पुणे-सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; सौरप्रकल्प ठरणार वरदान!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

म्हसवड येथे उभारलेला सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता 6.5 मेगावॅट इतकी आहे.

बारामती : 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतून म्हसवड (ता. माण) येथे साकारलेल्या साडेसहा मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून 12 गावांतील 1800 शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील 50 कृषीवाहिन्या सौर ऊर्जेवर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या 50 मध्ये महावितरणच्या बारामती परिमंडलातील वडूज विभागांतर्गत येणाऱ्या म्हसवड उपकेंद्रातील तीन वाहिन्यांचा समावेश आहे.

खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'​

सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ आणि रात्री दहा तास असा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खाजगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार व पणन मंत्री शामराव पाटील यांना सहकार्य करण्याचे आणि त्या भागातील किमान 80 टक्के शेतकऱ्यांना चालू बिले भरण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

योगी सरकारचा निषेध...निषेध...निषेध; वंचित बहुजन आघाडीची पिंपरीत निदर्शने​

म्हसवड येथे उभारलेला सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता 6.5 मेगावॅट इतकी आहे. या सौर प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या म्हसवड उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या देवापूर, धुळदेव आणि खडकी-भाटकी या तीन कृषी वाहिन्यांना दिवसा मिळणार आहे.

देवापूर वाहिनीवर म्हसवड, देवापूर, पळसावडे, वीरकरवाडी, बनगरवाडी, शिरताव गावातील 600 कृषीपंप आहेत. त्यांना सकाळी 6 ते दुपारी 2 यावेळेत वीजपुरवठा होईल. तसेच धुळदेव वाहिनीवरील धुळदेवसह हिंगणी आणि ढोकमोड गावातील 700 कृषीपंपांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज मिळेल. तर खडकी-भाटकी वाहिनीवरील खडकी, भाटकी आणि मासाळवाडी या गावातील 500 कृषीपंपांना यापुढे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा मिळणार आहे. परिणामी या 12 गावांतील शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही. 

इकडे आड, तिकडे विहीर; बारामती नगरपालिकेची स्थिती!​

हा प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता  सुनील पावडे, सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांचेसह महावितरण आणि महापारेषणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1800 farmers are now getting electricity during day from solar project