
Kasba ByElection: कसबा पोटनिवडणूक रद्द करा; अभिजीत बिचुकलेंची मोठी मागणी
पुणे : कसबा पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली आहे. या ठिकाणी त्यांनी निवडणूक का रद्द करण्यात यावी, याची माहिती देणारं पत्रही सादर केलं आहे. (Abolish Kasba by election demanded by Candidate Abhijit Bichukale)
बिचुकले यांनी म्हटलं की, काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी सकाळी आंदोलन केलं कारण त्यांच्या मते समोरच्या उमेदवारांकडून मतदारांना पैशांचं वाटप सुरु आहे. याचे व्हिडिओ त्यांच्याकडं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मी तिसरा उमेदवार म्हणून मलाही न्याय हक्कानं लढणं हा माझा अधिकार आहे. या तक्रारींची दखल घेऊन त्याविरोधात निवडणूक आयोगानं संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे का? असा सवालही त्यांनी विचारला.
निवडणूक आयोगाचा खूपच ढसाळ कारभार आहे, म्हणून निवडणूक आयोगाला मी पत्र देतोय की, यामध्ये मी हेच म्हटलंय की, संपूर्ण निवडणूक अशी पैसे वाटून जे कॅमेरॅत दोषी सापडत आहेत. तरी तुम्ही त्यावर कारवाई करणार नसाल तर ही निवडणूक प्रक्रिया ठप्प करा आणि नव्यानं निवडणूक घ्या. दोन्हींकडून सुरु आहे. कारण धंगेकरांवरही भाजपनं आक्षेप घेतला आहे. याचे माझ्याकडं पुरावे नाहीत पण यावरही कायदेशीर पावलं उचलणं गरजेचं आहे.

याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी मी निवडणूक अधिकाऱ्यांकडं अर्ज देण्यासाठी एकटाच आलो आहे. यावर यांची काय कारवाई होतेय याकडं माझं लक्ष असणार आहे. असं जर तुम्ही लोकांना आमिषं देत असाल तर निवडणूक नियमांनुसार तो गुन्हा आहे, त्यामुळं त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये मी जरी मतदारांना कुठल्याही प्रकारचं आमिष देत असेल तर माझ्यावरही कारवाई करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.