पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; तिघे ठार तर सातजण जखमी

विठ्ठल तांबे 
Sunday, 29 November 2020

ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.

धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पुणे-बंगळुरू बाह्यवळणावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहाला घडली. 
महिनाभरात या महामार्गावर अशा स्वरूपाचा हा चौथा अपघात आहे. 

अधिक वाचा-  उर्मिला मातोंडकर मुळच्या शिवसैनिकच, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य

प्रशांत गोरे (वय 32, रा. उस्मानाबाद) व राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द), निखील विलास आवटे अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. प्रेमराज राणाराम बिष्णोई (वय 25, रा. खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रेलरचालकाचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बिष्णोई हा 22 चाकी ट्रेलर (आरजे.19, जीएस 4673) चालवत होता. बंगळुरू येथून तब्बल 41 टन वजनाचे लोखंड भरून अहमदाबादला घेऊन तो जात होता. आज सायंकाळी सव्वा सहाला कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ ट्रेलर आला. तेथून स्वामी नारायण मंदिराजवळ पोचल्यानंतर ट्रेलरचा ब्रेक निकामी झाला. त्यातच तीव्र उतार लागल्याने ट्रेलरने समोरून जात असलेल्या पाच मोटारी, एक रिक्षा, दोन दुचाकी व एका ट्रकला उडविले. 

हा अपघात इतका भीषण होता, की त्यामध्ये पाच मोटारी, रिक्षा, दोन दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला तर ट्रकचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचालक राजेंद्र गाढवे यांच्यासह रिक्षातील प्रवासी जखमी झाले. दुचाकी ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार प्रशांत गोरे हे गंभीर जखमी झाले होते तर अन्य आठ नागरिक या अपघातात जखमी झाले. वाहनांना जोरदार धडक दिल्यानंतर ट्रेलरच्या डिझेलच्या टाकीने पेट घेतला. त्यानंतर काही अंतरावर पुलावरच ट्रक थांबला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाणे, वाहतूक शाखेचे पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढत उपचारांसाठी रुग्णालयात पाठवून दिले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रशांत गोरे, राजेंद्र गाढवे व निखील आवटे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 

 Corona Effect: तरुणांसह महिलाही डिप्रेशनमध्ये; प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत​

दरम्यान, या भीषण अपघातामुळे मुंबई-बंगळुरू महामार्गावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अग्निशामक दलाला बोलावून पेटलेला ट्रक विझविला. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident near navale bridge in pune, three death on the spot