

Rupee Depreciation Causes
esakal
रुपया घसरतोय, ही बातमी आपण ऐकतो आणि नकळत मनात एक भीती निर्माण होते. आपण काहीतरी चुकीच्या दिशेने जातो आहोत का? परंतु, अर्थव्यवस्था ही सरळ रेषेत चालणारी गोष्ट नाही. अनेक वेळा जे वरून नकारात्मक दिसते, त्यामध्येच पुढच्या वाढीची बीजं दडलेली असतात. रुपयाची घसरण हा तसाच एक विषय आहे. म्हणूनच हा प्रश्न बदलून रुपया का घसरतोय यापेक्षा, या घसरणीतून भारताला काय मिळतंय, या दृष्टीने बघणे गरजेचे आहे.
जगात युद्ध, आर्थिक ताण, व्याजदरातील बदल, अनिश्चितता निर्माण झाली, की मोठे गुंतवणूकदार सर्वप्रथम सुरक्षिततेचा विचार करतात. ‘पैसा कुठे ठेवला, तर तो सुरक्षित राहील?’ हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. आजच्या घडीला या प्रश्नाचे
सर्वांत सोपे उत्तर म्हणजे अमेरिकी डॉलर. यामागे केवळ भावना नाही, तर आर्थिक रचना आहे. आजही अमेरिकेचा रोखे बाजार हा जगातील सर्वांत मोठा आणि सर्वाधिक व्यवहारक्षम (लिक्विड) मानला जातो. मोठ्या प्रमाणात पैसा हलविण्यासाठी तो सर्वांत सोयीचा पर्याय आहे. मात्र, अलीकडच्या काळात व्यवहारक्षमतेबाबत आणि वाढत्या कर्जामुळे काही प्रश्न निर्माण झाले असले, तरी पर्यायी व्यवस्था अद्याप पूर्णपणे सक्षम झालेली नाही.