, २ चमचे बटर, गरजेनुसार पाणी.

कृती

स्वीट कॉर्नचे दाणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत व उरलेले बारीक कापून घ्यावेत. कढईत बटर घालून ते गरम झाल्यावर त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट घालून थोडे परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे. परतल्यावर मटार दाणे, सिमला मिरची घालून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे व पाणी घालून शिजवून घ्यावे. कॉर्नफ्लोअर पाण्यात कालवून चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर कढईत ते थोडे थोडे घालून ढवळून घ्यावे. पीठ शिजल्यावर चवीला मिरपूड घालावी. सूप चांगले दाट झाल्यावर गॅस बंद करावा.

भाजी

साहित्य

मक्याची ३-४ कोवळी कणसे, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर, पाव वाटी ओले खोबरे, पाव वाटी दाण्याचे कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर गरजेनुसार, थोडा कढीपत्ता, तेल व फोडणीचे साहित्य.

कृती

कणसाचे दाणे काढून घ्यावेत. नंतर दाणे व हिरव्या मिरच्या मिक्सरमधून भरडसर काढाव्यात. फार बारीक करू नये. नंतर तेलात, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात वाटलेले कणीस घालून परतून घ्यावे. बेताचे पाणी घालून चवीनुसार मीठ, साखर घालून चांगली वाफ आणावी. शेवटी दाण्याचे कूट घालून हलवावे. वाढताना खोबरे, कोथिंबीर घालावी.

भजी

साहित्य

दोन वाट्या मक्याचे दाणे, ७-८ हिरव्या मिरच्या, हळद, जिरे, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ ते दीड वाटी डाळीचे पीठ.

कृती

मक्याचे दाणे कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. मिक्सरमध्ये मिरच्यांसह भरडसर काढावेत. त्यामध्ये हिंग, हळद, जिरे, कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून पीठ तयार करावे. पाण्याचा वापर कमी करावा. आयत्यावेळी भजी तळावीत. गरम गरम छान लागतात.

उपमा

साहित्य

मक्याची ४ कणसे, १ मोठा कांदा, अर्धी वाटी ओले खोबरे, कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, साखर, अर्ध्या लिंबाचा रस, फोडणीचे साहित्य, अर्धी वाटी भाजून सोललेले दाणे, कढीपत्ता, तेल.

कृती

मक्याचे दाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. वाटताना पाणी घालू नये. कांदा बारीक चिरून घ्यावा. नंतर तेलात मोहरी, हिंग, हळद कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून त्यात कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. कांदा परतल्यावर त्यात भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार मीठ, साखर घालून चांगले परतावे. नंतर वाटलेला बारीक मका घालून परतून घ्यावे. परतताना त्यावर थोडा पाण्याचा शिपका मारावा. चांगली वाफ आणावी. परत एकदा लिंबाचा रस घालून झाकण ठेवून वाफ आणावी. उपमा तयार झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. खायला देताना ओले खोबरे घालावे. हा उपमा चविष्ट होतो व पटकन होतो.

चीज कॉर्न बॉल

साहित्य

दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे, २ उकडलेले बटाटे, कोथिंबीर, ६-७ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, ब्रेड क्रम्ब व चीज गरजेनुसार, तेल, २ लसूण पाकळ्या (ऐच्छिक).

कृती

उकडलेले मक्याचे दाणे अर्धवट ठेचून घ्यावेत. त्यात बटाटे कुस्करून कोथिंबीर, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ व अगदी थोडे ब्रेड क्रम्ब घालून मिश्रण एकसारखे करावे. चीजचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. नंतर मिश्रणाचे छोटे गोळे करावेत. गोळे करताना त्यात एक चीजचा तुकडा घालावा व त्याला बॉलचा आकार द्यावा‌. बॉल ब्रेड क्रम्बमध्ये चांगले घोळवावेत. तेलात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत व सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

चटपटे कॉर्न

साहित्य

तीन-चार वाट्या उकडलेले मक्याचे दाणे, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडा चाट मसाला, चवीनुसार मीठ व साखर, लिंबाचा रस (ऐच्छिक), शेव.

कृती

एका भांड्यात उकडलेले मक्याचे दाणे घ्यावेत. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, कोथिंबीर ,चवीनुसार मीठ व साखर, हवा असल्यास लिंबाचा रस घालून एकसारखे करावे. खायला देताना वरून बारीक शेव घालावी.

चटणी

साहित्य

एक वाटी मक्याचे दाणे, ४-६ हिरव्या मिरच्या, ३-४ पुदिन्याची पाने, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू, चवीनुसार मीठ, साखर, फोडणी साहित्य, तेल.

कृती

मक्याचे दाणे कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर त्यात मीठ, साखर, पुदिना, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून बारीक वाटावे. मिश्रण भांड्यात काढून घ्यावे. हवे असल्यास थोडे पाणी घालावे. नंतर तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यावर घालावी.

कॉर्न पॅटीस

साहित्य

दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे, ३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, २ ब्रेडचे स्लाइस, १ टीस्पून किसलेले आले, ४-६ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, चिरलेली कोथिंबीर, २-३ चमचे मैदा, चवीनुसार मीठ, तेल, आवश्यकतेनुसार ब्रेड क्रम्ब.

कृती

बटाटे सोलून कुस्करून घ्यावेत. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून बटाट्यात घालावेत. दीड वाटी मक्याचे दाणे मिक्सरमधून भरडसर काढून घ्यावे व उरलेले दाणे बटाट्याच्या मिश्रणात घालावेत. या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, आले-मिरची पेस्ट, कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून एकसारखे करावे. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे पॅटीस करावेत. मैदा आणि पाणी यांचे मध्यमसर मिश्रण करावे. त्यात पॅटीस दोन्ही बाजूंनी बुडवून लगेच बाहेर काढावे. पसरलेल्या ब्रेड क्रम्बवर पूर्ण घोळवून ठेवावे. एकावर एक रचू नये. नंतर तळावेत किंवा शॅलो फ्राय करावेत. पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे.

दही पकोडे

साहित्य

मक्याची ३-४ कणसे, दीड वाटी बेसन, ५-६ हिरव्या मिरच्या, हळद, चवीनुसार तिखट, मीठ, आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, ४-५ पाने पुदिना, आवश्यक तेवढे दही, साखर, तेल.

कृती

कणसे किसून त्यात पुदिना, हिरव्या मिरच्या, आले वाटून घालावे. चवीनुसार मीठ घालावे व बेसन घालून भज्याप्रमाणे भिजवावे. मध्यम आकाराचे पकोडे करून तळून घ्यावेत. दहीवड्याप्रमाणे बिना पाण्याचे दही घोटून घ्यावे. चवीनुसार साखर व थोडे मीठ घालून एकसारखे करावे. खायला देताना डिशमध्ये पकोडे घालून वर घोटलेले दही व चिरलेली कोथिंबीर घालावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com