esakal | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांना खूशखबर
sakal

बोलून बातमी शोधा

police

पोलिस विभागाला अधिक सुविधा देण्याच्या उददेशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून, बारामतीत पोलिसांसाठी 196 निवासस्थाने उभारली जाणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पोलिसांना खूशखबर

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : पोलिस विभागाला अधिक सुविधा देण्याच्या उददेशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून, बारामतीत पोलिसांसाठी 196 निवासस्थाने उभारली जाणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी आज ही माहिती दिली. 

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार

बारामती शहरात पाटस रस्त्यावर पोलिसांसाठी निवासस्थाने उभारण्यात आलेली आहेत. ही पोलिस वसाहत अनेक वर्षांपूर्वी तयार केलेली असून, त्याची दुरवस्था झाली आहे. पोलिसांना हक्काची घरे नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर अजित पवार यांनी या परिसराचा अभ्यास करून येथे नवीन निवासस्थाने उभारण्याचा निर्णय घेतला होता. पोलिस गृहनिर्माण विभागाच्या वतीने सुमारे 45 कोटी रुपये खर्चून ही 196 निवासस्थाने उभारली जाणार आहेत. यात सात मजली चार इमारती उभारण्यात येणार असून, इतरही सुविधा दिल्या जाणार आहेत. येत्या दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रीयाही पूर्ण झाली आहे. 

पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने पोचववला पुस्तकांचा ठेवा विद्यार्थ्यांच्या घरात

जोपर्यंत इमारती उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत पोलिसांना स्वतःची व्यवस्था स्वतः करावी लागणार असून, शासन त्यांना त्या साठी घरभाडे भत्ता अदा करणार आहे. दरम्यान, भविष्यात अधिकाऱ्यांसाठीही रो हाऊस तयार करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे. 

अशी असेल घरांची रचना
• दोन बेडरुमची सदनिका तयार होणार
• 500 स्क्वे.फूट क्षेत्रफळाची सदनिका
• प्रत्येकी सात मजल्यांच्या चार इमारती उभ्या राहणार
• बगीचा व इतर पूरक सुविधाही दिल्या जाणार 
• ओपन जिम व परेड ग्राउंडही विकसित होणार  

बारामती शहर, बारामती तालुका व वडगाव निंबाळकर अशा तीन पोलिस ठाण्यात मिळून सध्या 240 कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या इमारतीत 196 सदनिका तयार होणार आहे. त्यामुळे बहुसंख्य पोलिसांच्या घरांचा प्रश्न यात संपुष्टात येईल. दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- मिलिंद मोहिते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती