खडकवासला प्रकल्पातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग; पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात 18.46 टीएमसी इतका साठा झाला आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे.

पुणे : खडकवासला प्रकल्पातील पानशेत आणि खडकवासला धरणांसोबतच वरसगाव धरणही पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातून विसर्गात वाढ करून तो 16 हजार 247 क्युसेक करण्यात आला आहे.

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून सध्या 27.64 टीएमसी (94.83 टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात सायंकाळी आठ वाजेपर्यंत 20 मिलिमीटर पाऊस आला. तसेच, वरसगाव 25, पानशेत 34 आणि खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. 

Video : रामभक्तांसाठी आनंदाची बातमी; रामाची चलनी नोट आहे पुण्यात!

खडकवासला धरणातील पाण्याचा येवा वाढल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 11 हजार 704 क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. तो आता 16 हजार 247 क्युसेकने सोडण्यात येत आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये, कंसात टक्केवारी : 
- टेमघर 2.89 (77.99)
- वरसगाव 12.13 (94.60)
- पानशेत 10.65 (100)
- खडकवासला 1.97 (100)

'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी!​

मुळशी धरण भरले :
मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, या धरणात 18.46 टीएमसी इतका साठा झाला आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजता विसर्गात वाढ करून 12 हजार क्युसेक करण्यात आला. सायंकाळी विसर्ग कमी करून तो सात हजार 376 क्युसेकने सोडण्यात येत आहे, अशी माहिती टाटा पाॅवरचे धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी दिली.

यंदा पहिल्यांदाच भिडे पूल पाण्याखाली

खडकवासला प्रकल्पातून मुठा नदीत 16 हजार 247 क्युसेकने विसर्ग सुरू केल्यामुळे यंदा पहिल्यांदाच भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाहनेही पाण्याखाली गेली आहेत. काही वाहने हटविण्यात आल्याची माहिती मिळाली असून या पूलावरून वाहतूकही बंद करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 thousand 247 cusecs discharge from Khadakwasla project to Mutha river