Premium: Interview: 'एनएसडी' मध्येही मी अनेक चुकीच्या गोष्टी शिकले, पण..; अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांची रोखठोक मुलाखत

Ratna Pathak Shaha: रंगभूमी, चित्रपटापासून ते दूरचित्रवाणीपर्यंतच्या अभिनयाला केवळ भूमिका साकारण्याचं माध्यम न मानता तो सततचा शोध, एक तालीम मानणाऱ्या उत्तम कलावंत म्हणजे रत्ना पाठक-शहा..
Ratna Pathak Shah Interview

Ratna Pathak Shah Interview

Esakal

Updated on

महिमा ठोंबरे

रंगभूमी, चित्रपटापासून ते दूरचित्रवाणीपर्यंतच्या अभिनयाला केवळ भूमिका साकारण्याचं माध्यम न मानता तो सततचा शोध, एक तालीम मानणाऱ्या उत्तम कलावंत म्हणजे रत्ना पाठक-शहा. नाटकाला वर्षानुवर्षं नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची तळमळ आणि आजच्या बिंज वॉच, रोस्टिंग संस्कृतीवरचं त्यांचं रोखठोक भाष्य, या सगळ्यांतून त्यांचा कलाविषयक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो. मराठी रंगभूमीबद्दलचा आदर, भाषेची जाण आणि प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर ठेवलेला विश्वास अधोरेखित करणारी ही मुलाखत...

Q

अभिनयाचा, कलेचा वारसा तुम्हाला कुटुंबातून मिळाला. पुढे तुम्ही अभिनयाचं रीतसर प्रशिक्षणही घेतलं. पण तुमची कामाची पद्धत कशी तयार झाली? तुमच्या कामावर कोणाचा प्रभाव आहे?

A

रत्ना पाठक-शहा : माझ्या कामावर दोन व्यक्तींचा खूप प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे सत्यदेव दुबे आणि दुसरे नसीरुद्दीन शहा. या दोन व्यक्तींसोबत मी रंगभूमीवर सर्वाधिक काम केलं आहे. या दोघांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांची कामाची शिस्त याचा प्रभाव माझ्यावर पडला. सतत सर्वोत्तमाचा ध्यास घेण्याची त्यांची पद्धत माझ्यातही रुजली. प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार, सातत्याने तालीम करणं, तालमीत प्रत्येक वेळी नव्या गोष्टींचा शोध घेणं, नाटक अजून चांगलं होण्यासाठी सतत विचार करणं, या महत्त्वाच्या गोष्टी मी या दोघांकडून शिकले. पण कामाची ही शिस्त मला अन्यत्र अभावाने आढळते.

अनेकजण तालमीकडे केवळ नाटक उभं करण्याची प्रक्रिया म्हणून बघतात. एकदा नाटक उभं राहिल्यावर पुन्हा पुन्हा तसंच सादर करायचं, असा त्यांचा समज होतो. त्यामुळे ही प्रक्रिया त्यांच्यासाठी कंटाळवाणी होते. पण आम्ही, विशेषतः आमचा ‘मॉटले’ हा नाटकाचा समूह अशा पद्धतीने काम करत नाही. नसीरुद्दीन शहा यांचा नाटकाकडे, तालमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हा सर्वांमध्येही उतरला आहे. केवळ नटच नाही; तर आमचे बॅकस्टेज कलाकारही याच पद्धतीने काम करतात. आम्हाला सगळ्यांनाच तालीम करायला आवडते, त्यात आम्ही नवनव्या गोष्टींचा शोध घेतो आणि त्यामुळेच आम्हाला नाटक करायला मजा येते.

गुजराती किंवा मराठी व्यावसायिक नाटकांप्रमाणे आम्ही प्रचंड संख्येने प्रयोग करत नाही, हे मला मान्य आहे. एका आठवड्यात सात-आठ प्रयोग, असं आम्ही कधीच केलं नाही. कारण, आम्ही एकाच नाटकाचे अनेक वर्षंदेखील प्रयोग करत असतो. एक महिना सलग लागोपाठ प्रयोग करणं आणि एक वर्ष, अनेक वर्षं एखादं नाटक चालवणं, यात खूप फरक आहे. इस्मत आपा के नाम या नाटकाचे प्रयोग आम्ही २००१मध्ये सुरू केले होते, आजही ते सुरू आहेत. वेटिंग फॉर गोदो या नाटकाचे प्रयोग १९७९मध्ये सुरू केले होते; २०१०पर्यंत त्याचे प्रयोग झाले. हे काही ठरवून झालं नाही. पण, यातून एकाच नाटकासोबत इतक्या वर्षांचा काळ घालवता येण्याचा अनुभव आम्ही घेतला. नाटकासोबत आम्हीही मोठे झालो; माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून आम्ही प्रगल्भ झालो. त्याचा फायदा नाटकांना झाला.

Q

नटासाठी अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण किती आवश्यक आहे? तुमचे अभिनयाविषयी काय विचार आहेत?

A

रत्ना पाठक-शहा : काही कलाकार जन्मजातच कला घेऊन येतात आणि काहींना कला शिकवावी लागते, हा सिद्धांतच मला मान्य नाही. कारण, कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यकच असतं. लहान मुलंही गाणं म्हणू लागली, तरी बऱ्यापैकी सुरात गातातच, पण तरीही त्यांना गाणं शिकवावंच लागतं. अगदी स्वयंपाक करणंही शिकून घ्यावं लागतंच. त्यामुळे अभिनयाचं प्रशिक्षण आवश्यकच आहे. काहींची आवड अधिक असते, काहींसाठी ही प्रक्रिया खूप आनंद देणारी असते; पण म्हणून त्यांच्याकडे जन्मतःच जगावेगळी कौशल्य असतात आणि ते कामासाठी पूर्णतः तयार असतात, असं नाही होत. प्रत्येक नटाला प्रशिक्षण गरजेचंच आहे. फक्त हे प्रशिक्षण प्रत्येक वेळी औपचारिक पद्धतीचंच नसतं. प्रत्येक व्यक्ती आपापली पद्धत शोधते.

शास्त्रीय संगीत किंवा नृत्याप्रमाणे नाटकात रूढार्थाने गुरू-शिष्य परंपरा नाही. गुरूंच्या अनुभवाने, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालताना आपल्याला फायदा होतोच, या मताची मी आहे. त्यामुळे गुरू असावेतच. पण कोणत्याही क्षेत्रात चांगला गुरू मिळणं फारसं सोपं नाही. अभिनयाच्या क्षेत्रात तर ते खूपच कठीण आहे. कारण हा अतिशय व्यक्तिसापेक्ष कलाप्रकार आहे. गाणं सुरेल अाहे की बेसूर आहे किंवा नृत्य तालात सुरू आहे की बेताल आहे, हे सर्वसाधारपणे पटकन सांगता येऊ शकतं, पण अभिनय चांगला की वाईट, हे सहज ठरवता येत नाही. मला आवडलेला अभिनय दुसऱ्या कोणा व्यक्तीला तितकासा चांगला वाटू शकत नाही. त्यामुळे अभिनय शिकवणे, हे कोणत्याही गुरूसाठी कठीण आहे. लोकनाट्यासारख्या प्रकारात तरी हे थोडे सोपे आहे, कारण त्यात एक परंपरा आहे. मात्र आधुनिक नाट्यपरंपरेत ही अतिशय अवघड गोष्ट आहे. त्यामुळे अजूनही जगभरात कोणालाच अभिनय करण्याचा अथवा शिकवण्याचा एक विशिष्ट मार्ग सापडलेला नाही. अभिनेत्याला आपला रस्ता स्वतःच शोधावा लागतो. अभिनय शिकता येतो; पण अभिनय शिकवता येत नाही.

अनेकदा असंही होतं, की आपण जे शिकतो ते अगदीच भलतंच असतं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. तिथे मी अनेक चुकीच्या गोष्टी शिकले आणि विशेष म्हणजे, त्या गोष्टी अगदी आत्मविश्वासाने शिकवल्या जात होत्या. पण तिथून बाहेर पडल्यावर आपण शिकलेली अभिनयाची पद्धत अगदी चुकीची असल्याचं लक्षात आलं. तो दुसऱ्यांना दाखवून देण्यासाठी करायचा अभिनय होता. मला तसा अभिनय अजिबात पटत नाही. प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणारा अभिनय मला अधिक आवडतो. पण चुकीच्या गोष्टी शिकल्याचा फायदा हा असतो, की काय करायचं नाही ते कळतं. कारण काय करायचं, यापेक्षा काय करायचं नाही हे कळणं अधिक महत्त्वाचं आहे.

Q

आपल्याकडील कलाकृती, विशेषतः व्यावसायिक कलाकृती अजूनही बऱ्याच प्रमाणात बाळबोध असल्याचं म्हटलं जातं. तुम्हाला हे पटतं का? आपल्याकडील कलाकारांचा प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नाही का?

A

रत्ना पाठक-शहा : ‘स्पून फीडिंग’ ही आपली राष्ट्रीय परंपरा आहे. आपल्याकडील कलाकृतींमध्ये म्हणूनच एखादं वाक्य तीन-तीन वेळा पुन्हा सांगितलं जातं किंवा मग एखादी गोष्ट इतकं विश्लेषण करून समजावली जाते, की एखाद्या लहान मुलालाही लगेच कळेल. बहुतेक आपल्याला प्रेक्षकांवर विश्वास ठेवणंच चुकीचं वाटतं. प्रेक्षकांना कळणार नाही, असंच गृहीत धरून आपण प्रत्येक गोष्ट ‘स्पून फीड’ करतो. अभिनयही अनेकदा असाच केला जातो. समजा एखादा दुःखद प्रसंग असेल, तर सगळ्या व्यक्तिरेखा छाती पिटून रडू लागतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र दुःखद प्रसंगी वेगवेगळ्या प्रतिक्रिया बाहेर पडतात; कधी मूक आक्रोश असतो, तर कधी धक्का बसल्यामुळे एखादी व्यक्ती मौन होऊन जाते. आपल्या कलाकृतींमध्ये मात्र आपण कोणतीही भावना एकाच पद्धतीने दर्शवतो.

यात थोडाफार बदल मला दिसतो आहे; अर्थात तो अजूनही सीमित आहे, पण आपण दोन पावलं पुढे गेल्यावर नेहमी पाच पावलं मागे येतो, ही आपली नेहमीची समस्या आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर ओटीटी आल्यानंतर आपल्या कलाकृतींच्या आशय-विषयात बदल होईल, असं वाटलं होतं. पण तिथेही पुन्हा एकदा ‘सास-बहू’ पद्धतीच्याच कलाकृती पाहायला मिळत आहेत. आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा पाहायला आवडते का, असंही मला वाटतं. रामायण-महाभारताच्या गोष्टी तर पुराणकाळापासून ऐकत आहोत; आजही आपल्याला त्या ऐकायला आवडतात.

Q

तुमच्या कारकिर्दीत काळाचा मोठा पट तुम्ही पाहिला, चित्रपटसृष्टीतील आणि मनोरंजनसृष्टीतील अनेक स्थित्यंतरांच्या तुम्ही साक्षीदार आहात. त्याविषयी काही सांगू शकाल?

A

रत्ना पाठक-शहा : मी एवढ्या वर्षांच्या काळात झालेले बदल सांगितले; तर त्याची यादी खूप मोठी होईल. त्यामुळे मी फक्त आजच्या काळाबाबत अधिक बोलते. आत्ताच्या काळात वैविध्य खूप आहे, ही एक सकारात्मक गोष्ट आहे. लोक त्यांना हवा असलेला आशय सहजपणे निवडू शकतात. कारण एक काळ असा होता, की आपल्या आवडीची कलाकृती पाहण्यासाठी खूप मेहनत करावी लागत असे. मी १७-१८ वर्षांची होते, त्यावेळी आम्हाला एखादा युरोपीय चित्रपट पाहायची इच्छा असेल तर युरोपीय देशांच्या दूतावासांनी त्यांच्या चित्रपटांचे विशेष खेळ आयोजित करण्याची वाट पाहावी लागत असे. नाहीतर मग फिल्म सोसायट्यांच्या उपक्रमात असे काही चित्रपट पाहायला मिळत असत. केवळ चित्रपटगृहात ज्या प्रकारचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे, तेच पाहावे लागत. आज मात्र वेगवेगळ्या जॉनरच्या आणि वेगवेगळ्या माध्यमांतल्या अनेक कलाकृती घरबसल्या उपलब्ध आहेत. जगातील कोणत्याही कोपऱ्यात तयार झालेली कलाकृती आता पाहता येते.

अर्थात यामुळे आता प्रेक्षकांची मानसिकता बदलते आहे. प्रेक्षक कदाचित अजूनच डिमांडिंग होत जातील. अटेन्शन स्पॅनबाबत मात्र मला गंमत वाटते. एकीकडे आपण म्हणत आहोत, की प्रेक्षकांचा अटेन्शन स्पॅन कमी होत आहे आणि दुसरीकडे लोक सात-सात तास बिंज वॉच करत आहेत. मग नक्की खरं काय आहे? याचं उत्तर देणं कठीण आहे. मात्र या सगळ्या काळाचा परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार आहे. त्यांच्यासाठीचं जग अतिशय दृश्यात्मक झालं आहे. एकेकाळी लहान मुलाच्या कानात पहिला शब्द सांगितला जात असे; आज आपण लहान मुलांच्या कानात काय सांगणार आहोत? अगदी दोन-तीन वर्षांच्या मुलांच्या हातातही मोबाईल दिला जातो आहे, त्याचे परिणाम भयंकर दिसत आहेत.

Q

दूरचित्रवाणी, चित्रपट, नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही काम केलं. विविध माध्यमांची काही आव्हानं जाणवली का?

A

रत्ना पाठक-शहा : माध्यम कोणतंही असलं तरी अभिनयाच्या मूलभूत गोष्टी बदलत नाही, असं माझं मत आहे. व्यक्तिरेखा उभी करणं, हे नटाचं मूळ काम आहे. प्रत्येक नटाची पद्धत वेगवेगळी असते. मी प्रत्येक वेळी परिस्थितीनुसार आणि कथेनुसार ही व्यक्तिरेखा उभी करण्याची पद्धत ठरवत असते. अर्थात त्या त्या माध्यमानुसार काही वरवरच्या गोष्टी बदलतात, त्या माध्यमाची बलस्थाने आणि त्रुटी लक्षात घ्याव्या लागतात. मात्र, मूलभूत तंत्रात फारसा बदल होत नाही. त्यामुळे कधीही एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना मला त्रास झाला नाही.

लोकांच्या आवडीनिवडींचा थेट फरक नटांच्या कामावर पडत नाही. पण, तुमच्या हातात येणाऱ्या संहितेवरून या गोष्टी लक्षात येतात. संहितेवरून त्या कलाकृतीचा उद्देश लक्षात येतो. मात्र, मी नशीबवान आहे की साचेबद्ध दिग्दर्शकांसोबत मी फारसं काम केलं नाही. नव्या पद्धतीचा दृष्टिकोन, नवे विचार असणाऱ्या दिग्दर्शकांसोबत मला काम करता आलं आणि त्यामुळे मलाही कधी साचेबद्ध (मला अजिबात न पटणाऱ्या) अभिनयाच्या चौकटीत अडकावं लागलं नाही. मनाविरुद्ध, तत्त्वांविरुद्ध तडजोड करण्याची वेळ माझ्यावर आली नाही.

Ratna Pathak Shah Interview
Premium|Guru Thakur: ‘‘मे आय?’’ कानामागून आलेल्या गोड आवाजानं मी दचकलो; पाहतो तर तीच..!
Q

साराभाई व्हर्सेस साराभाई असेल किंवा गोलमाल ३सारखा चित्रपट, तुम्ही तुमची गंभीर भूमिकांची प्रतिमा मोडून या निखळ विनोदी कलाकृतींमधून प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. आज मात्र विनोदाचं स्वरूप बदलतं आहे, जेन झीसाठी तर रोस्टिंग हाच विनोदाचा नवा प्रकार आहे. या स्वरूपाकडे तुम्ही कसं पाहता?

A

रत्ना पाठक-शहा : मी अशा प्रकारचे विनोदी कार्यक्रम किंवा स्टँड अप कॉमेडी पाहिलेल्या नाहीत. पण हे वर्णन ऐकून ही संकल्पनाच मला मूर्खपणाची वाटते आहे. मला अशा प्रकारच्या विनोदांमध्ये अजिबात रस नाही. एखाद्याची टोपी उडवणं, उपहासात्मक टिप्पणी करणं हे विनोदाचं कामच आहे. पण त्यालाही एक पद्धत असायला हवी. त्यामुळे शिव्या, अपशब्द किंवा रोस्टिंग या गोष्टी माझ्या पचनीच पडू शकत नाहीत. आजकाल चार शिव्या दिल्यावर लोकांना त्या अभिनेत्याचं सादरीकरण फार महान वाटतं. त्यामुळे नटही अतिशय बेपर्वाइनं सर्रास शिव्यांचा वापर करू लागले आहेत. तीच गोष्ट शिव्या न देता तितक्याच प्रभावीपणे सांगण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. ती मेहनत करणं मला गरजेचं वाटतं.

विनोदाचंही तसंच आहे. एखाद्याची टोपी उडवायची आहे, पण समोरच्या व्यक्तीला न दुखावता, किंबहुना त्याला खुजं न ठरवता ते करता यायला हवं. भारतातील विनोदाच्या बाबतीत मला याच गोष्टीचं खूप दुःख वाटतं. आपल्याकडच्या विनोदाची कल्पना ही नेहमीच समोरच्याची टर उडवणं आणि त्याला खुजं ठरवणं हीच आहे. कोणत्याही कुटुंबात डोकावलात, तर गप्पांमध्ये एखाद्या व्यक्तीवर निशाणा साधून त्याची टर उडवली जात असल्याचं दिसतं. कोणालाही लाजिरवाणं झालेलं पाहताना आपल्याला मजा येते. मला अशा प्रकारच्या विनोदाच्या संकल्पनेचा फार त्रास होतो. त्यामुळे मी विनोदी कलाकृती फार कमी केल्या. ज्या कलाकृती होत्या, त्यातील विनोद निखळ होता. त्यामुळे मला न आवडणाऱ्या विनोदापासून दूर राहता आलं.

Q

तुम्ही मराठी रंगभूमीवरील अनेक मातब्बर कलाकारांबरोबर काम केलं. मराठी रंगभूमीविषयी आदर असल्याचं तुम्ही नेहमी म्हटलं आहे. सध्याच्या मराठी रंगभूमीविषयीची तुमची निरीक्षणं काय आहेत? गेल्या काही काळात तुम्हाला आवडलेलं मराठी नाटक कोणतं?

A

रत्ना पाठक-शहा : कोरोनानंतरच्या काळात मला फारशी मराठी नाटकं पाहता आली नाहीत. मी पाहिलेलं शेवटचं मराठी नाटक हे संगीत देवबाभळी होतं. सध्याची मराठी व्यावसायिक नाटकं मला तितकीशी रुचत नाही, त्यामुळे मी ती फारशी पाहत नाही. त्याच पद्धतीची नाटकं सध्या जास्त होत आहेत. अर्थात पूर्वीही याचं प्रमाण अधिक होतंच, पण आजच्या काळाबाबत भाष्य करणारी, वेगळ्या धाटणीची, नवं काही शोधू पाहणारी नाटकंही मराठीत होत आहेत.

उदाहरणच द्यायचं झालं, तर शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक अतिशय आवडलं होतं. मराठीत आजही काही संस्था अशा प्रकारची नाटकं करत असतील; मला सध्या त्याबाबत फारशी माहिती नाही. पण अधूनमधून काही गोष्टी कळत असतातच. चारचौघी या नाटकाचं नव्या संचातलं पुनरुज्जीवन खूप छान झालं असल्याचं मी ऐकलं. अमृता सुभाष हिचं असेन मी, नसेन मी हे नाटक उत्तम असल्याचं कळलं. पर्ण पेठे या युवा रंगकर्मीचं तोत्तोचान हे नाटक मी पुण्यात असताना पाहिलं, मला तेही खूप आवडलं. मोहित टाकळकर हा दिग्दर्शक चांगलं काम करतो आहे. प्रत्येक काळात उत्तमच नाटक होईल, असं नाही. पण असे प्रयत्न सुरू राहणं महत्त्वाचं असतं.

Ratna Pathak Shah Interview
Premium| Hridyanath Mangeshkar: लतादीदींनी संगीताचं खरं तत्त्व सांगितलं, अंधारात धडपडू नकोस, प्रकाशाचा मागोवा घे
Q

महाराष्ट्रात मराठी भाषा या विषयावरून यंदाच्या वर्षी बराच खल झाला. एक नट म्हणून भाषा हा तुमच्या कामाचा आणि प्रशिक्षणाचा अविभाज्य आहे. तुम्ही याकडे कसं पाहता?

A

रत्ना पाठक-शहा : माझ्या आयुष्यात भाषेची भूमिका फार महत्त्वाची ठरली आहे. माझी आई अनेक वेगवेगळ्या भाषा बोलत असे. लहानपणापासून माझ्या कानावर गुजराती, हिंदी, मराठी, पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषा पडल्या आणि मी आपसूकच त्या शिकले. यासाठी मी स्वतःला फार नशीबवान समजते. आपण लहानपणी जितक्या भाषा शिकू, तितकं चांगलं आहे. भाषा शिकण्यात खूप आनंद मिळू शकतो. उत्तम पद्धतीने भाषा बोलून मिळणाऱ्या आनंदानं, भाषेचं सौंदर्य अनुभवण्याच्या आनंदानं आयुष्य समृद्ध होतं. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे.

दुसरीकडे अनेक भाषा मरणपंथाला लागल्याचं दिसत असल्याने लोक अस्वस्थही आहेत. येणारी पिढी आपल्या पालकांची भाषाच पुढे घेऊन जाऊ शकत नसल्याचं चित्र आहे. मुलांनाच आपण भाषा शिकवू शकत नसू, तर भाषा वाचवणार कशी? त्यामुळे आता ठरवून मुलांकडे भाषेचा वारसा सोपवणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलांना भाषा आपलीशी वाटली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे.

जितक्या भाषा शिकता येतील तितकं चांगलं असलं, तरी काहींसाठी ही गोष्ट अवघड असू शकते, हेही लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे कोणावरही भाषा शिकण्यासाठी बळजबरी करण्याचं मी कधीही समर्थन करणार नाही. तसंच, भारतासारख्या एवढ्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात एका राज्यात एकाच भाषेतून व्यवहार होतील, अशी अपेक्षा करणंही अवास्तव आहे. आपण केवळ एका राज्याचे नागरिक नाही; तर भारतीय आहोत. उद्या मी कर्नाटकमध्ये गेल्यास संवादासाठी मी तिथली भाषा थोडीबहुत शिकली पाहिजे, पण मी कोणत्या कारणाने शिकले नाही, तर मला मारहाण केली जाऊ शकत नाही. त्यामुळे भाषेवर राजकारण करताना या गोष्टींबाबत तारतम्य ठेवायला हवं. दुर्दैवानं वातावरण तापलेलं असताना आपण तारतम्य गमावून बसतो.

------------------

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com