esakal | कडूस येथे उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू
sakal

बोलून बातमी शोधा

covid19

कडूस येथे उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू

sakal_logo
By
महेंद्र शिंदे

कडूस : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडूस (ता.खेड) ग्रामस्थांनी मंगळवार (ता. 20) दुपारी एक वाजल्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय सेवा व दुध संकलन केंद्र वगळता गावातील दारू विक्री दुकानांसह सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्युला नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन सरपंच निवृत्ती नेहेरे व ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समितीने केले आहे.

हेही वाचा: जुन्नर : वैरणीला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून कडूस गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. सध्या गावाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या वस्त्यांवर दहा ऍक्टिव्ह रुग्ण असून अनेकांना आरोग्याचा काहीना काही त्रास होत आहे. ऍक्टिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधक समिती व ग्रामस्थांची तातडीची बैठक झाली. यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आला. हा जनता कर्फ्यु मंगळवारी (ता.20) दुपारी एक वाजल्यापासून मंगळवार (ता. 27) सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या जनता कर्फ्युतून फक्त दवाखाने, औषधांची दुकाने व दुध संकलन केंद्रांना सूट देण्यात आली आहे. दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये, यासाठी फक्त दूध संकलन केंद्रांना यातून सूट देण्यात आली असून दूध संकलनासाठी शेतकऱ्यांनी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. जनता कर्फ्यूच्या कालावधीत गावातील भाजी विक्रेते, हॉटेल, किराणा दुकाने, दारू विक्रीसह सर्व आस्थापना बंद राहणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती अध्यक्ष तथा सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, मंडलाधिकारी एच.ए.सोनवणे, तलाठी बी.एस.राठोड, तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्ष बाळासाहेब बोंबले, पोलीस पाटील सुशील पोटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, बारकू गायकवाड, अनिकेत धायबर, अरुण शिंदे, सुधा पानमंद, मारुती जाधव, बबलुभाई शेख उपस्थित होते. याबाबत गावात दवंडीद्वारे तसेच दारोदारी फिरून कोरोना प्रतिबंध समितीच्या सदस्यांनी जनता कर्फ्युला साथ देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: परप्रांतीय परागंदा ः पुणे-मुंबईकरांनी पुन्हा धरली गावची वाट