
जी.पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा कधीच न संपणारा विषय. चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत तरीही सतत तो कशावरून तरी बातमीत असतोच. जगभरातील कोणत्याही भाषेतील चित्रपटापेक्षा ‘शोले’वर सातत्याने सर्वाधिक वेळा लिहिले, वाचले, बोलले, ऐकले आणि सांगितले गेले आहे. त्यात सोशल मीडियावर रील्सही आणि मिम्सदेखील. इतकं त्याचं कौतुक करण्याइतका काही हा चित्रपट दर्जेदार (क्लासिक या अर्थाने) वा भारी (साॅलीड या अर्थाने) नाही, असे सांगणारेही ‘शोले’ प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासूनच आहेत. मिनर्व्हा चित्रपटगृहातील ‘शोले’चा फर्स्ट डे फर्स्ट शो’चा रिपोर्ट मिश्रच होता. लंबी है, बोअर करती है, सिर्फ खून खराबा है, इतका काही खास नाही... वगैरे वगैरे. पिक्चर पडला असाच सूर होता. दोनच आठवड्यांत वारं असं काही फिरलं की आजही त्याचं अस्तित्व कायमच आहे.