

Indian Cricket Team ICC Dominance
esakal
किशोर पेटकर
झटपट क्रिकेटमधील भारताची सध्याची कामगिरी पाहता, टीम इंडियाच ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या दौडीत अग्रस्थानी आहे. लॉस एंजलिस ऑलिंपिक जुलै २०२८मध्ये होईल. त्याच वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकात जेतेपदाचा मुकुट राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.
भारतीय क्रिकेट संघाने सर्वप्रथम विश्वविजेतेपदाचा जल्लोष केला ते वर्ष होते १९८३. त्यानंतर पुन्हा जगज्जेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी देशवासीयांना २४ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडकास गवसणी घातली. क्रिकेटमधील या अतिझटपट प्रकारात भारतीय संघ तेव्हा नवखाच होता, तसेच देशात या क्रिकेटची पाळेमुळे खोलवर रुजली नव्हती. २००८मध्ये आयपीएल सुरू झाले आणि केवळ भारतीयच नव्हे, तर जागतिक क्रिकेट ढवळून निघाले.