तेरी 'सौ' टकिया की नोकरी में..

marriage
marriage esakal

केतकी जोशी

तेरी दो टकिया की नोकरी दी मेरा लाखो का सावन जाये... हे गाणं एकेकाळी चांगलंच गाजलं होतं. तो काळ होता नवऱ्याने पैसे कमावण्याचा आणि बायकोनं घर सांभाळण्याचा. कामाची अशी सरसकट वाटणी असायची. लग्नाच्या वेळेस तर मुलगी गृहकृत्यदक्ष हवी, नोकरी करणारी नको अशी स्पष्ट अटच असायची.

नंतरच्या काळात मात्र परिस्थिती बदलली आणि मग संसाराला हातभार लावण्यासाठी म्हणून बायकाही घराबाहेर पडून नोकरी करू लागल्या. तरीही चांगला पगार असलेल्या पुरुषांना आपल्या बायकोनं नोकरी करावी अशी गरज वाटत नव्हती. किंबहुना आपल्या बायकोची पैसे सोडून करिअरसाठीचीही काही महत्त्वाकांक्षा असू शकते, अशी नवरेमंडळींची तेव्हा मानसिकताही नव्हती.

त्यापुढच्या काळातही बायको अगदी उच्चशिक्षित असली तरी तिनं नोकरी केलीच पाहिजे, असा काही आग्रह नसायचा. उलट आपली पत्नी उच्चशिक्षित असूनही पूर्णवेळ गृहिणी आहे, हे सांगणंही अनेक नवऱ्यांना भूषणावह वाटत होतं. पण आता मात्र परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आता अगदी गलेलठ्ठ पगार असणाऱ्या पुरुषांनाही त्यांच्या बायकांनीही चांगली नोकरी करावी असं वाटू लागलं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे हे प्रमाण वाढतं आहे.

अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया २०२३’ या अहवालातून हा ट्रेंड समोर आला आहे. ज्या उच्चशिक्षित मुलींना पुढे चांगल्या संधी आहेत आणि उत्तम पगार मिळण्याची संधी आहे अशा मुलींना आणि उच्चशिक्षित, चांगला पगार असलेली उपवर मुले लग्नासाठी प्राधान्य देत असल्याचं, या अहवालात म्हटलं आहे. आपल्या पत्नीचीही नोकरी आपल्या बरोबरीची असावी, असं मानणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे.

आपल्याकडे बराच काळ घरातील पुरुष कमावता आणि जर आवश्यकता असेल तर त्याला हातभार म्हणून बायको अर्थार्जन करणार अशी विभागणी होती. तरीही ज्या घरातील पुरुषांचे उत्पन्न चांगले आहे, त्या घरातील बायका नोकरी करण्याची शक्यता कमीच होती.

आता मात्र, ग्रामीण भागात पुरुषांचे उत्पन्न वाढत असून हा ट्रेंड कमी झाला आहे, तर शहरी भागात ज्यांचे मासिक पगार साधारणपणे ४० हजार रुपयांपेक्षा जास्त आणि वाढते आहेत, त्यांच्याही पत्नी नोकरी करण्याची शक्यता जास्त असते, असं या अभ्यासातून समोर आलं आहे.

चांगले गलेलठ्ठ पगार असलेल्या नवऱ्यांनाही आपल्या पत्नीनं नोकरी करावी असं का वाटू लागलं आहे? सामाजिक प्रतिष्ठा हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे. पती जर उच्च पदावर काम करत असेल तर त्याची पत्नी उच्चशिक्षित असण्याबरोबरच तिचं स्वतःचं करिअर असणं हे सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारं आहे, असं समजलं जातं.

किंबहुना पत्नीही जर उच्चपदावर काम करणारी किंवा अगदी वेगळ्या क्षेत्रातील करिअर करणारी असावी, असं वाटणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. सामाजिक प्रतिष्ठेबरोबरच हल्लीची बदललेली मानसिकताही यामागील एक मुख्य कारण आहे. पत्नीचे शिक्षण, करिअर पतीप्रमाणेच असेल तर दोघांचे सूर जुळतात आणि जीवनशैलीही उंचावते, असंही दिसून आलं आहे.

घरातील कामांमध्ये पतीचा वाढत चाललेला सहभाग, आयुष्य सोपं करणारं तंत्रज्ञान आणि अनेक नवनव्या क्षेत्रांतील खुणावणाऱ्या नव्या संधी यांमुळेही बरेच बदल होत आहेत. आपल्या पत्नीच्या नोकरीलाही आपल्या नोकरीइतकंच महत्त्व देण्याचं प्रमाणही वाढत आहे. चांगल्या आयुष्यासाठी, मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आर्थिक स्थिती उत्तम हवी असेल तर तडजोड करून पत्नीच्या नोकरीला पाठिंबा देणारेही अनेक आहेत.

marriage
Working Women After Marriage : लग्नानंतर महिलांनी नोकरी का करावी?

याच अहवालातून आणखीही एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. सासू जर कमावती असेल तर त्या घरातील सून अधिक फॉर्मल जॉब शोधते, असा एक मुद्दाही या अहवालातून स्पष्ट करण्यात आला आहे. जर सासू आणि सून एकाच घरात राहात असतील आणि सासू स्वतः कमावती असेल, तर त्या घरातील सुनेने नोकरी करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात ५० टक्के तर शहरी भागांत ७० टक्के आहे.

ज्या घरात सासू नाही किंवा जिथे सासवा-सुना एकत्र एकाच घरात राहात नाहीत त्यापेक्षा हे प्रमाण कितीतरी जास्त आहे, असं हा अहवाल म्हणतो. थोडक्यात, सासू जर नोकरी करणारी असली तर ती सुनेला समजून घेऊ शकते आणि त्याचबरोबर सुनेनं नोकरी करण्याबाबत तिला आक्षेप असण्याची शक्यता कमी असते.

नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्यांवर काय धावपळ होऊ शकते हे सासूला समजलेलं असतं, त्यामुळे सुनेचं काम सोपं होतं. त्यामुळे ज्या घरांत सासूही नोकरी करणारी किंवा काही काम करणारी असेल त्या घरातील सुना नोकरी करण्याचं प्रमाण जास्त आढळतं.

marriage
Marriages Muhurta : शुभमंगल सावधान, २०२४ मध्ये ६६ विवाह मुहूर्त

हा अहवाल फक्त पती-पत्नीच्या नोकरी/ व्यवसाय करण्यावरच प्रकाश टाकतो असं नाही, तर महिलांचा रोजगार, नोकऱ्यांबाबत अनेक गोष्टी यातून स्पष्ट होतात. उदाहरणार्थ, कर्नाटक आणि राजस्थानातील ग्रामीण भागांत लग्नानंतर स्त्रिया कमावत्या होण्याचं प्रमाण वाढल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे.

यात प्रामुख्याने कृषी क्षेत्रात घरच्यांना मदत म्हणून काम करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. किंवा घरातील व्यवसायात मदत म्हणूनही काम करणाऱ्या स्त्रिया बऱ्याच आहेत.

कामाचा विचार केला तर भारतात बहुसंख्य स्त्रियांनी काम करण्याचा निर्णय हा त्यांनी एकट्याने घेतलेला निर्णय नसतो तर त्यामागे अनेक घटक असतात. उदाहरणार्थ, घरातील सदस्य- लग्नापूर्वी आईवडील तर लग्नानंतर नवरा आणि / किंवा सासूसासरे यांचं याबद्दलचं मत अत्यंत महत्त्वाचं असतं.

घरची आर्थिक परिस्थिती बरी असेल आणि घरातील बाईने नोकरी करण्यास घरच्यांचा विरोध असेल तर त्या बाईपुढची आव्हाने असंख्य असतात. त्यामुळे कुटुंबव्यवस्था, तिच्या मदतीसाठी असणारे घटक याचा तिच्या नोकरीच्या निर्णयावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम होतोच. दरवेळेस उच्चशिक्षित असून किंवा चांगलं करिअर असून किंवा चांगली संधी उपलब्ध असूनही तिला नोकरी करता येतेच असं नाही.

घरातील जबाबदाऱ्या, घरातील लोकांचे मिळणारे सहकार्य, त्यांची मानसिकता, जोडीदाराचा पाठिंबा या सगळ्याचा परिणाम एका स्त्रीच्या नोकरी करण्यावर होतोच. घरात चांगली सपोर्ट सिस्टीम असेल तर स्त्रियांचं नोकरी करणं अधिक सोपं होतं. उच्च पदावर काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढण्यासाठी, बाळंतपण किंवा अन्य कोणत्याही कारणाने नोकरीतून खूप मोठा काळ ब्रेक न घेण्यासाठीही ही सपोर्ट सिस्टीम खूप महत्त्वाची असते.

भारतात कमावत्या महिलांची संख्या, नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे, हे खरंच आहे. पण अनेकदा त्यामागील कारणे सकारात्मक नसतात, असं मत या अभ्यासातील एका प्राध्यापकांनी मांडलं आहे. म्हणजे काही वेळेस घरातल्या परिस्थितीमुळे बाईला अर्थार्जनासाठी बाहेर पडावं लागतं.

कोविड, लॉकडाउन यानंतर एकूणच रोजगारामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. आर्थिक मंदी, नुकसानीमुळे कित्येक महिलांच्या नोकऱ्या गेल्या. यातूनही अनेकजणींनी स्वयंरोजगाराची वाट शोधली.

घरातील पुरुष नोकरी करतो तेव्हा सगळं घर त्याच्यासोबत असतं, पण घरातील स्त्री जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडते तेव्हा तिच्याबरोबर सगळे असतातच असं नाही. अनेक अडथळे पार करत, अनेक आव्हानांना सामोरे जात जेव्हा एखादी स्त्री कमावण्यासाठी बाहेर पडते तेव्हा तिला अपेक्षा असते कुणीतरी ‘फक्त लढ ’ म्हणण्याची!

marriage
Working Women : लग्नानंतर महिलांनी नोकरी का सोडू नये ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com