उलगडली चित्रपटसृष्टीची सोनेरी पाने 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

पुणे : 'ज्योत से ज्योत जगाते चलो', 'मेरे दिल मे आज क्‍या हैं', 'कोई सेहरी बाबू दिल लहरी', 'रुक जाना नहीं तू कहीं हार के' अशी हृदयाच्या एका कप्प्यात घर करून असलेली अविट गोडीची गाणी एकामागून एक सादर होत असताना हिंदी चित्रपटसृष्टीची सोनेरी पानेच उलगडली जात होती. नव्या आणि जुन्या पिढीतील कलावंतांचा एकत्रित कलाविष्कारही यानिमित्ताने श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. 

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाच्या आठवणी जागविणाऱ्या सदाबहार गाण्यांचा 'लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' शुक्रवारी सादर झाला. तो अनुभवण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच श्रोत्यांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. 'रोटरी क्‍लब ऑफ पूना वेस्ट'ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा 'सकाळ' माध्यम प्रायोजक होता. या वेळी 'किर्लोस्कर'चे अध्यक्ष माधव चंद्रचूड यांच्या हस्ते संगीतकार प्यारेलाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

'सत्यम शिवम सुंदरम्‌' या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. संगीतकार प्यारेलाल यांच्या उपस्थितीत सेंथिल कुमार, मिष्टू वर्धन, संपदा गोस्वामी, मधुरा दातार, अली हुसेन, श्रीकांत कुलकर्णी, मकरंद पाटणकर या गायकांनी जुनी गाणी मोठ्या ताकदीने सादर केली. बासरी, गिटार, की-बोर्ड अशा वेगवेगळ्या वाद्यांवर वादकांनी तितकीच समर्पक साथ देऊन मैफल उंचीवर नेली. त्यामुळेच 'दर्दे दिल', 'डिंग डांग डिंग', 'मैना भुलूंगी', 'एक प्यार का नगमा है', 'तौबा ये मतवाली चाल' अशा गाण्यांना श्रोत्यांनी 'वन्समोअर'ची दाद दिली. 
 
संगीतावरील निष्ठेचे दर्शन 
संगीतकार प्यारेलाल यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली असली तरी संगीतावरील प्रेम, ऊर्जा अजूनही कायम आहे. त्यामुळे 'लक्ष्मीकांत प्यारेलाल लाइव्ह शो' या तीन-साडेतीन तासाच्या कार्यक्रमात ते क्षणभरही खुर्चीवर बसले नाहीत. उभं राहून त्यांनी हा कार्यक्रम सादर केला. हातवाऱ्यांनी गायक-वादकांना दाद देत ते त्यांना प्रेरणा देत होते. पूर्वीचे गीतकार-गायक यांच्या आठवणीही ते उलगडत होते. यातून संगीतावरील निष्ठेचे दर्शन झाले.

Web Title: marathi news marathi websites Lakshmikant Pyarelal Pune News