नव्या पद्धतीच्या टायरमुळे टायरची कार्यक्षमता वाढणार? लो रोलिंग रेझिस्टन्स टायर? जाणून घ्या

तंत्रज्ञानातील विकास केवळ इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरपुरताच न राहता वाहनासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या सुट्या भागांसाठीदेखील होत आहे
low rolling resistant tire
low rolling resistant tireEsakal

पारंपरिक इंधनावर चालणारी वाहने किंवा अगदी ईव्ही अधिकाधिक पर्यावरणपूरक होऊन कार्बन फुटप्रिंट कमी होण्यासाठी तंत्रज्ञान सतत विकसित करण्यात येत आहे. हा विकास केवळ इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरपुरताच न राहता वाहनासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या सुट्या भागांसाठीदेखील होत आहे. लो रोलिंग रेझिस्टन्स टायर हे त्याचेच पुढचे पाऊल आहे.

सागर गिरमे

पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतचा (ईव्ही) प्रवास आपण मोठ्या वेगाने केलाय. अर्थात याला नागरिकांमध्ये आलेल्या जागरूकतेसोबतच आश्वासक टेक्नॉलॉजीचीही साथ लाभलेली आहे.

यालाच पूरक ठरण्यासाठी पारंपरिक इंधनावर चालणारी वाहने असू किंवा ईव्ही असोत, कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आणि वाहनव्यवस्था अधिक शाश्वत होण्यासाठी ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये सतत नवीन बदल होत आहेत.

केवळ गाडीचे मायलेज वाढवण्यापर्यंत किंवा एका चार्जवर जास्तीत जास्त किलोमीटर जाण्यासाठी इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरमध्ये बदल करण्यासोबत गाड्यांच्या टायरमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

आता तुम्ही म्हणाल, की टायर फक्त ट्यूबलेस असले, वेगवेगळया टेरेनमध्ये चालणारे आणि पंक्चर झाल्यावरही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणारे असले तर तेवढे पुरेसे आहे की... मात्र टायरची टेक्नॉलॉजी फक्त एवढ्यावरच थांबलेली नाही. गाडीचे मायलेज किंवा रेंज वाढविण्यासाठीही टायरमध्ये बदल केले जात आहेत.

टेक्नॉलॉजी काय ?

गाडी रस्त्यावरून चालताना मायलेज किंवा रेंज कमी होण्याची काही कारणे आहेत. त्यापैकी गाडीचे वजन, वाहता वारा, रस्त्याला होणारे टायरचे घर्षण ही त्यातली काही मुख्य कारणे आहेत. गाडीचे वजन कमी करण्यासाठी मेटलच्या ऐवजी जास्तीत जास्त फायबरचा किंवा हाय-एंड गाड्यांमध्ये कार्बन फायबरचा वापर केला जात आहे.

त्यासोबतच गाड्या एरो-डायनामिक पद्धतीने डिझाईन करून उत्पादित होत आहेत. आता टायरचे घर्षण कमी होऊन रस्त्यामुळे होणारा प्रतिरोध कमी करण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे; यालाच लो रोलिंग रेझिस्टन्स असे म्हणतात.

यामुळे वाहन चालत असताना टायरचे घर्षण कमी होत असल्याने ऊर्जाही कमी लागते. त्यामुळे वाहन गतिमान ठेवण्यासाठी लागणारी ताकद कमी होते.

यासाठी टायरमध्ये वापरण्यात आलेले मटेरिअल, बदलण्यात आलेले डिझाईन आणि ट्रेड पॅटर्न यामुळे घर्षण कमी होण्यास मदत मिळत आहे.

रोलिंग रेझिस्टन्स कमी झाल्याने इंधनाची कार्यक्षमता वाढते, तसेच ईव्हीच्या बाबतीत रेंज वाढण्यास मदत होते. परिणामी कार्बन उत्सर्जन कमी होण्यासोबतच इंधनावर आणि चार्जिंगवर होणारा खर्च कमी होईल.

रोलिंग रेझिस्टन्स म्हणजे नेमके काय?

रोलिंग रेझिस्टन्स समजून घेण्यासाठी क्रेझी बॉल आणि नेहमीच्या रबरी बॉलचे उदाहरण आपल्याला घेता येऊ शकेल. एखाद्या समतल पृष्ठभागावर हे दोन्ही बॉल एकाच स्पीडने ढकलले असता, रबरी बॉलच्या तुलनेत क्रेझी बॉल जास्त लांबवर जातो.

या बॉलचा रोलिंग रेझिस्टन्स अत्यंत कमी असल्याने हे शक्य होऊ शकते. याप्रमाणेच टायर तयार करण्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल करून टायर आणि रस्त्याचा पृष्ठभाग यांच्यातले घर्षण कमी केले जात आहे.

लो रोलिंग रेझिस्टन्स टायरची वैशिष्ट्य

अॅडव्हान्स ट्रेंड : या टायरवरील नक्षी अर्थात ट्रेडचे डिझाईन रस्त्याशी होणारे घर्षण कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेले असते. त्यामुळे रस्त्यावरची पकड मजबूत राहते पण रस्त्यावर टायर घासल्यामुळे होणारा प्रतिरोध कमी होत असल्याने ऊर्जा कमी लागते.

स्पेशलाइज्ड रबर कंपाउंड : या टायरमध्ये स्पेशलाइज्ड रबर कंपाउंड वापरण्यात येतात. रस्त्याच्या पृष्ठभागाला टायरचा स्पर्श होतो तेव्हा गाडीचे वजन पडल्यामुळे टायरचा तेवढा भाग इतर भागापेक्षा अधिक दाबलेला असतो. यामुळे गाडी पुढे जाण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. मात्र या स्पेशलाइज्ड रबर कंपाउंडमुळे टायरवर कमी दाब येतो व त्यामुळे टायरची कार्यक्षमता वाढते.

हलके मटेरिअल : रोलिंग रेझिस्टन्स टायर तयार करताना गुणवत्तापूर्ण पण वजनाने तुलनेने खूपच हलके मटेरिअल वापरलेले असतात. त्यामुळेच टायरचे स्वतःचे वजनही नेहमीच्या टायरपेक्षा खूप कमी असते.

फायदे

वाढलेली कार्यक्षमता : लो रोलिंग रेझिस्टन्स टायरमुळे इंजिनाची कार्यक्षमता वाढल्याने गाडीचे मायलेज वाढते, ईव्हीच्या बाबतीत रेंज वाढते. या टायरमुळे वेगात सातत्य राखण्यासाठी वाहनांना कमी ऊर्जा लागते, परिणामी इंधनाचा कमी वापर होतो आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते.

टायरचे लाइफ : बदलेले डिझाईन आणि अॅडव्हान्स ट्रेंडमुळे पारंपरिक टायरच्या तुलनेत हे टायर जास्त किलोमीटर आणि कालावधीसाठी चालू शकतात. सतत टायर बदलण्याची वेळ येत नसल्याने वाहन मालकांचीही बचत होते.

भारतामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये पर्यावरणाचा प्राधान्याने विचार करण्यात येत असल्याने, लो रोलिंग रेझिस्टन्स टायरच्या उत्पादनासाठीही मोठ्या गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या लिमिटेड स्वरूपात काही ठरावीक कंपन्यांकडून या टायरची निर्मिती होत असली तरीही नजीकच्या भविष्यात आशा प्रकारच्या टायरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

बदललेली मानके

केंद्र सरकारच्या नियामक संस्थांनी कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत अधिक कठोर मापदंड आणि इंधन कार्यक्षमता मानके ठरवल्यामुळे ऑटोमेकरना पर्यावरणाला अनुकूल असे तंत्रज्ञान शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे लो रोलिंग रेझिस्टन्स टायरसारख्या टेक्नॉलॉजीला मूर्त स्वरूप मिळाले आहे.

पर्यावरणीय जागरूकता

भारतीय ग्राहकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता वाढत आहे. परिणामी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पार्ट तयार करणे आवश्यक ठरत आहे. इको कॉन्शन्स मानसिकता असलेले ग्राहक कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी अशा उत्पादनांकडे वळल्याने मागणीही वाढत आहे.

low rolling resistant tire
EV Loan : डाऊन पेमेंटची चिंता सोडा, सरकारी बँक देतेय इलेक्ट्रिक गाडीसाठी 100% लोन; जाणून घ्या डीटेल्स

विशेष प्रयत्नांची गरज

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये वाहनांसाठी लो रोलिंग रेझिस्टन्स टायरसारख्या पूरक उत्पादनांना चांगले भविष्य आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

जागरूकता अद्याप कमीच

आपल्या देशांमध्ये लो रोलिंग रेझिस्टन्स टायरविषयी अनभिज्ञता आहे. त्यामुळे ग्राहक पारंपारिक ट्यूबलेस टायर घेण्याकडेच जास्त वळतात. लो रोलिंग रेझिस्टन्स टायरचे फायदे, गुणवत्ता याविषयी ग्राहकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

जास्त किंमत

या टायरच्या निर्मितीत अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि मटेरियलचा वापर केलेला असल्याने या टायरचे लाइफही वाढलेले आहे. मात्र नेहमीच्या टायरच्या तुलनेत हे टायर महाग आहेत. हे टायर घेण्याची मानसिकता तयार होण्यासाठी याची किंमत परवडणारी असायला हवी, त्यादृष्टीने टायर उत्पादक कंपन्यांनी पावले उचलण्याची गरज जाणवते.

पायाभूत सुविधांची मर्यादा

लो रोलिंग रेझिस्टन्स टायर सिमेंटच्या किंवा डांबरी रस्त्यावरच योग्य परफॉर्मन्स देऊ शकतात. भारतामध्ये महामार्गांची अवस्था सुधारत असली तरी अद्यापही ग्रामीण किंवा निमशहरी भागातील रस्त्यांची स्थिती जेमतेमच आहे.

काही ठिकाणी तर रस्ते केवळ नावाला आहेत. अशा ठिकाणी या टायरच्या कार्यक्षमतेवर मर्यादा येत असल्याने पर्यावरणासाठी त्याचा फायदा होणे सध्यातरी अवघडच दिसते.

---------------------

low rolling resistant tire
Electronic Vehicle : खरोखरच किती फायदेशीर? ईव्ही घेण्याची योग्य वेळ आलीये का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com