Share Market : हा संपूर्ण महिना तेजीमंदीच्या धुमश्चक्रीतच जाणार?

निफ्टी खाली येणार, पण प्रत्यक्षात ती ‘हूल’ देऊन वरच जात आहे. बरं, वर जाते म्हणावे तर एखाद्या दिवशी दृष्ट लागल्यासारखी खाली येते..
Share Market
Share Market Esakal

रोज वर जाणारा शेअर खाली येत असताना पाहवत नाही. नवीन खरेदी जरी केली नाही, तरी धीर धरणे आपल्या हाती आहे. हा संपूर्ण महिना तेजीमंदीच्या धुमश्चक्रीतच जाणार आहे.

भूषण महाजन

मार्च महिना सुरू झाल्यापासून उष्णतेच्या झळा सुरू झाल्या आहेत. त्या झळा शेअर बाजारातही जाणवत आहेत. निफ्टी वर गेलेली दिसते खरी, पण माझे भांडारमूल्य खाली आलेले दिसते.

सहसा छोटा गुंतवणूकदार लार्ज कॅप शेअरच्या नादी लागत नाही आणि आपल्या अभ्यासाने एखादा कमी किमतीचा शेअर निवडावा तर तो हमखास खाली येतो. धरलं तर चावतं म्हणतात ते हेच. दुसऱ्या बाजूला, खाली आला तर जिओ फायनान्स घ्यावा असे मनातल्या मनात म्हणणारे गुंतवणूकदार, बोलता बोलता तो वीस पंचवीस टक्के वर गेलेला पाहून हात चोळत बसतात.

हे म्हणजे सोडलं तर पळतं! बरं, तज्ज्ञ म्हणतात, की निफ्टी खाली येणार, पण प्रत्यक्षात ती ‘हूल’ देऊन वरच जात आहे. बरं, वर जाते म्हणावे तर एखाद्या दिवशी दृष्ट लागल्यासारखी खाली येते.

आता मागच्या सप्ताहाचेच बघाना; ४-५-६-७ मार्च रोजी २२४००जवळ घोटाळणारी निफ्टी ८ तारखेला (शुक्रवारी) आणि पाठोपाठ ११ तारखेला (सोमवारी) एक तडाखा घेऊन खाली आली. कुणीतरी २२५०० ही प्रतिकार पातळी धरून विक्री करत आहे असे वाटते.

निफ्टी जरी फारशी खाली आली नाही, तरी स्मॉल व मिड कॅप शेअर धारातीर्थी पडले. तसेच गुंतवणूकदारांचे लाडके सरकारी एन्टरप्रायझेस व सरकारी बँकांचे शेअर व त्यामुळे निर्देशांक खाली आले.

पीएसई निर्देशांक ९२०० अंशापर्यंत खाली येऊ शकतो. तसेच सरकारी बँकादेखील येथून दोन ते तीन टक्के खाली येऊ शकतात.

रोज वर जाणारा शेअर खाली येत असताना पाहवत नाही. नवीन खरेदी जरी केली नाही, तरी धीर धरणे आपल्या हाती आहे. हा संपूर्ण महिना तेजीमंदीच्या धुमश्चक्रीतच जाणार आहे.

लार्ज कॅपचा पाठपुरावा करावा असे आम्ही सतत म्हणत होतो. रिलायन्ससारखा शेअर गजगतीने चालतो पण त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मोठे भांडवल गुंतते म्हणून लहान गुंतवणूकदारांनी नाकारलेला, तसेच वारंवार सुचवलेला आयसीआयसीआय बँक व स्टेट बँक. ‘कठीण समय येता’ कामास येणारे हे शेअर आहेत.

मागील लेखात (बाबूजी धीरे चलना..., प्रसिद्धीः २ मार्च) सेबीने योजलेल्या स्मॉल व मिड कॅप फंडांच्या स्ट्रेस टेस्टबद्दल माहिती दिली होती. यासाठी सेबीने आता डेडलाईन दिली आहे. १५ मार्चपर्यंत म्युच्युअल फंडांना यावर कृती करावी लागणार आहे. प्रमाणाबाहेर विक्रीचा रेटा आल्यास काय कृती करणार ह्याचा लेखाजोखा द्यावा लागेल.

मागे फ्रँकलीन म्युच्युअल फंडाने त्यांचे काही फिक्स्ड इन्कम फंड गुंतवणूक विमोचनासाठी स्थगित केले होते. गुंतवणूकदारांना एकूणएक पैसा परत मिळाला, पण लगेच मिळाला नाही. तसे पुन्हा घडू नये म्हणून ही खबरदारी. त्यात प्रथम फक्त रोखीच्या सिक्युरिटी व मोठे शेअर विकू असे म्हणून चालणार नाही.

(येथे हे लक्षात घेतले पाहिजे, की स्मॉल व मिड कॅप फंडात किमान २० टक्के लार्ज कॅप शेअर घेता येतात व ५ टक्क्यांच्या मागेपुढे रोख व ट्रेझरी बिले ठेवता येतात) आता कुठल्याही गुंतवणूकदाराला माझा नंबर पहिला असे म्हणता येणार नाही. थोडक्यात फर्स्ट मुव्हर अॅडव्हाटेंज मिळणार नाही.

फंडाच्या विक्रीचे पैसे आनुपातिक (Proportionate) पद्धतीनेच मिळतील. यामुळे कुठल्याही गुंतवणूकदाराचे कमी अधिक नुकसान होणार नाही. (म्हणजे हे शेअर किंवा बहुतांशी स्मॉल व मिडकॅप शेअरचा भरणा असलेले फंड बाजाराप्रमाणे खाली आल्यास नुकसान होईलच पण ते समन्यायी असेल.) या विषयी पुन्हा प्रतवारीत (Mutual Fund Categorization) काही बदल करायचा का यावर विचार चालू आहे. या सर्वावर उत्तर एकच : संयम!!

याखेरीज सेबीचे स्पुटनिक आता एसएमई एक्स्चेंजवर नोंदलेल्या व प्राथमिक समभागविक्रीत वकुबापेक्षा अनेकपट मागणी असणाऱ्या /होणाऱ्या शेअरवर आदळणार आहे. काही ठिकाणी आपापसात गोलाकार व्यवहार करून (Ring Trading) शेअरचे भाव फुगवण्याचे प्रकार सेबीच्या निदर्शनास आले आहेत.

हे कधीतरी होणारच होते व त्यामुळे भरमसाट किमतीला होणाऱ्या भागविक्रीला थोडातरी आळा बसेल व बाजारातला फुगवटा कमी होण्यास निश्चित मदत होईल. शेअर बाजारात पैसे मिळवणे वाटते तितके सोपे नाही हेसुद्धा हौशा-नवश्यांना कळेल.

या बाबतीत एक सत्य शेअर बाजारातील सर्वच घटकांनी लक्षात घ्यायला हवे. बाजार नेहमी दोन्ही बाजूंना अतिरेक करत असतो. तेजीत तेजीचा अतिरेक तर मंदीत मंदीचा. गेल्या दहा वर्षांत निफ्टीचे सरासरी किंमत मिळकत गुणोत्तर १९ आहे आणि आजचे गुणोत्तर २३ला पोहोचले आहे. म्हणजेच आजचा बाजार गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या किमान वीस टक्के वर आहे, असे एका संस्थेचे म्हणणे आहे.

तसेच बाजार कोसळण्यासाठी हे गुणोत्तर २५च्या पुढे जावे लागते. मोतीलाल ओसवाल रिसर्चच्या अभ्यासाप्रमाणे निफ्टीचे पुढील वर्षीचे पी/ ई गुणोत्तर १९.५ आहे व ते दहा वर्षांच्या तुलनेत फारसे जास्त नाही, उलट कमीच आहे. गेलेल्या बारा महिन्यांचा विचार केल्यास हे गुणोत्तर जेमतेम ०.३ टक्के अधिक आहे.

मात्र सिटी बँकेचे संशोधन असे सांगते, की गेल्या दहा वर्षांचा फॉरवर्ड पी/ ई १७.७ आहे आणि आज बाजार किमान दहा टक्के महाग आहे. पुढील वर्षात निफ्टीची मिळकत काय असेल ह्याचा अंदाज प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, शेवटी आपल्याला एक हत्ती आणि (डोळे न बांधलेले) चार शहाणे अशी कथा आठवावी लागते.

त्यातही फक्त या एकाच परिमाणावर बाजार बघता येणार नाही. कंपन्यांचे कामकाज, पुढील आंतरराष्ट्रीय भविष्याचा व घडामोडींचा अंदाज, स्थिर सरकारी धोरण व अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजारावर पडलेले गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब, रतीब घातल्यासारखा येणारा स्थानिक भांडवलाचा ओघ, तसेच गेल्या साडेतीन वर्षात एमएससीआय इमर्जिंग मार्केट निर्देशांकातील भारताचा हिस्सा ८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे, या सगळ्याचा विचार करावा लागेल.

चीनचा बाजार कितीही आकर्षक भासला तरी तेथे परदेशी गुंतवणूकदारांनी मारच खाल्ला आहे. जेव्हाकेव्हा परदेशी भांडवल भारतात येईल तेव्हा त्यांना ह्याच प्रमाणात (प्रत्येक शंभर रुपयातील भारताचा हिस्सा ₹ १८) निवेश करावा लागेल. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर दीर्घकालीन गुंतवणुकीला काहीही धोका नाही हे लक्षात येते. थोडा क्षेत्रबदल व मार्केट कॅप बदल केल्यास गुंतवणूक सुरक्षित राहील व वाढेल.

Share Market
Fintech Sector : मोठ्या बँकांची २०२४ मधील फ्रेशर्सवर का आहे नजर? लाखोंचे पॅकेज देण्याची तयारी

काही महिन्यापूर्वी इंडिगो हा शेअर अभ्यासाला सुचवला होता. त्यावेळी तो ₹ २,४०० ते ₹ २,५०० या दरम्यान होता. विमान वाहतुकीतील ६२ टक्के हिस्सा व चांगली नाममुद्रा हे ह्या अभ्यासाचे ठळक वैशिष्ट होते. खनिज तेल स्थिर असल्यामुळे व रुपया डॉलर विनिमयदेखील अनुकूल असल्यामुळे भाव वाढता आहे.

एकच जोखीम किंवा संधी होती, ती म्हणजे शेअरचा भाव वाढल्यास कंपनीचे बाहेर पडलेले प्रवर्तक गंगवाल स्वतःचे शेअर विकतील ही! (तशी परवानगी त्यांना कोर्टाने दिली आहे.) तसे केल्यास तात्पुरते खालच्या भावात शेअर मिळतील. नुकताच गंगवाल कुटुंबीयांनी त्यांचा कंपनीतील ६ टक्के हिस्सा विकला.

हा हिस्सा वरच्यावर परदेशी संस्थांनी विकत घेतला. २३० लाख शेअरचा ३,०१६ रुपयांनी सौदा होऊनही शेअर तीनशे रुपये वर गेला (₹ ३,२८०-₹ ३,३००) हे बघून गंगवाल कुटुंबीयांच्या विक्रीमुळे येणारी जोखीम कमी झाल्याचे दिसून येते, व ती संधीच असल्याचे लक्षात येते.

एअर इंडिया आपला विमान वाहतुकीचा ग्राहक हिस्सा वाढवत नाही, तोपर्यंत व विमान प्रवासाची लोकप्रियता जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा शेअर सांभाळलेला बरा. आज अष्टौप्रहर प्रवासी विमान वाहतूक चालू आहे. पूर्वी अपरात्री विमान प्रवास थोडा स्वस्त असे. तसे आता राहिले नाही. हा विचार करून प्रत्येक घसरणीत या शेअरचा विचार करावा.

याखेरीज चालू वर्षीच्या पहिल्या दिवसापासून सोन्यातील गुंतवणूक फलदायी असेल असे आम्ही म्हणत आहोत. त्याच बरोबर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या मल्टी अॅसेट फंडांकडे निर्देश करीत आहोत. आज मौल्यवान धातूत आलेली तेजी बघता हा कयास योग्य आहे व त्याचा किमान एक/ दोन वर्षांसाठी पाठपुरावा करावा असे वाटते.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

-----------

Share Market
Women's Day :नोकरदार महिलांसोबतच घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये 'या' आरोग्याच्या समस्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com