शिरूर तालुक्यात कोरोना 'अब तक छप्पन्न' 

corona
corona

शिरूर (पुणे) : शिरूर शहर, परिसर व तालुक्यात एकाच दिवसात नव्याने पाच कोरोनाग्रस्त आढळून आले. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 56 रुग्ण झाले आहेत. कोरोनाचे पुणे- मुंबई कनेक्शन तुटत असताना; आता नव्याने एमआयडीसी कनेक्शन बाधक ठरत असल्याचे आजच्या रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  

सावधान, कोरोनाविषयी मॅसेज फाॅरवर्ड करण्यापूर्वी हे वाचा...   
 
शिरुर तालुक्याने काल कोरोनाची 'हाफ सेन्चुरी' झाली होती. त्यानंतर एका आठ वर्षीय मुलाचा अहवालही रात्री उशिरा पाॅझिटिव्ह आला होता. त्यात आज एकाच दिवशी पाच रुग्ण वाढल्याने 'अब तक छप्पन' असे चित्र निर्माण झाले आहे. शिरूर येथील बाबूराव नगर परिसरातील एक चाळीस वर्षीय कामगार पाॅझिटिव्ह आढळल्यानंतर त्याची पत्नी; तसेच तीन मुलांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला असला; तरी 12 व आठ वर्षे वयाच्या दोन मुली आणि सहा वर्षाच्या मुलाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

शिरूरच्या पाषाणमळ्यातील 28 वर्षीय कामगाराचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही कामगार रांजणगाव एमआयडीसीतील बड्या कंपनीत कामाला होते. तेथेच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले आहे. बाभूळसर बुद्रुक येथीलही एका कामगाराचा कोरोना चा रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी पाॅझिटिव्ह आला होता. तो देखील एमआयडीसीत कामाला असून, त्यालाही तेथेच बाधा झाल्याचे सांगण्यात येते. शिक्रापूरमध्येही आज दोघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ते दोघेही औद्योगिकरणात कार्यरत होते.

लाॅकडाउन शिथिलीकरणानंतर पाच मेपासून रांजणगाव एमआयडीसी बरोबरच; सणसवाडी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा परिसरातील कंपन्या टप्प्याटप्प्याने चालू झाल्यानंतर या कंपन्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कामगार व प्रशासनातील लोक येण्यास सुरुवात झाली. पुणे व परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राबरोबरच; हाॅटस्पाॅटमधून काही कामगार येत आहेत. याबाबत स्थानिक कामगारांनी तक्रार केली. त्या दरम्यान हडपसरमधील एका 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात घबराट पसरली. 

एमआयडीसी कनेक्शनमधून धोका 
याबाबत स्थानिक कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे पुढेही हाॅट स्पाॅटमधील कामगारांचा ओघ एमआयडीसी व तालुक्यातील औद्योगिकरणात चालूच राहिला. त्यातून आतापर्यंत तब्बल 15 कामगारांना कोरोनाची बाधा झाली असून, आता या बाधित कामगारांचे कुटुंबी.ही कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. संबंधित कंपन्या बंद करण्याबरोबरच पुणे व पिंपरी- चिंचवड परिसरातील हाॅट स्पाॅटमधील कामगारांना प्रतिबंध करण्यात यावा, अशी आग्रही मागणी स्थानिक कामगारांनी केली आहे. हाॅट स्पाॅटमधील कामगारांची एन्ट्री तातडीने न रोखल्यास तालुक्याचा मोठा भाग कोरोना च्या विळख्यात सापडू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली.                      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com