

Iran US Conflict
esakal
हर्ष काबरा - saptrang@esakal.com
अमेरिका-इराण संबंधांच्या विखारी तणावाच्या मुळाशी केवळ राजकीय मतभेद नसून, दशकानुदशके साचलेला अविश्वास आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या शांतता करारामुळे परिस्थिती एका रात्रीत सामान्य होईल, अशी अपेक्षा ठेवणे भाबडेपणाचे ठरेल.
इराणमधील एका लोककथेत शेळी आपल्या शांगुल, मांगुल आणि हब्बये अंगुर नावाच्या तीन पिलांना अनोळखी व्यक्तीसाठी दरवाजा न उघडण्याची ताकीद देऊन बाहेर जाते. एका लांडग्याला हे समजताच तो आईचा आवाज काढून पिलांना फसवतो. घरात घुसून तिघांनाही गिळंकृत करतो. शेळीला सत्य समजताच ती झोपलेल्या लांडग्याला शोधून तिचे पोट चिरते आणि पिलांना जिवंत बाहेर काढते. नंतर ती लांडग्याच्या पोटात दगड भरून ते शिवून टाकते. जाग आल्यावर पाणी पिण्यास गेलेला लांडगा पोटातील दगडांच्या वजनामुळे पाण्यात पडून मरतो. अनोळखी लोकांवर विश्वास न ठेवण्याचा आणि कपटाचा शेवट वाईटच होतो, हे धडे ही कथा देते.
जागतिक सत्तासमीकरणांच्या वास्तवातदेखील इराणच्या दाराशी अनेक लांडगे दबा धरून बसल्याच्या नोंदी आहेत; मात्र शेळीच्या विश्वासू आवाजाचे सोंग अतिशय सफाईने वठवणारा अमेरिकेसारखा दुसरा क्वचितच आढळतो. म्हणूनच अमेरिकेवर विश्वास ठेवणे इराणला अवघड जाते. इतिहासाने त्यांच्या शंकांना वारंवार दुजोराच दिला आहे.
दोन्ही देशांमधील सध्याच्या संघर्षासंदर्भात स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वाटाघाटी अखेर ६० दिवसांच्या ‘रोडमॅप’वर स्थिरावल्या असल्या तरी शांतता करारातील स्फोटकांचा गंध अजून विरलेला नाही. कराराच्या घोषणेपासून वाटाघाटींच्या पहिल्या फेरीपर्यंत, वॉशिंग्टनवर आपला काडीचाही विश्वास नसल्याचे सांगण्याची एकही संधी इराणने सोडलेली नाही. इराणची ही प्रतिक्रिया अमेरिका-इराण संबंधांच्या प्रत्येक पर्वाला पछाडणाऱ्या एका मूलभूत वस्तुस्थितीकडेच बोट दाखवते, ‘अविश्वास’. जवळपास अर्धशतक या दोन देशांतील संबंध परस्पर संशय, ऐतिहासिक जखमा आणि विसंगत स्मृती यांच्या दुष्टचक्रात अडकलेले आहेत.