

अनेक देशांमधील विशेषतः अमेरिकेतील जुनी भव्य रेल्वे स्थानके अनेक दशके ओस पडलेली होती. मात्र आता त्यांचा पुनर्वापर करून त्यांना संजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हे प्रयत्न रेल्वे प्रवासासाठी नसून त्या स्थानकांच्या भव्य इमारती आणि आजूबाजूच्या ओस पडलेल्या जमिनीचा वापर करून त्यांचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलांमध्ये केले जात आहे.
रेल्वेच्या शोधानंतर जगातील सर्व प्रदेशांमध्ये रेल्वेचे जाळे उभे राहिले. रेल्वेने प्रत्येक देशाचा भूगोल बदलला. निर्जन प्रदेशांमध्ये, जंगलांमध्ये, नद्यांवर, डोंगरातल्या दऱ्यांमध्ये रेल्वेचे रूळ टाकले गेले. त्यासाठी पूल बांधले गेले. डोंगर पोखरून बोगदे तयार झाले.
महानगरांमध्ये भव्य-देखणी रेल्वे स्थानके बांधली गेली. रेल्वेमुळे काही गावाशहरांमधल्या काही वस्त्या उखडल्या गेल्या, काही नव्याने घडायला लागल्या. गावागावांमध्ये रेल्वे स्थानके आणि फलाट बांधले गेले. स्थानकांच्या लहान-मोठ्या इमारती आल्या. हजारो लोकांची वाहतूक करण्यासाठी महानगरांमध्ये भव्य स्थानके निर्माण होऊ लागली.
लंडन ते ग्रीनवीच हा पहिला रेल्वे मार्ग १८३६ साली कार्यान्वित झाला. त्यापाठोपाठ लंडनमधून इंग्लंडमध्ये सर्व दिशांनी रेल्वे मार्गांचे जाळे विणले गेले. लंडनच्या मध्यभागी पहिले भव्य वॉटर्लू स्टेशन उभे राहिले. पाठोपाठ व्हिक्टोरिया स्टेशन आणि इतर अनेक स्थानके बांधली गेली. याच काळात (१८५३) भारतातही रेल्वे युगाची सुरुवात झाली. मुंबई येथे व्हिक्टोरिया टर्मिनसची (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –सीएसएमटी) भव्य देखणी वास्तू उभी राहिली.
रेल्वेने स्थानकांसाठी नावीन्यपूर्ण आणि विविध प्रकारच्या वास्तुशैली घडवायला मदत केली आणि आजही ती प्रथा चालू आहे. रेल्वे स्थानकांचे आकार, स्वरूप आणि बांधकामांची तंत्रे मात्र आता बदलत आहेत. मोटारींना पायघड्या घालण्यासाठी अमेरिकेत महामार्ग बांधले. काही रेल्वे मार्ग उखडून टाकले. भव्य स्थानके उजाड झाली.
अलीकडे अशा काही स्थानकांचे वेगळ्या प्रकारे पुनरुज्जीवन करण्याची लाट आली आहे. जागतिक व्यापारी केंद्राच्या उत्तुंग इमारती उद्ध्वस्त झाल्या. त्या इमारतींच्या खालून धावणाऱ्या भुयारी रेल्वेंसाठी आता अभिनव स्वरूपाचे स्थानक उभे राहिले आहे.
जगभरातील काही भव्य आणि देखण्या रेल्वे स्थानकांचा एक धावता आढावा घ्यायचा म्हटला तर काही स्थानकांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो.
जगामधील भव्य रेल्वे स्थानकांच्या यादीमध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे (सीएसएमटी -पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस –व्हीटी) नाव घेतले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या इमारतीचा समावेश झाला आहे.
१८८८मध्ये बांधलेल्या गॉथिक शैलीतल्या या भव्य आणि देखण्या इमारतीची रचना स्टीव्हन्स ह्या ब्रिटिश वास्तुरचनाकाराने केली होती. रेल्वेमुळे भारतामधील जातीय-धार्मिक विभागणीच्या परंपरांना छेद दिला गेला होता म्हणूनच बहुतेक ही वास्तू ‘सेक्युलर कॅथेड्रल’, ‘सर्वधर्म मंदिर’ म्हणून नावाजली गेली होती.
कित्येक दशके लाखो मुंबईकर या भव्य, देखण्या वास्तूशी जोडलेले आहेत. मुंबई दर्शन करणारे पर्यटकही ह्या देखण्या वास्तूच्या आठवणी बरोबर नेल्याशिवाय राहात नाहीत.
न्यूयॉर्कच्या मध्यवर्ती भागातील ग्रँड सेंट्रल रेल्वे स्थानकाची, १९१३ साली बांधलेली वास्तूही अशीच भव्य, देखणी आणि आठवणींमधून कधीही न पुसली जाणारी अशी आहे.
तिचे जमिनीवरील स्वरूप गेल्या शंभर वर्षांमध्ये फारसे बदलले नसले तरी त्या वास्तूखालील रेल्वेचे मार्ग, फलाटांची संख्या आणि प्रवाशांची वर्दळ सभोवतालच्या महानगरी प्रदेशाबरोबर वाढत गेली आहे. जहाज आणि रेल्वेच्या उद्योगातून गडगंज पैसे कमावलेल्या वोन्डररबिल्ट नावाच्या कोट्यधिशाने ह्या स्थानकाची सौंदर्यपूर्ण वास्तू बांधली.
ह्या इमारतीमध्ये अनेक कलाकारांच्या अभिव्यक्तीला खास स्थान आणि अवकाश उपलब्ध करून दिला आहे. केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नाही तर उद्योजकाच्या मोठेपणाची जाहिरात म्हणून बांधली गेलेली ही वास्तू आज मध्यवर्ती न्यू यॉर्कची आणि नागरिकांची शान झाली आहे.
रेल्वे स्थानकाबरोबरच न्यू यॉर्क शहरातील अन्य अनेक कामांसाठी, मनोरंजनासाठीही ही वास्तू वापरली जाते. मुख्य दालनाच्या उंच छतावर केलेल्या कलाकृतींच्या खाली आजही नृत्याचे कार्यक्रम होतात.
आजूबाजूच्या वरच्या मजल्यांवर कार्यालये आहेत तर खालच्या मजल्यावर खाद्यसेवा आणि मोठी प्रसाधनगृहे आहेत. त्याखाली १४ मजले जमिनीच्या पोटात असून तेथे बहुमजली रेल्वेमार्ग एकमेकांना छेद देत, एकमेकांच्या डोक्यावरून वाहतूक करण्यासाठी, रेल्वे फलाटांसाठी बांधले आहेत.
विशेष म्हणजे अलीकडेच ह्या मध्यवर्ती स्टेशनचा जमिनीखाली विस्तार करून तेथे पोहोचण्यासाठी सरकते जिने बसवले आहेत. ह्या स्थानकाची वाढ आणि सातत्याने झालेला विस्तार, त्यामध्ये आलेली अभियांत्रिकी आव्हाने हा एका संपूर्ण पुस्तकाचा विषय होऊ शकेल.
अभियांत्रिकी तंत्रज्ञान विकासाच्या, कलाकृतींच्या विविध कथा अद््भुत आहेत. न्यू यॉर्क मधल्या मध्यवर्ती भागातल्या उत्तुंग इमारती सहजपणे नजरेत भरतात. ह्या महानगरात रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी आणि पादचाऱ्यांची संख्या जास्त असते.
कारण दूरच्या उपनगरातून किंवा शहरांमधून न्यू यॉर्कला येणारे कर्मचारी, प्रवासी भुयारी रेल्वे आणि मेट्रोच्या जाळ्यामुळे जमिनीवर न येताच सर्व शहरभर वेगाने संचार करू शकतात. न्यू यॉर्कचे जमिनीवरील दर्शन जितके डोळ्यात भरते तितकेच त्या शहराच्या जमिनीखालील सेवा-सुविधा, त्यांच्या व्यवस्थापन यंत्रणा अचंबित करतात.
न्यूयॉर्कमधील जागतिक व्यापार केंद्राच्या दोन उत्तुंग इमारतींवर २००१मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्या इमारतींच्या खालचे भुयारी स्टेशनही उद्ध्वस्त झाले होते. आज त्या ठिकाणी एक नवीन, अभिनव बांधणीचे स्थानक उभे राहिले आहे. त्या स्थानकाच्या पुनरुज्जीवनाचे आणि पुनर्बांधणीचे श्रेय तेथील प्रशासकीय रचना, राजकीय इच्छाशक्ती आणि मुख्य म्हणजे शहराच्या प्रति असलेली बांधिलकी आणि प्रेम ह्यांना द्यावे लागेल.
वर्ल्ड ट्रेड सेन्टर ट्रान्सपोर्ट हब असे ह्या नव्या स्टेशनचे नाव आहे. न्यू यॉर्क शहर पैशानेच केवळ श्रीमंत नाही तर अनेक दृष्टीने कसे समृद्ध आणि सौंदर्योपासक आहे, अभिनवतेचा, नावीन्याचा ध्यास घेतलेले आहे ह्याचे दर्शन ह्या नावीन्यपूर्ण, भव्य आणि अत्याधुनिक वास्तूमुळे अधोरेखित झाले आहे.
न्यू यॉर्क महानगरातले जुने ग्रँड सेंट्रल स्टेशन दगडी बांधकामाचे आहे तर नवे स्थानक नव्या प्रकारच्या काँक्रिटच्या रचनेचे आहे. निमुळत्या, कमानदार, उंच तुळयांच्या मधील फटींमधून झिरपणारा प्रकाश ह्या वास्तूच्या आता झिरपतो. त्या भव्य दालनाचे शुभ्र पांढऱ्या रंगात न्हाऊन निघणारे अवकाश विशाल आहे.
मात्र ही इमारत कोणत्याही कलाकुसरींपासून फटकून राहणारी आहे. एक प्रकारे ग्रँड सेंट्रल स्थानकाच्या पूर्णतः वेगळ्या प्रकारच्या रचनेमुळे ह्या स्थानकाचे वेगळेपण उठून दिसते. आंतर्बाह्य अभिनव आकार असलेली ही इमारत साधेपणातील सौंदर्याचे भान देते. सान्तियागो कॅलट्रावा ह्या युरोपमधील वास्तुरचनाकाराने त्याची अभिकल्पना केली आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये रेल्वे आणि भुयारी स्थानके बांधण्याची एकच लाट उसळली होती. रेल्वे मार्ग उभारण्यासाठी भांडवलदार आणि गुंतवणूकदारांचा पुढाकार होता. रेल्वेमुळे माल वाहतूक स्वस्त आणि जलद होते हे लक्षात आल्यामुळे त्यात नफा कमावण्याच्या संधी साधण्यासाठी अनेक भांडवलदार पुढे आले होते. याच काळात रशियामध्येही रेल्वेचे जाळे उभारण्यात तेथील झारने मोठा रस घेतला होता.
मॉस्को आणि पिट्सबर्ग ह्या दोन शहरांमध्ये भव्य, राजेशाही थाटाची रेल्वे स्थानके बांधली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला (१९१७) तेथे साम्यवादी क्रांती झाली. राजेशाही उलथली जाऊन कामगारांचे राज्य प्रस्थापित झाले. रेल्वेसेवा सार्वजनिक मालकीची झाली.
युरोप आणि अमेरिकेतील भांडवलशाही देशातील रेल्वे स्थानकांच्या भव्यतेशी स्पर्धा म्हणून साम्यवादी क्रांतीनंतर सोव्हिएत युनियनच्या राजधानीमध्ये, मॉस्कोमध्ये भुयारी रेल्वे बांधण्याचा आणि त्यासाठी स्थानके उभारण्याचा मोठा भव्य प्रकल्प शासनाने हाती घेतला.
त्यावेळी तेथील प्रत्येक रेल्वे स्थानक कलादालनाच्या स्वरूपात बांधण्यात आले. त्या सर्व कलाविष्कारांमध्ये साम्यवादी शासनाचे यश दाखविण्याचा हेतू होता. चित्रकार, शिल्पकारांना पाचारण केले गेले.
१९३५ ते १९५५ ह्या काळात बांधलेल्या भुयारी रेल्वे स्थानकाच्या भिंती, कमानी, छत हे सर्व सुशोभित करण्याचा अट्टाहास होता. यासाठी दुर्मीळ आणि महाग रंगीत दगड वापरण्यात आले. तेथील स्टेन ग्लासच्या भिंतीमधील रंगीत तावदानांमध्ये, चित्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विषयांना स्थान नव्हते.
राजवाड्यांच्या भव्यतेशी आणि सौंदर्याशी स्पर्धा करणाऱ्या मॉस्कोच्या भुयारी रेल्वेकडे केवळ प्रवासी साधन-सेवा म्हणून बघितले जात नव्हते, तर भुयारी रेल्वे ‘पॅलेस ऑफ द पीपल’, म्हणजे लोकांचे राजवाडे म्हणून ओळखली जाऊ लागली.
जमिनीखाली खोलवर असलेली भुयारे खोदण्यासाठी नवीन यंत्रे, तंत्रे वापरात आली. त्यासाठी शासनाने पैशाचे पाठबळ तर दिलेच पण त्या प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून सातत्याने प्रचारही केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ह्या स्थानकांनी बॉम्ब विरोधी आसरे पुरवून लोकांचे जीवही वाचवले.
मॉस्कोची भुयारी रेल्वे स्थानके आजही अद्भुत वाटतात. जगभरातून मॉस्कोला भेट देणारे पर्यटक या स्थानकांतून रेल्वेने प्रवास केल्याशिवाय परत जात नाहीत. स्पेनची राजधानी माद्रिदमधील अटोचा रेल्वे स्थानक उभारले गेले १८५१मध्ये. नंतर आग लागून ते नष्ट झाल्यावर लोखंडी कमानी असलेले एक भव्य, लांब, रुंद, उंच स्थानक पॅरिसच्या आयफेल ह्या प्रसिद्ध रचनाकाराची मदत घेऊन बांधले गेले. ते आजही कार्यरत आहे.
मात्र आता स्थानकाच्या मोठ्या दालनाचे एका मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. प्रवाशांच्या बरोबरच तेथे खरेदीदारांचीही वर्दळ असते. मध्यभागी मोठा, एक एकर क्षेत्रफळाचा आकर्षक बगीचा काचेच्या छताखाली तयार केला आहे. दर्शनी भागात मोठी कमान असलेल्या ह्या जुन्या स्थानकाचे आतील नवीन हरित स्वरूप विलक्षण आकर्षक आहे.
नवी, अभिनव रेल्वे स्थानके आणि
जुन्या स्थानकांचे नावीन्यपूर्ण पुनरुज्जीवन
युरोपमधील अनेक रेल्वे स्थानके आता दीडशे वर्षांपेक्षा जास्त जुनी झाली आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा विस्तार करून त्यांना नवा साज दिला जात आहे. लंडनमधील किंग्ज स्टेशनच्या बाहेर आकर्षक छत निर्माण करून त्या खाली तिकीट घर, दुकाने, आणि प्रवासी सेवांची तजवीज केली आहे. लिस्बन येथील पूर्वीच्या जुन्या स्टेशनला, लिस्बन गार द इस्टला, कॅलट्रावा ह्या वास्तुकाराने एक वेगळेच स्वरूप दिले आहे.
अनेक स्थानके पूर्णपणे पाडून नव्या पद्धतीने बांधली आहेत. ऑस्ट्रियामधील एक स्थानक फाह हदीद हिच्या विलक्षण कल्पनेतून साकारले आहे. निसर्गातल्या रचनांपासून स्फूर्ती घेऊन इमारतींचे आकार निर्माण करणे हे फाह हदीद ह्या इराणी-ब्रिटिश वास्तू रचनाकाराचे कौशल्य बांधकामाच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. उंच चढणीच्या डोंगरावर जाणाऱ्या फनीक्युलर रेल्वेसाठी ऑस्ट्रियामध्ये शिंपल्याच्या आकाराच्या स्थानकाची रचना तिने केली आहे.
हॉलंडमधील रोटरडॅम येथील रेल्वे स्थानकात जाण्याचा योग्य आला तेव्हा पुनरुज्जीवनकामाचे वेगळेच अत्याधुनिक स्वरूप तेथे बघायला मिळाले. उंच उतरत्या छपरावर अनेक सोलर पॅनल बसवून तेथे मोठ्या प्रमाणात वीज तयार केली जाते आहे.
स्थानकाच्या तळघरात लाखो सायकलींसाठी पार्किंग दालन बांधले आहे. ह्या रेल्वेच्या परिसरात मोटारींना मज्जाव असून केवळ चालत, सायकल किंवा बसने स्थानकाजवळ जात येते. अर्धा किलोमीटर अंतरावर असलेला वाहनतळ भुयारी मार्गाने जोडला आहे.
अमेरिकेतील स्थानकांचा पुनर्जन्म
उत्तर अमेरिका सोडल्यास बहुतेक सर्व मोठ्या देशांमध्ये शंभर-दीडशे वर्षांपूर्वीपासून कार्यरत असलेल्या रेल्वेची सेवा लोकप्रिय आहे. युरोपमध्ये रेल्वेच्या पायाभूत सेवा सुधारून त्यावर आता वेगवान रेल्वे गाड्या धावतात. जपान आणि चीनमध्ये बुलेट ट्रेन सेवा आणि स्थानके नव्याने सज्ज केली जात आहेत.
अमेरिका मात्र रेल्वेच्या विस्तारात आणि विकासात जगाच्या खूप मागे पडली आहे. अमेरिकेतील प्रदेशांना जोडणारे जुने रेल्वेचे जाळे गेल्या पन्नास वर्षांपासून अनेक ठिकाणी उखडून टाकण्यात आले आहे. मोटारउद्योग, पेट्रोलियम इंधनाचा वापर आणि विमानकंपन्या वाढविण्याच्या दबावाखाली तेथील रेल्वेची प्रवासी सेवा पद्धतशीरपणे संपविण्यात आली. न्यू यॉर्क, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट अशी काही जुनी महाशहरे त्याला अपवाद आहेत.
तेथील भव्य स्थानके अनेक दशके ओस पडलेली होती. मात्र आता त्यांचा पुनर्वापर करून त्यांना संजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ते रेल्वे प्रवाशांसाठी नसून त्या स्थानकांच्या भव्य इमारती आणि आजूबाजूच्या ओस पडलेल्या जमिनीचा वापर करून त्यांचे रूपांतर पंचतारांकित हॉटेलांमध्ये केले जात आहे.
सेंट लुई येथील १८९४मध्ये बांधलेले आणि सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेल्या युनियन स्टेशनमधून १९८५मध्ये शेवटची गाडी निघाली आणि स्टेशन बंद झाले. आज त्या ठिकाणी ५०० खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल आहे. रेल्वेच्या जुन्या पद्धतीच्या कमानी आणि उंच छत असलेले लांब-रुंद दालन आता पंचतारांकित स्वागत कक्षासाठी सजवले आहे.
आजूबाजूला म्युझियम, मत्स्यालय आणि करमणुकीच्या जागा तयार झाल्यामुळे तेथे पुन्हा एकदा माणसांची वर्दळ सुरू झाली आहे. इंडियानापोलिस येथील जुन्या स्टेशनमध्ये हॉटेलचे प्रतिक्षा दालन आहे. मात्र तेथे इमारतींमधील खोल्या नसून रेल्वेच्या डब्यांमध्येच राहण्याच्या खोल्या तयार केल्या आहेत. तेथील बाजूच्या रेल्वे लाइनवरून आजही गाड्या धावतात. एकंदरीत अशी अनेक रेल्वे स्थानके केवळ नावापुरतीच उरली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.