

Global Geopolitics
esakal
दिवाकर देशपांडे - diwakardeshpande@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ‘जी-२’ ही संकल्पना मांडून जगाचे व्यवस्थापन अमेरिका व चीन या दोन देशांनीच करावे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना सुचवले होते... पण आश्चर्याची गोष्ट अशी, की चीनने ही संकल्पना तत्काळ फेटाळली व ती अव्यवहार्य असल्याचे स्पष्ट केले.
खरे तर ‘जी-२’ ही संकल्पना तशी नवी नाही. यापूर्वी २००५ मध्ये ती प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सी. फ्रेड बर्गस्टन यांनी मांडली होती. त्यांनी अमेरिका व चीन या जगातल्या दोन सर्वांत बड्या देशांनी जागतिक व्यापार, सुरक्षा, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेत समन्वय घडवून आणावा, यासाठी ही संकल्पना सुचवली होती. त्यांनी असेही सुचवले होते, की एकंदरच जागतिक व्यवस्थेचे व्यवस्थापन या दोन देशांनी करावे व त्यांना युरोपीय युनियन, भारत, जपान आदी देशांनी साथ द्यावी. हीच संकल्पना आता अध्यक्ष ट्रम्प पुनरुज्जीवित करू पाहत आहेत; पण त्यांचा हेतू फ्रेड बर्गस्टन यांच्यासारखा शुद्ध नाही. ट्रम्प यांनी त्यांच्या नववसाहतवादी दृष्टिकोनातून ही संकल्पना सुचवली आहे. ट्रम्प यांना जागतिक व्यवस्थेवर खरे तर एकट्या अमेरिकेचे वर्चस्व हवे आहे. संपूर्ण जागतिक व्यवस्था त्यांना अमेरिकेच्या स्वार्थासाठी राबवायची आहे; पण त्यात सर्वात मोठा अडथळा चीन आणि रशियाचा आहे. हे अडथळे दूर करणे अमेरिकेसाठी खूप अवघड आहे. ट्रम्प यांची सर्व धडपड ही चीन व रशियात फूट पाडण्यासाठी चालली आहे.