हलव्याचे 'हे' प्रकार नक्की चाखून बघा!

थंडी आणि हलवा यांची घट्ट मैत्री आहे. थंडी पडायला लागली की घरोघरी गाजराचा हलवा, दुधी भोपळ्याचा हलवा केला जातो.
हलव्याचे 'हे' प्रकार नक्की चाखून बघा!

उषा लोकरे :

दलिया हलवा

साहित्य

एक वाटी दलिया, अर्धी वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी खवा, अर्धा कप दूध, १ वाटी साखर, अर्धी वाटी तूप, २-३ लवंगा, १ चमचा वेलदोडा पूड, बेदाणे, बदाम-काजू तुकडे.

कृती

प्रथम दलिया स्वच्छ धुऊन त्यात २ वाट्या पाणी घालून थोडा वेळ उकळू द्यावा. कुकरमध्ये दलिया ठेवून ३ शिट्ट्या करून चांगला शिजवून घ्यावा. गार झाल्यावर गुठळ्या मोडून मोकळा करावा. कढईत तूप घालून त्यात लवंगा तडतडू द्याव्यात. त्यावर दलिया परतावा. खमंगसर झाल्यावर त्यात खोबरे घालून चांगले खमंग होईपर्यंत परतावे. आता त्यात साखर, खवा घालावा व दूध शिंपडून मंद आचेवर परतावे. हलवा मोकळा होईल हे पाहावे. त्यात वेलदोडा पूड मिसळावी. दीड चमचा तुपात सुकामेवा खमंग होईपर्यंत परतून घ्यावा व वरील मिश्रणात थोडा मिसळावा. हलवा सर्व्ह करताना राहिलेला सुकामेवा वरून पसरावा.

खारीक हलवा

साहित्य

पंधरा-वीस खारका किंवा ताजा खजूर, ४ टेबलस्पून तूप, १ कप दूध + खारका भिजवायला दूध, अर्धा कप खवा, ४ टेबलस्पून साखर, अर्धा चमचा वेलदोडा पूड, सुकामेवा.

कृती

खारका बुडतील एवढे दूध घालून खारका रात्रभर भिजवाव्यात. दुसऱ्या दिवशी देठ व बिया काढून खारका त्यात दुधात मिक्सरमधून फिरवून घ्याव्यात. जाडसर पेस्ट करावी. खजूर घेतला तर त्याची तशीच जाडसर पेस्ट करावी. आता कढईत तूप गरम करावे. त्यावर खारीक पेस्ट तूप सुटेपर्यंत खमंग परतावी. त्यात अर्धा कप दूध घालून मिश्रण शिजवावे. दूध पटकन आटून जाते. अशावेळी त्यात खवा किसून घालावा व मिश्रण एकसारखे ढवळत राहावे व गुठळ्या होऊ देऊ नयेत. या मिश्रणात साखर घालावी व मिश्रण ढवळत एकजीव करावे. मिश्रणातून तूप सुटू लागले की हलवा तयार झाला असे समजावे. आता त्यात वेलदोडा पूड व सुकामेवा मिसळावा. थोडा सुकामेवा सर्व्ह करताना वरून पसरावा.

पाइनॲपल हलवा

साहित्य

अननसाचे दीड वाटी बारीक तुकडे (शक्यतो जाड किसणीने किसून घ्यावेत), अर्धी वाटी तूप, २ वाट्या साखर, दीड वाटी खवा, अर्धी वाटी किसलेले पनीर, पाइनॲपल फ्लेव्हर (नसल्यास वेलदोडा पूड), थोड्या तुपात परतलेले बदाम-पिस्ता काप.

कृती

प्रथम चिरलेले/ किसलेले अननस चांगले दाबून, पिळून त्यातील रस काढावा. कढईत तूप गरम करून त्यावर अननस चांगला परतून घ्यावा. आता त्यात वेगळा काढलेला अननसाचा गर घालावा. त्यातच साखर व खवा घालून मिश्रण ढवळत हलवा शिजवावा. गोळा कडेने सुटू लागल्यावर त्यात किसलेले पनीर मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. आता त्यात इसेन्स घालावा. सर्व्ह करताना वरून थोडे साजूक तूप घालून, बदाम-पिस्त्याच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे.

रताळ्याचा हलवा

साहित्य

अडीच कप रताळ्याच्या चकत्या, पाव कप साखर, ४ टेबलस्पून तूप, १ चमचा वेलदोडा पूड, बदाम काप, बेदाणे, १ कप दूध.

कृती

रताळ्याचे साल काढून त्याचे काप किंवा पातळ चकत्या करून त्या गार पाण्यात घालाव्यात, म्हणजे काळ्या पडणार नाहीत. कढईत तूप तापवून त्यावर रताळ्याचे काप चांगले परतून घ्यावेत. त्यात दूध घालून मिश्रण वाफवून घ्यावे. शेवटी साखर घालून मोकळा हलवा करावा. त्यात वेलदोडा पूड मिसळावी. सर्व्ह करताना वरून बदामाचे काप, बेदाणे घालावेत.

अक्रोड हलवा

साहित्य

दोनशे ग्रॅम अक्रोड, पाव कप तूप, अर्धा कप खवा, दीड कप दूध, अर्धा कप साखर, वेलदोडा पूड, बदाम-पिस्त्याचे काप.

कृती

अक्रोडाची मिक्सरमधून भरड पूड करावी. नॉन-स्टिक कढईत तूप गरम करावे. त्यात अक्रोडाची पूड तांबूस रंग येईपर्यंत चांगली खमंग परतावी. आता त्यात किसलेला खवा घालावा आणि मिश्रण चांगले परतावे. त्यात आता दीड कप दूध घालून मिश्रण चांगले शिजवावे. दूध अर्धे आटले की त्यात अर्धा कप साखर घालून मिश्रण चांगले कोरडे होईपर्यंत परतावे. हलव्यातून तूप सुटले की हलवा तयार झाला असे समजावे. मग त्यात वेलदोड्याची पूड घालावी. सर्व्ह करताना बदाम व पिस्त्याचे काप घालावेत.

शिंगाड्याच्या पिठाचा हलवा

साहित्य

एक वाटी शिंगाड्याचे पीठ, १ वाटी साजूक तूप, पाऊण वाटी साखर, २ कप उकळते पाणी, अर्धा चमचा वेलदोडा पूड, काजू व बदाम काप.

कृती

कढईत तूप गरम करून त्यात शिंगाड्याचे पीठ खमंग तांबूस रंगावर भाजून घ्यावे. त्यात उकळते पाणी घालून झाकण ठेवावे व मिश्रण मऊसर शिजवावे. पाणी आटल्यावर त्यात साखर घालावी व ढवळावे. पुन्हा झाकण ठेवून मिश्रण शिजवावे. तूप सुटू लागले की तयार हलव्यात वेलदोडा पूड मिसळावी. काजू व बदामाच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे.

बेसन हलवा

साहित्य

पाव कप तूप, १ कप बेसन, दीड कप दूध, पाव कप साखर, अर्धा चमचा वेलदोडा पूड, केशराच्या काड्या, सुकामेवा तुकडे.

कृती

प्रथम एका भांड्यात दूध गरम करायला ठेवावे. दुसरीकडे कढईत तूप गरम करावे. गरम तुपात बेसन घालून मंद आचेवर एकसारखे परतून खमंग भाजावे. कच्चा वास गेला पाहिजे. त्याच वेळी बेसन तूप सोडू लागते. आता या खमंग भाजलेल्या बेसनात उकळत ठेवलेले अर्धे दूध हळूच घालावे व मिश्रण एकसारखे ढवळत राहावे, गुठळ्या होऊ देऊ नयेत. मिश्रण एकजीव करावे. आता उरलेले अर्धे गरम दूध घालून पुन्हा मिश्रण एकसारखे ढवळत शिजवावे. आता त्यात साखर घालून परत ढवळत राहावे व शिजवावे. मिश्रण घट्ट होऊ लागेल. वेलदोडा पूड व सुकामेवा मिसळून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. सर्व्ह करताना वरून केशराच्या काड्या व सुकामेवा घालावा.

लाल भोपळ्याचा हलवा

साहित्य

अर्धा किलो लाल भोपळ्याचा कीस, १ कप दूध, १ कप खवा किसून, १ कप साखर, ४ टेबलस्पून तूप, वेलदोडा पूड, काजू, किसमिस.

कृती

लाल भोपळा साल काढून जाड किसणीने किसावा. तूप गरम करून त्यावर कीस चांगला खमंग परतावा. त्यात दूध घालून मिश्रण मऊसर शिजवावे व मंद आचेवर कोरडे करावे. त्यात किसलेला खवा व साखर घालून मिश्रण परतून घ्यावे. मिश्रण घट्टसर झाले व बाजूने तूप सुटू लागले की त्यात वेलदोडा पूड व सुकामेवा मिसळून सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com