esakal | पीएचडीच्या प्रवेश परिक्षेसाठी २५ हजार ७४० अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Phd students

पीएचडीच्या प्रवेश परिक्षेसाठी २५ हजार ७४० अर्ज

sakal_logo
By
सम्राट कदम -सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. पात्रता परीक्षेसाठी (पेट) २५ हजार ७४० विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. रविवारी (ता.५) ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश परीक्षा पार पडणार असून, तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सरावासाठी गुरुवार (ता.२) पर्यंत मॉक टेस्ट देता येणार आहे.

हेही वाचा: पुणे : झांबड लघुपटास प्रेक्षकांचा प्रथम प्रतिसाद

पीएच.डी.च्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर मुदतवाढ देत विद्यापीठाने शनिवारी प्रवेश परीक्षा निश्चित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. विद्यापीठात पीएच.डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा म्हणजे पीएच.डी प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा.

ही परीक्षा १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची असणार आहे. यात ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर ५० गुणांचे, तर संबंधित विषयावर ५० गुणांचे असे एकूण १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात येतील. या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दुसरा टप्प्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, त्यात प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल.

हेही वाचा: महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल

अशी पार पडते मॉक टेस्ट :

पेट परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्याला मॉक टेस्टची लिंक असलेला इमेल किंवा एसएमएस आला आहे. त्या लिंक वर क्लिक केल्यावर संबंधित संकेतस्थळ खुले होते. त्यावर विद्यार्थ्याने यूजर नेम आणि पासवर्ड टाकून मॉक टेस्ट सुरू करावी. हे करताना तुमच्या ब्राउजरला कॅमेरा वापरायची परवानगी द्यावी. गुरुवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मॉक टेस्ट खुली राहील.

प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर :

ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी विद्यापीठाने प्रोक्टॅर्ड पद्धतीचा वापर सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप, टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेऊन परीक्षा द्यावी लागली. त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसरी विंडो सुरू केली, इंटरनेट बंद केले किंवा संशयास्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात होता. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होत असल्याने त्यावर गैरप्रकार केल्याची कारवाई केली जात आहे.

‘पेट’मधून यांना मिळते सूट :

नेट, सेट आणि गेट परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी (पेट) सवलत देण्यात आली आहे. या उमेदवारांची थेट मुलाखत घेतली जाणार आहे.

परीक्षार्थिंची आकडेवारी:

पेट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : २५,७४०

सूट मिळालेल्या (एक्झम्प्शन) विद्यार्थ्यांची संख्या : ४,१००

loading image
go to top