esakal | 'स्कूल चले हम'; आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली!
sakal

बोलून बातमी शोधा

School

- कोरोनाच्या सावटात वाजली शाळेची घंटा 
- पालकांच्या मनात कोरोनाची भीती कायम 
- 40 ते 45 टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण

'स्कूल चले हम'; आठ महिन्यानंतर जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजली!

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे : कोरोनाच्या सावटात तब्बल आठ महिन्यांनंतर जिल्ह्यातील जवळपास 218 शाळांची घंटा सोमवारी (ता.२३) वाजली. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हजेरीने शाळा पुन्हा भरल्या. मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती पालकांच्या मनात कायम असल्याचे विद्यार्थ्यांच्या शाळेतील तुरळक उपस्थितीवरुन समोर आले. पुणे, पिंपरी-चिंचवड वगळता जिल्ह्यातील 17 टक्के शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. 

Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड​

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झालेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती असली तरी ऑनलाइन शिक्षणाऐवजी प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत असल्याचा आनंद दिसून आला. विद्यार्थ्यांसमवेत पालकांची देखील शाळेबाहेर उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. शाळेच्या प्रवेशद्वारात ठराविक अंतर राखून विद्यार्थ्यांच्या लागलेल्या रांगा, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांची केली जाणारी प्राथमिक आरोग्य तपासणी, वर्गात अंतर राखून बसलेले विद्यार्थी, असे काहीसे वातावरण शाळेच्या परिसरात होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यात एकूण एक हजार 246 शाळा आहेत. त्यातील 218 शाळा सोमवारी सुरू झाल्या असून जवळपास नऊ हजार 431 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अद्याप जवळपास एक हजारांहून अधिक शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारी सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पालकांचा प्रतिसाद संमिश्र असल्याचे निदर्शनास आले.

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी​

13 जण कोरोना पॉझिटिव्ह 
''राज्य सरकारच्या आदेशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार सोमवारपासून जिल्ह्यातील 218 शाळा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 40 ते 45 टक्के शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण झाली आहे. त्यातील 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनेकांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. मंगळवारपर्यंत (ता.24) आणखी शंभर-दीडशे शाळा सुरू होतील. येत्या शनिवारपर्यंत (ता.28) जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे कोरोना तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.'' 
- डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग), जिल्हा परिषद 

शाळा सुरू न होण्याची कारणे : 
- शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी अद्याप अपूर्ण 
- शाळा सुरू करूनही विद्यार्थी फिरकलेच नाहीत 
- विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांची संमती नसणे 
- घरापासून लांब शाळा असल्याने विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांचा नकार 

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी शाळांनी लढवली अशी शक्कल : 
- एक दिवस विद्यार्थिनी आणि एक दिवस विद्यार्थी अशी राहणार हजेरी 
- शाळेतील सम-विषम हजेरी क्रमांकाने विद्यार्थ्यांची दिवसाआड भरणार शाळा 
- निम्मे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात; उर्वरित विद्यार्थी ऑनलाइन वर्गात उपस्थित 

जिल्ह्यातील शाळांची सद्यःस्थिती :
- जिल्ह्यातील शाळांची संख्या (पुणे, पिंपरी-चिंचवड वगळून) : एकूण शाळा- 1,246, सुरू झालेल्या शाळा-218, अद्याप सुरू होण्याच्या प्रतीक्षेतील शाळा -1,028 
- जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या : एकूण - 11,500, कोरोना तपासणी झालेले शिक्षक - 4,700 
- कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या : 13 

'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​ 

''सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले आहे. शाळेतील 10 टक्के शिक्षकांची तपासणी झाली आहे. मात्र अद्याप शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी अपूर्ण असल्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करणे शक्‍य झाले नाही. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर शाळा सुरू करण्यात येईल.'' 
- दिलीप पवार, मुख्याध्यापक, विद्या विकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी, (ता. शिरूर) 

''शाळा सुरू करण्यापूर्वी मागील आठवड्यात पालकांची प्रत्यक्ष आणि ऑनलाइन बैठक घेतली होती. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचा संमिश्र प्रतिसाद होता. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवशी दहावीच्या वर्गात केवळ 19 विद्यार्थी आणि नववीच्या वर्गात 34 विद्यार्थी उपस्थित होते.'' 
- सुरेश डोके, मुख्याध्यापक, शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालय, लांडेवाडी (ता. आंबेगाव)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image