सूर्यमालेचा शोध : योहान्स केप्लर

Johannes Kepler
Johannes KeplereSakal

टीको ब्राहे आणि योहान्स केप्लर या दोघांनी आपापले संशोधन केले नसते तर आणखीन कमीत कमी एकदोन शतके तरी आपण पृथ्वी हीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि सूर्य-चंद्रासकट इतर सर्व ग्रह पृथ्वीची परिक्रमा करतात, असेच मानले असते.

केप्लरचा (Johannes Kepler) जन्म जर्मनीतील श्टुटगार्टपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाईल देरश्कार्ट (Weil der Stadt) येथे २७ डिसेंबर १५७१ रोजी झाला. त्याचे आजोबा शहराचे मेयर होते, पण त्याचे वडील मात्र एक मर्सिनरी किंवा भाडोत्री सैनिक होते. योहान्स पाच वर्षाचा असतानाच ते घर सोडून निघून गेले. त्यांचा मृत्यू निदरलॅण्डच्या युद्धात झाला, असा समज आहे.

त्याच्या आईचे वडील खानावळ किंवा सारय चालवत आणि आई वनौषधींचा व्यवसाय आणि त्यांचा वापर लोकांचे रोग दूर करण्यासाठी करत असे. खूप भांडकुदळ अशी तिची ख्याती (?) होती. योहान्स स्वतः आपल्या गणिताचे कौशल्य दाखवून लोकांचे मनोरंजन करत असे.

Johannes Kepler
Nigar Shaji : शेतकऱ्याची लेक सांभाळतेय 'आदित्य एल-1' ची कमान; इस्रोच्या महिला वैज्ञानिकाची जगभरात चर्चा!

योहान्सला त्याच्या लहानपणीच त्याच्या आईने खगोलशास्त्राची आवड लावली होती. तो सहाएक वर्षांचा असताना, १५७७ साली त्याची आई त्याला धूमकेतू दाखवण्याकरिता एक उंच जागेवर घेउन गेली होती. त्यानंतर १५८०मध्ये त्याने खग्रास चंद्रग्रहण बघितले. खग्रास ग्रहणाच्यावेळी लालसर झालेला चंद्र त्याच्या नेहमीच लक्षात राहिला होता. लहानपणी त्याला देवी आल्याने त्याच्या डोळ्यांची क्षमता कमी झाली होती आणि त्याचे हात देखील काहीसे अधू झाले होते. यामुळे खगोलनिरीक्षणांच्या क्षेत्रात त्याच्या कारकिर्दीला मर्यादा आल्या.

वयाच्या १८व्या वर्षी योहान्सने ट्यूबिनजेन विद्यापीठात तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. इथेच त्याने तो स्वतः एक उत्कृष्ट गणितज्ञ असल्याचे सिद्ध केले आणि तो अचूक पत्रिका करणारा म्हणून प्रसिद्धीसही आला. याच काळात त्याने टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताचा आणि कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित विश्वाच्या सिद्धांताचा अभ्यास केला व अंततः विद्यार्थीदशेत असतानाच तो कोपर्निकसच्या सिद्धांताचा समर्थक आणि प्रसारक झाला.

जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये या विषयावर वादविवाद होत असे, तेव्हा कोपर्निकसचा सिद्धांत गणितीय आणि धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा बरोबर आहे ते योहान्स सांगत असे. कोपर्निकसचा सिद्धांत गणितातून सांगणे त्या मानाने सोपे होते पण धर्मशास्त्राच्या संदर्भाने तो सांगे, की जर सूर्य हा ऊर्जेचा आणि शक्तीचा प्रमुख स्रोत आहे तर तोच विश्वाचा केंद्र असायला पाहिजे.

ट्यूबिनजेन येथे त्याचा अभ्यास संपता संपता पुढच्या वाटचालीसाठी त्याच्या समोर दोन मार्ग होते. एक धर्मशास्त्राच्या दिशेने जात होता तर दुसरा गणिताच्या दिशेने आणि योहान्स दोन्ही शास्त्रात निपुण होता. त्याचा कल धर्मशास्त्राच्या दिशेने जाण्याचा होता, पण त्याच्या मित्रांनी त्याला दुसरा पर्याय घेण्यास भरीस पाडले.

ट्यूबिनजेन येथे अभ्यास पूर्ण होण्याअगोदरच म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी (एप्रिल १५९४मध्ये) योहान्सने आता दक्षिण ऑस्ट्रियात असणाऱ्या ग्राज (Graz) येथे गणित आणि खगोलशास्त्र शिकविण्याचे कबूल केले होते. ग्राज येथे आपल्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेकदा शासकीय कॅलेंडर बनवले आणि काही अंदाज आणि भाकितेही मांडली. याबरोबर त्याची प्रतिष्ठाही वाढत गेली. ट्यूबिनजेनच्या वास्तव्यातच फलज्योतिषाबद्दल त्याच्या भावना मिश्र होत गेल्या होत्या.

वैश्विक घटनांचा मानवी जीवनावर प्रभाव असतो यावर त्याचा ठाम विश्वास होता, पण तरीही त्याच्या पूर्वीच्या फलज्योतिषांनी मांडलेल्या अनेक संकल्पना चुकीच्या आहेत आणि त्या बाद केल्या पाहिजेत असेही त्याला वाटत होते. सन १५९६मध्ये त्याने एक पुस्तक लिहिले, मिस्टीरियम कॉस्मोग्राफिकम (Mysterium Cosmographicum). या पुस्तकात त्याने त्याला वाटत असलेल्या फलज्योतिषातील काही चुकांवर भाष्य केले आणि काही विचार बदलण्यावर भर दिला.

Johannes Kepler
Aditya L1 : 'आदित्य एल-1'च्या वैज्ञानिकांसाठी लागू होता विचित्र नियम; परफ्यूम वापरण्यावर होती बंदी! जाणून घ्या कारण

डिसेंबर १५९५मध्ये २४वर्षाच्या योहान्स केप्लरची ओळख बार्बरा म्युलरशी झाली. तेवीस वर्षांची बार्बरा विधवा होती आणि तिला एक मुलगीही होती. बार्बराला तिच्या नवऱ्याची संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती, तिचे वडीलही एका मोठ्या गिरणीचे मालक होते. मात्र योहान्स आणि बार्बराचा विवाह तिच्या वडिलांना मंजूर नव्हता, कारण केप्लरचा जन्म जरी मोठ्या घराण्यात झाला असला तरी आता तो गरिबीचे जीणे जगत होता.

केप्लरला मिस्टिरियमच्या प्रकाशनाच्या कामाकरता बाहेर जावे लागले आणि तेव्हा हे लग्न त्याने जवळजवळ मोडलेच होते. पण तेव्हा केप्लरच्या मित्रांची मध्यस्ती आणि मिस्टिरियमच्या प्रकाशनानंतर केप्लरला मिळालेली प्रसिद्धी यामुळे चित्र बदलले आणि २७ एप्रिल १५९७ या दिवशी बार्बरा आणि योहान्स यांचा विवाह झाला.

मिस्टिरियमच्या प्रकाशनानंतर केप्लरने आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. त्याने चार पुस्तकांत विभागलेल्या मिस्टिरियमच्या विस्तृत आणि विस्तारित आवृत्तीवर काम करण्यास सुरुवात केली. या चार पुस्तकांपैकी पहिल्या पुस्तकात सूर्य आणि ताऱ्यांबद्दल चर्चा असणार होती तर दुसऱ्या पुस्तकात ग्रह आणि त्यांच्या गती, तिसऱ्या पुस्तकात ग्रहांबद्दल माहिती आणि पृथ्वीच्या भूगोलाबद्दल चर्चा असणार होती, आणि शेवटच्या पुस्तकात हवामानशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राबद्दल चर्चा असणार होती.

आपल्या काही मित्रांची मिस्टिरियमवरील मते आणि त्यांच्या टिपण्ण्या जाणून घेण्यासाठी केप्लरने पुस्तकाच्या प्रती काही मित्रांना आणि शास्त्रज्ञांना पाठवल्या होत्या. त्यातील एक होता ऱ्हमारूस अर्सस (Reimarus Ursus). अर्सस रुडॉल्फ द्वितीयच्या शाही दरबारात गणितज्ञ होता आणि टिको ब्राहेचा कट्टर विरोधक होता. अर्ससने केप्लरला उत्तर पाठवले नाही पण टीकोला अपमानीत करण्याकरिता त्याने केप्लरचे पुस्तक परत एकदा प्रकाशित केले.

पण तरीही टीकोने केप्लरबरोबर पत्र व्यवहार सुरू केला. त्याने आपल्या पत्रव्यवहाराची सुरुवातच मुळी कठोर किंवा कटू वाटेल अशा पद्धतीने करून केप्लरचे विचार कसे अयोग्य आहेत दाखवून दिले. या पुस्तकातील अनेक त्रुटी दाखवत ब्राहेने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला - केप्लरचे गणित कोपर्निकसने घेतलेल्या कमी दर्जाच्या निरीक्षणांवर आधारित होते. त्यामुळे केप्लरची निदाने चुकीची आहेत.

केप्लरनेही ते स्वाभाविकरित्या मान्य केलेच. पुढे केप्लर आणि टीको यांच्यादरम्यान अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली. त्यांनी खगोलशास्त्राच्या संदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा केली. यात प्रमुख होते कोपर्निकसचा सिद्धांत आणि चंद्राशी निगडित घटना. यात ते दोघेही धर्मशास्त्राच्या संदर्भानेही आपली मते मांडत असत.

पत्रांच्या या देवाणघेवाणीत दोघांनाही जाणवले, की त्यांच्या संशोधनात त्यांना एकमेकांची गरज आहे. टीकोला केप्लरकडून त्याच्या सिद्धांताला पूरक असे गणित मांडून हवे होते, तर केप्लरला कोपर्निकसच्या सिद्धांताची परिपूर्णता करण्यास टीकोच्या उत्कृष्ट आणि अचूक निरीक्षणांची गरज होती.

पण टीको केप्लरला आपली निरीक्षणे देण्यास तयार नव्हता. ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य या ग्रहांसोबत पृथ्वीची परिक्रमा करतो, या आपल्या सिद्धांताला केप्लर दुजोरा देणार नाही, उलट आपण घेतलेली निरीक्षणे वापरून तो कोपर्निकसच्या सिद्धांताचीच पुष्टी करेल, याची टीकोला कल्पना होती. टीकोची निरीक्षणे मिळाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही म्हणून केप्लरने आपले लक्ष इतर प्रश्नांकडे वळवले.

Johannes Kepler
Earth 2.0: पृथ्वी नष्ट झाली तर इथं जीवन जगता येईल का?

पण १५९९च्या शेवटीशेवटी केप्लरला पुन्हा अचूक निरीक्षणांची भासू लागली. त्याने प्रागला जाऊन टीकोची भेट घेण्याचे ठरवले. टीकोलाही केप्लरची गरज होतीच, म्हणून त्याने १ जानेवारी १६०० रोजी केप्लरला एक पत्र पाठवले होते. केप्लरला याची काहीच कल्पना नव्हती. तो टीकोला ४ फेब्रुवारी १६०० या दिवशी प्रागपासून ३५ किलोमीटर अंतरावर जिथे टीको आपली नवीन वेधशाळा उभारत होता त्या ठिकाणी भेटला. पुढचे दोन महिने तो टीकोचा पाहुणा म्हणून त्याच्याबरोबरच राहिला.

या काळात त्याने टिकोच्या मंगळाच्या निरीक्षणांचे विश्लेषण केले. केप्लरच्या कामाचा टीकोवर खूप प्रभाव पडला होता. टीकोने केलेल्या मंगळाच्या सर्व निरीक्षणांचे विश्लेषण करण्यास केप्लरला दोन वर्षे लागणार होती. म्हणून त्या दोघांनी या कामाच्या संदर्भात करार करण्याचे ठरवले, पण या वाटाघाटींचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि ६ एप्रिल रोजी केप्लरने वेधशाळा सोडली आणि तो प्रागला आला.

तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना, अशीच या दोघांची स्थिती झाली होती. त्यांच्यात परत तह झाला. आता मात्र त्यांनी औपचारिक व्यवस्था केली - केप्लरचे काम, त्याचे मानधन त्याच्या (आणि त्याच्या परिवाराच्या) राहण्याची व्यवस्था वगैरे. आणि मग आपल्या कुटुंबाला आणण्यासाठी केप्लर जूनमध्ये ग्राजला परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com