शिरूरच्या कोयाळी शाळेचा राज्यात झेंडा; शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 69 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गजेंद्र बडे
Wednesday, 25 November 2020

शिष्यवृत्तीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्येनुसार अकरा शाळा टॉप टेन ठरल्या आहेत. यामध्ये शिरूर तालुक्‍यातील तब्बल सात शाळा आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीत शिरूर तालुक्‍याने बाजी मारली आहे.

पुणे : इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिरूर तालुक्‍यातील कोयाळी पुनर्वसन शाळेने 'करून दाखविले' आहे. या शाळेचे तब्बल 69 विद्यार्थी गुणवत्तायादीत चमकले आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी गुणवत्तायादीत येणारी जिल्ह्यातील ही एकमेव शाळा ठरली आहे. या परीक्षेत राज्यात अव्वल क्रमांक पटकाविलेली विद्यार्थिनी आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रूक शाळेची आहे. त्यामुळे या शाळेचा झेंडा राज्यात रोवला गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिष्यवृत्तीतील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्येनुसार अकरा शाळा टॉप टेन ठरल्या आहेत. यामध्ये शिरूर तालुक्‍यातील तब्बल सात शाळा आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीत शिरूर तालुक्‍याने बाजी मारली आहे.

या यशामागे सातत्याने शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव, मोठ्या संख्येने प्रश्‍नसंच सोडवून घेणे आणि शाळेच्या वेळेपेक्षा जादा तास घेणे, ही कारणे असल्याचे कोयाळी पुनर्वसन शाळेचे मुख्याध्यापक आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शक संतोष विधाटे यांनी सांगितले. शिष्यवृत्ती परीक्षेचे सूक्ष्म नियोजन करून, या नियोजनानुसार दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वीच शाळा आणि शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास प्राधान्य दिल्याचे याच शाळेतील पाचवीचे वर्गशिक्षक व मार्गदर्शक शरद दौंडकर यांनी सांगितले.

व्यावसायिक गौतम पाषाणकर का निघून गेले? वाचा सविस्तर

कोरोनामुळे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लांबला होता. लांबलेला हा निकाल तब्बल नऊ महिन्यानंतर दिवाळीत जाहीर करण्यात आला आहे. त्यात पुणे जिल्हा परिषदेच्या अकरा शाळा टॉप टेन ठरल्या आहेत. यापैकी दोन शाळांमधील समान विद्यार्थी आहेत. इयत्ता पाचवीसाठी 300 गुणांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यंदा मात्र बारा गुणांचे प्रश्‍न चुकले होते. त्यामुळे 288 गुणांची परीक्षा गृहीत धरण्यात आली आहे. यापैकी 280 गुण मिळवत आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रूक येथील तृप्ती महेंद्र थोरात हिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवाय या शाळेतील अनुष्का राजेंद्र थोरात, आर्या संचित कुंजीर, सानिका संतोष थोरात या विद्यार्थींनीनी राज्य गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले आहे.

अमेरिकेच्या मुंबई दुतावासातील उच्चायुक्तांची पुणे विद्यापीठाला भेट 

टॉप टेन शाळा व गुणवंत विद्यार्थी संख्या

कोयाळी पुनर्वसन (ता. शिरूर) --- 69 विद्यार्थी.
- वाबळेवाडी (ता. शिरूर) --- 32 विद्यार्थी.
- शिक्रापूर (ता. शिरूर) --- 29
- पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे (ता. आंबेगाव) --- 27.
- पिंपळे खालसा (ता. शिरूर) --- 18.
- वसेवाडी (ता. शिरूर) --- 16.
- चाकण नंबर 2 (ता. खेड) --- 14.
- कुरुळी (ता. खेड) ---13.
- तळेगाव ढमढेरे नंबर 2 (ता. शिरूर) ---13.
- जातेगाव बुद्रूक (ता. शिरूर) --- 12.
- चांडोली बुद्रूक (ता. आंबेगाव) --- 11.

राष्ट्रीय हरित लवादातील नवीन पदाधिकाऱ्यांची नावे अखेर निश्चित

शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांचा पाया असते. या परीक्षेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे बाळकडू मिळत असते. त्यामुळे आम्ही विद्यार्थी अधिकाधिक गुणवंत व्हावेत, या उद्देशाने मार्गदर्शन करत असतो.
- संतोष विधाटे, मुख्याध्यापक व मार्गदर्शक, कोयाळी पुनर्वसन झेडपी शाळा (ता. शिरूर)

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषय खूप महत्त्वाचे असतात. यासाठी आम्ही अगदी दुसरीच्या वर्गापासून या विषयांची कसून तयारी करून घेतली. सराव पेपर व प्रश्‍नसंच सोडविण्यावर अधिक भर दिला. वर्षभरात 130 प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या. सराव आणि श्रमाचे फळ मिळाल्याचा आनंद आहे.
- नंदिनी पडवळ, वर्गशिक्षिका व मार्गदर्शक, चांडोली बुद्रूक शाळा (ता. आंबेगाव)

‘म्हाडा’ची लॉटरी पुढील महिन्यात; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ४,७२३ घरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 69 students in Koyali School Scholarship Examination in merit list