झांबळ: मानवी भाव-भावनांच्या खेळाचं मनोहारी चित्रण

गावरान बाजाच्या त्यांच्या लेखनशैलीतून, कथनशैलीतून साकारलेलं घनदाट माणसाचं हे भावविश्व त्या त्या माणसाच्या आयुष्यातील, भवतलातील घटनांचा साक्षीदार होण्याची अनुभूती वाचकाला घरबसल्या देतं. असा हा झांबळ कथासंग्रह प्रत्येकानं वाचायलाच हवा.
human emotion
human emotion esakal

माणसांच्या स्वभावविशेषांचं मंथन करताना त्यांच्या सद्‍गुणांबरोबरच त्यांचे अवगुण, त्यांच्या आजूबाजूच्या परिघात असणारी प्रत्येक गोष्ट आणि तिचा त्या त्या व्यक्तीवर होणारा परिणाम या सगळ्याचा अचूक वेध समीर गायकवाड यांनी झांबळमध्ये घेतला आहे.

छाया काविरे

भेटलेली माणसे घनदाट होती!

थेट पोचायास कोठे वाट होती?

भेटलेल्या माणसांचं असं वर्णन कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी करून ठेवलेलं आहे. समीर गायकवाड यांच्या झांबळ या कथासंग्रहातूनही अशीच घनदाट माणसं भेटत राहतात व वाचकाला त्यांच्या अंतरंगात आणि भवतालात घेऊन जातात.

‘झांबळ’ हा शब्द मूळचा ज्ञानेश्वरीतला आहे. शीर्षकासाठी गायकवाड यांनी तो चपखलपणे वापरला आहे. झांबळ याचा अर्थ रात्री चालणारा छाया-प्रकाशाचा, उजेड-सावल्यांचा खेळ. मानवी भाव-भावनांच्या अशाच खेळाचं मनोहारी चित्रण गायकवाड यांच्या या कथासंग्रहात वाचायला मिळतं. त्या अर्थानं कथासंग्रहाचं नाव अन्वर्थक आहे.

झांबळमध्ये बावीस कथा आहेत. यातल्या बहुतांश कथा ग्रामीण पार्श्वभूमीच्या असल्याची झलक गायकवाड यांनी प्रारंभी व्यक्त केलेल्या मनोगतामधूनच मिळते. शहरातल्या तापलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांवरून ते आपल्याला एकदम थेट गावातल्या वातावरणात घेऊन जातात व तिथल्या मातीचा सुगंध आपल्या आसपास जणू काही दरवळू लागतो.

या कथा घडत असतात आपल्याच परिसरात; मात्र हा कथासंग्रह वाचेपर्यंत त्याबाबत आपण अनभिज्ञच असतो. मात्र, वाचायला सुरुवात केली की एक वेगळंच जग आपल्यापुढं उलगडत जातं. या कथाविश्वातली माणसं कशी आहेत? निरागसही आहेत अन् रंगेलही!

भोळी-भाबडीही आहेत अन् चलाखही, तर काही माणसं आहेत समाजजीवनातील दीपस्तंभ! शिवाय, यात काही माहेरवाशिणी आहेत, काही सासुरवाशिणीही आहेत, तसंच जनावरं, पाळीव प्राणी त्यांचे भावबंधही या कथाविश्वात आहेत.

माणसांच्या अशा नाना प्रकारांबरोबरच गाव, शिवार, वाटा, पायवाटा, पाणंदी, गाडीवाटा, हाय वे, गोठे, माळरानं, मळे, झोपड्या, घरं, वाडे, गढ्या असं भौगोलिक पर्यावरणही या कथांमधून एकदम सजीव होऊन वाचकाला सामोरं येतं. गायकवाड यांनी माणसांचे आणि भवतालाचे असे भावबंध मोठ्या ताकदीनं टिपले आहेत.

कथांमधून वर्णिलेल्या गावांतल्या प्रेमळ, आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या माणसांशी आपल्याही नकळत आपली दोस्ती होऊन जाते. या कथा जणू काही आपणच अनुभवत आहोत इतकी त्या त्या कथावस्तूशी वाचकाला एकरूप करण्याची ताकद गायकवाड ह्यांच्या कथनशैलीत आहे.

म्हणजे असं, की कथेतील एखाद्या पात्राचा मृत्यू झाल्यावर आपल्या जवळचंच कुणी गेल्यासारखं वाटून डोळ्यांच्या कडा ओलावतात; तर कधी कथेतला नायक किंवा नायिका जेव्हा खंबीर होऊन परिस्थितीला भिडते, तेव्हा तो संघर्ष आपलाच आहे असं जणू वाटून जातं.

माणसं घनदाट असणं म्हणजे नेमकं काय? तर त्यांच्या मनाचा सहजासहजी थांग न लागणं. ज्यांच्या अंतरंगाचा ठाव बाहेरून लागणं कठीण, अशी किती तरी माणसं झांबळमध्ये भेटतात. अशा घनदाट माणसांच्या या कथांमधील पात्रांच्या भावविश्वात वाचक स्वतःच्याही भावविश्वाचा शोध नकळत घेऊ लागतो.

human emotion
Farsi Language Course : पुणे विद्यापीठात फारसी भाषेचा अभ्यासक्रम सुरू

या कथांमधल्या पात्रांमध्ये मानवी जीवनमूल्यांवर अफाट विश्वास असलेला दिसतो. ही माणसं प्रचंड बळकट आणि खंबीर भासतात. अशी आपल्याला धीर देणारी, आपल्यावर जीव ओतून प्रेम करणारी, आपल्याला सांभाळून घेणारी माणसं आपल्याही सभोवताली असतात; पण त्यांना ओळखण्यात काही वेळा आपण कमी पडतो, याची जाणीव आपल्याला उशिरा होते.

मात्र, तोपर्यंत ही माणसं त्यांच्या नवीन प्रवासाला दूरवर निघून गेलेली असतात आणि तो प्रवास इतका दाटीवाटीचा असतो, की त्यातून आपला माणूस जरी आपल्याला दिसत असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग लोकांच्या गर्दीने दाटून गेलेला असतो.

पाच रुपयाची नोट या कथेतील बापाला पोराचं आजारपण दूर करण्यासाठी आयुष्यभरातली सगळी बचत खर्ची घालावी लागते.

फाटक्या नशिबाचा हा बाप एकदा पोराला वडापाव खायला खिशातून दहा रुपयांची नोट देतो, तेव्हा पोरगा बापाच्या खिशाचं दारिद्र्य ओळखून त्यातले पाच रुपये परत करतो आणि म्हणतो, ‘आई आल्यावर तिला द्या.’ तेव्हा, ‘नात्याच्या दृष्टीनं जगातले सर्वांत श्रीमंत आपणच’ असा भाव या बापाच्या चेहऱ्यावर दिसतो.

एका शिक्षकाच्या जीवनावर आधारलेली झांबळ ही शीर्षककथा... लहान लेकरांना पोटाशी कवटाळून विहिरीत जीव देणाऱ्या नायिकेच्या रूपानं ग्रामीण भागातील महिलांची होरपळ दाखवणारी बकुळा ही कथा...

लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्यावर - म्हणजे काळू नावाच्या कुत्र्याच्या जीवनावर - आधारलेली चित्र्या ही कथा... जमिनीच्या मालकी हक्कावरून घडलेला घटनाक्रम शब्दबद्ध करणारी पिंपळसमाधी ही कथा...

एका साध्यासुध्या अश्राप जिवाच्या होरपळीचं चित्रण करणारी निरागस ही कथा... शेतकऱ्याच्या मनातल्या अवस्थेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गणगोत, सायब्या आणि जिवलग या कथा... अशा या साऱ्याच कथांमधून वेदना, दुःख, आनंद, सुख अशा विविधरंगी भाव-भावनांचा कॅलिडोस्कोप आपल्यापुढे उलगडतो.

human emotion
Marathi Language University : भाषेच्या रक्षण-संवर्धनासाठी विद्यापीठ

यातील झिपरीचा माळ ही कथा वेगवेगळ्या घटना एकत्रित करून लिहिलेली आहे. कथेतला माळ म्हणजे लेखकाच्या गावातीलच एक ठिकाण आहे.

सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना यात आहेत. साधी माणसं, त्यांचं जगणं आणि त्या जगण्याविषयीची त्यांची मूल्यं यांचं चित्रण या कथेतून वाचायला मिळतं.

सुभान्या ही कथा वाचताना एखाद्या थ्री-डी चित्रपटाचं चित्रणच आपण पाहत आहोत की काय, असं वाटावं इतकी ही कथा चित्रदर्शी उतरली आहे.

ही कथा मनाला अगदी भिडते. डोळ्यांत कणव, आवाजात मार्दव आणि इतरांच्या मदतीला सदैव तत्पर अशी लोचनाबाई ऊर्फ गावाची नानीबाई या कथेत भेटते. तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्याविषयी आपलुकी वाटू लागते.

मुलगी शेवंता वारल्याचं दुःख आई या नात्यानं लोचनाबाईला तर होतंच होतं; पण आपलं दुःख मागं सारून ती खचलेल्या नवऱ्याला सावरण्यासाठी पुढं सरसावते. आता आपणच कंबर कसून त्याच्या मागं उभं राहायला पाहिजे, हे तिला जाणवतं व शेवंताचं दुःख पचवायला ती नवऱ्याला मदत करते.

‘सुभान्या’ म्हणजे गोविंद भोसल्यांच्या ‘करवंदी’ या गाईचं

खोंड. भोसले कुटुंबीयांनी सुभान्याला घरातल्या पोराप्रमाणे जीव लावत वाढवलेलं असतं. त्याच्या सर्वात जिवलग असलेल्या शेवंताचं जेव्हा लग्न होत तेव्हा सुभान्या कावराबावरा होतो. जेवणखाण सोडतो. तो हडाडू लागतो. त्याची कातडी पाठीला चिकटते,

बरगड्या बाहेर येतात, डोळे मोठे होतात, डोळ्यांमधून सतत पाणी वाहू लागतं. त्याभोवती घोंघावणाऱ्या माशा वारण्याचंही त्याला भान उरत नाही. तोंडातून सतत फेस येत राहतो...

थोडक्यात, शेवंताच्या विरहानं सुभान्या असा मरणासन्न स्थितीत पोहोचतो. मात्र, जेव्हा मन हलकं करण्यासाठी माहेरी आलेली शेवंता आपल्या जिवलग सुभान्याला सासरच्या जाचाबद्दल सांगते, तेव्हा सुभान्याच्याही डोळ्यांमधून जणू अश्रू तरळतात.

सासरच्या जाचाला कंटाळून शेवंता धुळवडीच्या दिवशी आत्महत्या करते तेव्हा, आपल्याला जीव लावणारी मायाळू शेवंता जग सोडून गेली आहे, असं इकडं सुभान्यालाही जणू काही जाणवतं आणि तोही त्याच दिवशी जीव सोडतो! प्राणी आणि माणूस यांच्यातील विलक्षण नातं दर्शवणारी अशी ही कथा आहे.

human emotion
Pune Book Mahotsav : शांतता.... पुणेकर वाचत आहेत

गायकवाड यांच्या कथेतील ही माणसं, ही पात्रं चराचराला जीव लावतात आणि जिवावर उदार होऊन जगत काळाच्या ओघात लुप्त होऊन जातात. या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. यातील प्रत्येक पात्र स्मरणात राहतं. पुस्तक वाचून संपल्यानंतरही ही पात्रं किती तरी दिवस पिच्छा पुरवत राहतात. अशी पात्रं आपल्याही आसपास आहेत का याचा शोध घ्यायचा प्रयत्न आपण करत राहतो.

हा शोध घेताना कधी मनात काहूर दाटतं, हुरहूर लागते... जिवाची उलघाल होते, तगमग होते व डोळ्यांच्या कडा आपसूकच ओलावतात.

माणसांच्या स्वभावविशेषांचं मंथन करताना त्यांच्या सद्‍गुणांबरोबरच त्यांचे अवगुण, त्यांच्या आजूबाजूच्या परिघात असणारी प्रत्येक गोष्ट आणि तिचा त्या त्या व्यक्तीवर होणारा परिणाम या सगळ्याचा अचूक वेध गायकवाड यांनी घेतला आहे.

गावरान बाजाच्या त्यांच्या लेखनशैलीतून, कथनशैलीतून साकारलेलं घनदाट माणसाचं हे भावविश्व त्या त्या माणसाच्या आयुष्यातील, भवतलातील घटनांचा साक्षीदार होण्याची अनुभूती वाचकाला घरबसल्या देतं. असा हा झांबळ कथासंग्रह प्रत्येकानं वाचायलाच हवा.

झांबळ

लेखक : समीर गायकवाड

प्रकाशन : मनोविकास प्रकाशन, पुणे

किंमत : ₹ २८०

पाने ः १९६

------------------------

human emotion
Guinness Book Of Records : सर्वात जास्त चोरीला जाणारं पुस्तक म्हणून गिनीज बुकचीच नोंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com